

पणजी: राज्यात किनारपट्ट्यात स्पा, मसाज पार्लर आणि डान्सबार बरेच फोफावले आहेतच; परंतु राजधानी पणजी येथे ४० हून अधिक स्पा आहेत. हे प्रामुख्याने कॅसिनोशी जोडलेले आहेत. त्यातील बहुतांशी ‘स्पा’ हे अवैधपणे चालतात. यांना संरक्षण देणारा राजकारणातील गॉडफादर कोण? हे शोधणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतीक्षा खलप यांनी केले.
पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खलप बोलत होत्या. यावेळी प्रवक्ते विवेक डिसिल्वा, ॲड. लवेनिया डिकॉस्टा, कामलिना फर्नांडिस उपस्थित होते. राज्यातील अनेक मसाज पार्लर आणि स्पा २४ तास सुरू असतात. पहाटे ३ आणि ४ वा. कसला मसाज दिला जातो. २४ तास सुरू ठेवण्याचे कारण काय?
गोव्यात जे पर्यटक आलेले असतात त्यांना जाळ्यात अडकवून अवाच्या सव्वा रक्कम उकळली जाते, त्यांना मारहाण केली जाते. हे जे पार्लर चालवत आहेत ते सर्व परप्रांतीय आहेत. या प्रकारामुळे गोव्याची प्रतिमा मलीन होत आहे. हा प्रकार बंद न झाल्यास आम्ही आंदोलन करू, असे विवेक डिसिल्वा यांनी सांगितले.
राज्यात मागील १५ वर्षांत महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लहान मुली, महिला, ज्येष्ठ महिलांवरदेखील अत्याचार होत आहेत. गोव्यात ही स्थिती होती का? कळंगुटमध्ये एका स्पामध्ये काम करण्यासाठी आलेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आले. तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला; परंतु ती आजही न्याय मिळविण्यासाठी लढत असल्याचे ॲड. लवेनिया डिकॉस्टा यांनी सांगितले.
मानवी तस्करी कायदा सक्षम करावा!
प्रतीक्षा खलप म्हणाल्या की, ज्यावेळी स्पा, मसाज पार्लरविरोधात आवाज उठवला जातो, त्यावेळी तात्पुरती कारवाई केली जाते आणि पुन्हा सुरू केले जातात. राज्यातील स्पा, पार्लरच्या ठिकाणी, कॅमेरा, चौकशी यंत्रणा असावी. मानवी तस्करी कायदा सक्षम करणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.