

पणजी: गोवा नॅच्युरल गॅस प्रायव्हेट लिमिटेडमार्फत वाहिनीद्वारे गॅसपुरवठा होणाऱ्या हॉटेल व रेस्टॉरंटधारकांनी अद्याप खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केलेली नाही. गॅसच्या दरात वाढ न झाल्याने त्यांनी मेन्यूचे दर सध्या स्थिर ठेवले आहेत. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अवलंबून असलेल्या हॉटेलधारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पणजी शहरातील काही नामांकित हॉटेलधारकांनी व्यावसायिक सिलिंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे जेवणाच्या थाळीची सेवा बंद केली आहे. त्यातच आचारी वर्गाची टंचाई असल्याने काही खाद्यपदार्थ बनविणेही थांबवावे लागत आहे. सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा ताण निर्माण झाला असून, दरवाढ अपरिहार्य ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित संघटना पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ताळगाव येथे गटार खोदकाम सुरू असताना भूमिगत गॅस वाहिनी फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, गोवा नॅच्युरल गॅस प्रायव्हेट लिमिटेडच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गळती झालेल्या वाहिनीची दुरुस्ती केली.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत तब्बल ९९३ रुपयांची वाढ झाल्याने एक सिलिंडर सुमारे ३,०७२ रुपयांना खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे अशा हॉटेलधारकांसमोर खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गॅसपुरवठ्यातील अडचणींमुळे काही हॉटेल व रेस्टॉरंट्सना पूर्वी काही काळ बंद ठेवावे लागले होते. तसेच, खर्च नियंत्रणासाठी मेन्यू कार्डवरील काही पदार्थ कमी करण्याची वेळही मालकांवर आली होती. सध्याच्या वाढत्या दरामुळे पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.