Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Narendra Sawaikar termites remark: भाजपचे दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी तरुणांबद्दल ‘वाळवी’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्या विधानाबद्दल भाजपने २४ तासांत युवकांची माफी मागावी, अन्यथा काँग्रेस आंदोलन छेडेल.
Congress Working President Sunil Kavathankar
Congress Working President Sunil KavathankarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपचे दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी तरुणांबद्दल ‘वाळवी’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्या विधानाबद्दल भाजपने २४ तासांत युवकांची माफी मागावी, अन्यथा काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेस कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मंगळवारी दिला. काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत कवठणकर बोलत होते. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक, ‘एनएसयूआय’चे सरचिटणीस कुमार गवळी यांची उपस्थिती होती.

कवठणकर म्हणाले, नीट पेपर फुटीप्रमाणे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत युवक आंदोलन करीत होते, त्यांच्यावर अमानुषपणे पोलिसांनी व केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांनी हल्ले केले. त्याच आंदोलनाला धरून भाजपचे स्थानिक नेते सावईकर हे समाजमाध्यमातून पोस्ट करून आंदोलन करणाऱ्या युवकांना ‘वाळवी’ संबोधतात. जर देशातील युवक हे ‘वाळवी’ असतील तर ‘भाजयुमो’चे युवकही ‘वाळवी’च आहेत, असेच त्यांना म्हणायचे आहे का? अर्चित नाईक म्हणाले, दिल्लीत आंदोलन करणारे तरुण आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत, या युवकांना सावईकर यांनी ‘वाळवी’ म्हणणे हा या तरुणांचा गंभीर अपमान आहे

सावईकरांची ‘कृती’ लज्जास्पद

भाजपच्या नरेंद्र सावईकर यांनी युवकांना जी उपाधी दिली आहे, ती लज्जास्पद आहे. निषेध करण्याचा आपला लोकशाही अधिकार बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना अशी विशेषणे लावली जाऊ नयेत. जर तरुणांचे आवाज ‘वाळवी’ असतील, तर मग पुढच्या पिढीसाठी आपली खुर्ची सोडण्यास नकार देणाऱ्या राजकारण्यांना आपण काय म्हणायचे? असा सवाल ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी केला आहे.

Congress Working President Sunil Kavathankar
Goa Congress: "इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या परिणामांचा सखोल अभ्यास आधी करा!" राज्यातील नव्या इंधन धोरणावरून मागणी करत काँग्रेस आक्रमक

देशातील युवकांचा अपमान

माजी खासदार तथा प्रदेश भाजपचे उपाध्‍यक्ष नरेंद्र सावईकर यांनी विद्यार्थ्यांना दिलेली ‘वाळवी’ची उपमा लाजिरवाणी आणि देशातील युवकांचा अपमान करणारी आहे. विद्यार्थ्यांना आधाराची गरज असताना भाजपचे नेते मौन बाळगून होते. त्यामुळे नरेंद्र सावईकर यांनी गोव्यातील विद्यार्थी आणि युवकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी ‘आप’चे युवा आघाडीचे अध्यक्ष पूजन मालवणकर यांनी केली.

ही वाळवीच धडा शिकवेल

जे तरुण शिक्षण व्यवस्थेविरुद्ध आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत, त्यांना माजी खासदार नरेंद्र सावईकर ‘वाळवी’ संबोधत थट्टा करत आहेत, याचा आम्ही निषेध करत असून हीच ‘वाळवी’ येत्या विधानसभा निवडणुकीत योग्य धडा शिकवेल. अशी तरुणाईची थट्टा केली तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा गोवा फॉरवर्ड विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वृषांक गावकर यांनी दिला.

Congress Working President Sunil Kavathankar
Goa Congress: कॅसिनोशी जोडलेल्या अवैध 'स्पा'ना संरक्षण कोणाचे? पणजीत 40 हून अधिक अवैध 'स्पा'- प्रतीक्षा खलप

असंवेदनशील दृष्टिकोन

देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर गोव्यातील भाजप नेतृत्वाने केलेल्या विधानाचा दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी निषेध केला आहे. सरकारकडून युवकांविरोधात लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला जाणे, हा सरकारचा अहंकार आणि असंवेदनशील दृष्टिकोन दर्शवतो, अशी टीका त्यांनी केली. सध्या देशभरातील विद्यार्थी सरकारकडे उत्तरदायित्वाची मागणी करत आहेत.

Congress Working President Sunil Kavathankar
Goa Congress: प्रतिमा कुतिन्हो यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; नेत्यांकडून स्वागत, पक्ष सदस्यत्वाचा अर्ज गटसमिती अध्यक्षांकडे सादर

गुणवत्तेला उरली नाही किंमत

‘लोकशाहीत अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु, भाजप (BJP) राजवटीत गुणवत्तेला कोणतीही किंमत उरलेली नाही,’ असा घणाघाती आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. ‘जेन झी’ युवा आंदोलकांना ‘वाळवी’ म्हणणाऱ्या भाजपा नेते नरेंद्र सावईकर यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आणि सावईकरांनी हे वक्तव्य त्वरित मागे घेऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com