
पणजी: राज्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सर्व नेते सहभाग घेतील. आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह प्रभारी ठाकरेही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
गोवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची वर्णी लागण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून गोव्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. माणिकराव ठाकरे यांनी देखील मंगळवारी यावर बोलताना अंतर्गत विषय असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, वेणुगोपाळ यांनी सर्व नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केल्याने, बैठकीत नेमकी कोणती चर्चा होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. बैठकीत दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, पक्षाचे तिन्ही आमदार, प्रदेशाध्यक्ष पाटकर, गिरीश चोडणकर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सहप्रभारी अंजली निंबाळकर देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अरविंद केजरीवाल यांनी नुकत्याच केलेल्या गोवा दौऱ्यात अमित पाटकर यांच्यासह काँग्रेसवर सडकून टीका केली होती. काँग्रेस आणि भाजप एकच असून भाजपला सत्तेत राहण्यास काँग्रेस मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पाटकर यांच्या खाण व्यवसायास मुख्यमंत्री सावंत यांचा आशिर्वाद असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, पाटकरांनी हे दावे खोडून काढत आपवर पलटवार केला होता.
माणिकराव ठाकरे यांनी देखील मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपने भूमिका स्पष्ट करावी, असे मत मांडले होते. त्यांना भाजप विरोधात लढायचंय का काँग्रेस हे देखील त्यांनी स्पष्ट करावे, असे ठाकरे म्हणाले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपने अमित शहांच्या हस्ते नुकतेच राज्यात विविध विकासकामांचा शुभारंभ केला. दुसरीकडे आपने देखील अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थित राज्यात विविध कार्यक्रम करत कार्यकर्त्यांना संबोधित केले तसेच, भाजप विरोधात आंदोलन देखील केले.
आपने काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने केंद्रात इंडिया आघाडीचा भाग असलेली आप गोव्यात स्वतंत्र लढण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत चर्चा होणार की सध्याच्या राजकीय हालचालींचा आढावा घेतला जाणार की युतीबाबत भूमिका स्पष्ट होणार? हे बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.