CM Pramod Sawant : बांबोळी येथे बांधून तयार असलेल्या दुकान-गाळ्यांचे वाटप अखेर काल सोमवारी करण्यात आले. त्यामुळे आता यापुढे रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करू नये, दुकान-गाळ्यांतच व्यवसाय करावा. बेकायदेशीरपणा आढळल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे सांगत उपस्थित लाभार्थ्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सूचना करीत, एकप्रकारे तंबीही दिली.
इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, आमदार रुडाल्फ फर्नांडिस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना 29 गाळ्यांच्या दुकानगाळ्यांच्या मालकीपत्राचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, गोमेकॉत येणाऱ्या रुग्णवाहिकेला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी. उर्वरित दुकानगाळे 15 दिवसांत वितरित केले जातील. गाडेधारकांच्या म्हणण्यानुसार त्यांचे स्थलांतरही गोमेकॉच्या परिसरातच करण्यात आले. 60 दुकानगाळे उभारण्यासाठी सरकारने ३ कोटी रुपये खर्च केला असल्याचे त्यांनीनमूद केले.
60 गाळ्यांची उभारणी
29 जणांना गाळ्यांचे वाटप झाले असून, त्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यानंतर नारळ व उसाचा रस विक्री करणाऱ्यांना गाळे दिले जातील. त्यानंतर भाज्या व फळे, शेवटी चप्पल आणि कपडे विक्रेत्यांना गाळे दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जुलै 2021 मध्ये बांबोळी येथील गोमेकॉच्या प्रवेशद्वाराबाहेर असणारे 38 गाडे हटविले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने ऑगस्ट 2021 पासून स्थलांतराचे काम हाती घेतले. मे 2022 मध्ये 60 दुकानगाळ्यांची उभारणी पूर्ण झाली.
गोमन्तकची सूचना मान्य
बांबोळीतील या दुकान-गाळ्यांच्या परिसरही कचऱ्यांमुळे अस्वच्छ झाला होता. त्याविषयी दैनिक ‘गोमन्तक’ने वारंवार त्यावर प्रकाश टाकला होता. दुकानगाळे बांधले. परंतु ते मोफत न देता त्यांच्यावर काही भाडे आकारल्यास त्यातून सरकारलाही महसूल मिळेल, असे सूचित केले होते. ‘गोमन्तक’ने केलेली ही सूचना सरकारने अंमलात आणली आणि प्रत्येक गाडेधारकाला महिन्याकाठी एक हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे.
कायमस्वरूपी जागा
आमदार फर्नांडिस यांनी सरकारने गाडेधारकांची मागणी मान्य केली असल्याने त्यांना आता कायमस्वरुपी जागा मिळाली आहे. आणखी दुकाने वाढू नयेत आणि रस्त्यावर विक्री होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.