Goa Politics: खरी कुजबुज; विधानसभेत कोकणीतून हवी चर्चा!

Khari Kujbuj Political Satire: गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी लोकांचे प्रश्‍न, समस्‍या जाणून घेण्‍यासाठी गेल्‍या काही महिन्‍यांत प्रत्‍येक तालुक्‍यात घेतलेल्‍या जनता दरबाराला बहुतांशी ठिकाणी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

विधानसभेत कोकणीतून हवी चर्चा!

विधानसभा अधिवेशनात सर्व चर्चा कोकणी भाषेत व्हावी, अशी लोकांची, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांची, प्रबळ इच्छा आहे. परंतु, ही अपेक्षा प्रत्यक्षात उतरताना काही दिसत नाही. अधिवेशनातील बराच वेळ चर्चा इंग्रजीतून केली जात असल्याने, ज्यांना इंग्रजी समजत नाही, अशा ग्रामीण प्रेक्षकांसाठी विधानसभेचे कामकाज निरर्थक ठरत आहे. सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करत असल्याचा दावा करते, तर मग आता कोकणीतून चर्चा करून हे तत्त्व का जपले जात नाही, अशी चर्चा सध्या गावागावात सुरू आहे. राज्यात प्रत्येकाला कोकणी भाषा कळते, पण इंग्रजी सर्वांनाच समजते असे नाही. लोकशाहीत जनतेचा सहभाग महत्त्वाचा असताना, भाषिक अडथळ्यांमुळे तो कमी होत असल्याची भावना आता दिसून येत आहे. आता अंत्योदय तत्त्व जपले जाईल की अजून काही विचार होईल हे लवकरच कळेल.

तुये रुग्णालयाच्या श्रेयासाठी आमदाराची धावपळ

तुये येथील प्रस्तावित १०० खाटांचे रुग्णालय बांबोळी रुग्णालयाला जोडून, त्यातील रोजगार संधी पेडणे तालुक्यातील युवक-युवतींना मिळाव्यात, या मागणीसाठी तुये हॉस्पिटल कृती समितीने रविवारी जाहीर सभेचे आयोजन केल्याची बातमी प्रसिद्ध होताच, स्थानिक आमदार जीत आरोलकर यांची धावपळ सुरू झाली आहे. मांद्रेतील स्मशानभूमीच्या पत्रव्यवहाराचे काम पंचायतीने केले असतानाही, त्याचे श्रेय आमदारांनी लाटल्याची चर्चा होती. तर आता तुये रुग्णालयाच्या मुद्द्यावर कृती समिती सक्रिय पुढाकार घेत असून, त्यांना यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळेच आमदार शेवटच्या क्षणी आपले प्रयत्न दाखवून, ‘माझ्यामुळेच हे सर्व झाले,’ असे भासवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या पेडणे तालुक्यात जोरदारपणे सुरू आहे. कृती समितीच्या सक्रियतेमुळे आमदारांवर जनमताचा दबाव वाढल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे लोक बोलताहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

आता उत्तर शोधा!

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी लोकांचे प्रश्‍न, समस्‍या जाणून घेण्‍यासाठी गेल्‍या काही महिन्‍यांत प्रत्‍येक तालुक्‍यात घेतलेल्‍या जनता दरबाराला बहुतांशी ठिकाणी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. पण, त्‍यांच्‍या जनता दरबारचा भाजप किंवा सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्‍याचे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. सोबतच, विधानसभा अधिवेशन संपताच भाजपचे मंत्रीही पुन्‍हा ‘सरकार तुमच्‍या दारी’ अभियान सुरू करणार असल्‍याचेही ते म्‍हणाले. यातून सरकार पुन्‍हा जनतेच्‍या दारात नेण्‍याचा निर्णय भाजपने आधीच घेतला होता की, सरदेसाईंच्‍या जनता दरबारमुळे तो घ्‍यावा लागला, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्‍याचे काम दामूंनी जनतेवर सोडल्‍याचेच दिसते.

कणा नसलेले अधिकारी

राज्य नागरी सेवेतील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असून त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. काहींनी हल्लीच वगळलेले मंत्री गोविंद गावडे यांच्यावरील कारवाईशी त्याचा संबंध लावलेला आहे. पण त्यांतून एक गोष्ट स्पष्ट होते की, अनेक अधिकारी हे ताठ कण्याचे नसतात वरिष्ठांनी केलेली कोणतीही सूचना ही कायद्यात बसत नाही, असे सांगण्याचे धारिष्ट्य अनेकांना नसते वा ते धाडस ते करीत नसतात. त्यामागे काही कारणही असू शकते व त्यामुळेच जे कोणी धाडस करतात त्यांना वरिष्ठांच्या खप्पा मर्जीचा सामना करावा लागतो. अजय गावडे हे त्यांतील एक होत असे म्हटले जाते, तर सगूण वेळीप व खुटकर हे वेगळ्या गटांत मोडतात. तेच केवळ नव्हेत तर प्रत्येक खात्यांत असे कणा नसलेले अधिकारी असतात व त्यांत खरी अडचण होते ती, सर्वसामान्यांची असे सगळेच म्हणतात.

कोण असेल ‘हिरो’?

आपण अयोध्‍येवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्‍याची घोषणा मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी काही दिवसांपूर्वी केली. शिवाय मूळ हिंदू असल्‍याचा आपल्‍याला सार्थ अभिमान असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. हिंदू धर्माचा आपल्‍याला किती अभिमान वाटतो, हे भाजप आमदार असलेल्‍या गुदिन्‍होंनी गेल्‍या काही वर्षांत सातत्‍याने दाखवून दिलेले आहे. आपल्‍यालाही अभिनेता व्‍हायचे होते. पाच चित्रपटात काम करण्‍याचेही आपण निश्‍चित केले होते. पण, काही कारणांमुळे गोव्‍यात परतावे लागले असे सांगतानाच, अयोध्‍येसंदर्भातील चित्रपटात हिरो म्‍हणून कोण असेल हे सांगण्‍याचे मात्र त्‍यांनी टाळले. गुदिन्‍होंचे हिंदूप्रेम पाहून कदाचित हिरोची भूमिका तेच तर करणार नाहीत ना? असा प्रश्‍न अनेकांकडून केला जातोय.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; आरजी ‘हाता’ला साथ देणार?

काब्रालची लोकप्रियता कायम?

ज्याच्या सोबत जनता त्याच्याच माथी सत्तेचा मुकुट, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राजकारणात कोण जिंकणार व कोण हरणार ? जनता कोणाबरोबर? हे राजकीय नेत्याच्या पार्टीला येणाऱ्या संख्येवरून कळणार नाही व राजकीय नेत्यांबरोबर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवरून ही कळणार नाही. खरे म्हणजे आजची जनता हुशार झाली आहे. त्यांना राजकारण्यांना शेंडी कशी लावावी हे कळते. कुडचडे मतदारसंघात आमदार नीलेश काब्राल यांचा प्रसिद्धी ग्राफ उतरला असून येणारी निवडणूक काब्राल यांना जड जाणार, असा दावा करणारे अनेक आहेत. राजकारणात नव्यानेच प्रवेश केलेल्या नव्या चेहऱ्यामुळे काब्राल यांच्यापुढे कुडचडे मतदारसंघात आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, काब्राल यांच्या वाढदिवसाला झालेली गर्दी पाहून काब्राल यांचा ग्राफ उतरला नसून वाढला असल्याचे सिद्ध होत आहे, असा दावा काब्राल समर्थक करतात. आता या समर्थकांना कोण सांगणार की, गर्दी विजेता ठरवत नाही तर विजयासाठी दर्दी असावे लागतात.

भाऊंचा धाक!

मंत्र्यांच्‍या मतदारसंघांतील कामगार असल्‍यास वरिष्‍ठांना त्‍याचा कसा त्रास सहन करावा लागतो याचे उदाहरण जाणून घ्‍यायचे असेल तर कुणीही सांगेतील जलस्रोत खात्‍याच्‍या कार्यालयाला निश्‍चितच भेट द्यावी. या खात्‍याच्‍या कामासाठी खासगी वाहने भाडेपट्टीवर घेतली आहेत. त्‍यातील एक वाहन चालक म्‍हणे, आपण भाऊंचा माणूस असे सांगून आपले वाहन कामासाठी वापरणे बहुतेकवेळा टाळतोच. शनिवार-रविवारी हे वाहन इतर खासगी भाडी मारण्‍यासाठी वापरले जाते. आणि कुणी विचारलेच तर, मी भाऊंना सांगणार, असा धाक त्‍या विचारणाऱ्याला घातला जातो. आता भाऊंचा माणूस त्‍याला कोण बरे हात लावणार?

धाकूंची बोलती बंद

भाजपच्‍या एसटी मोर्चाचे पदाधिकारी असलेले धाकू मडकईकर हे सध्‍या त्‍यांचे ज्‍येष्‍ठ बंधू पांडुरंग मडकईकर यांच्‍या वक्‍तव्‍यामुळे कधी कधी अडचणीत येतात. काल मडगावातही तसेच घडले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभापतिंच्‍या विरोधात आक्षेपार्ह विधान केले, असा दावा करून सरदेसाईंच्‍या विरोधात फातोर्डा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्‍यानंतर ही माहिती पत्रकारांना देण्‍यासाठी मडगावात पत्रकार परिषद घेण्‍यात आली. त्‍यावेळी तिथे धाकूही उपस्‍थित होते. त्‍यावेळी पत्रकारांनी त्‍यांना तुमचे बंधू पांडुरंग मडकईकर हे भाजपच्‍या मंत्र्यांवर भ्रष्‍टाचाराचे आरोप करतात त्‍यावर तुमचे मत काय? असे विचारले असता, या बाबतीत मी काहीच बोलू इच्छित नाही, असे सांगून त्‍यांनी वेळ मारून नेली. आपल्‍या स्‍वत:च्‍या बंधूंच्‍या विधानावर न बोलणारे धाकू दुसऱ्यांच्‍या विधानावर कसे काय बोलू शकतात बुवा!

पडताळणीचा फार्स नको!

गोव्यात गेली अनेक वर्षे भाडेकरू व पर्यटक यांच्या नोंदणीची सक्ती आहे. भारत-पाक संघर्षाच्या वेळी तर पोलिसांनी अनेक भागांत अशी पडताळणी केली पण त्यात खरेच गांभीर्य होते का, असा सवाल केला जात आहे. आता पोलिस अधीक्षकांनी पुन्हा अशा पडताळणीचा आदेश जारी केलेला असून त्यामुळे म्हणे काही भागांत लोकांची सतावणूक तेवढी केली जाते. हल्लीच कर्नाटकांत गोकर्ण जवळील दुर्गम डोंगर भागात दोन लहान मुलांसह वास्तव्य करून असलेली रशियन महिला म्हणे काही काळ गोव्यात वास्तव्यास होती. तिचा व्हीसा संपून वर्षे उलटली मग ती यंत्रणेच्या लक्षात कशी आली नाही , तेवढ्याने भागत नाही तर असे आणखी किती विदेशी नागरिक गोव्यात आहेत असा प्रश्न केला जात आहे. सरकारची संबंधित यंत्रणा त्यांत कुठे कमी पडते, हा प्रश्नही त्यांतून उपस्थित होतो. यास्तव केवळ भाडेकरूंची पडताळणी करण्याबरोबरच अन्य सावधगिरीही बाळगायला हवी, नाही का?.

कोमुनिदादचा संघर्ष

कोमुनिदादच्या जागेत अतिक्रमण करुन अनियमित बांधकामांना अभय देण्यासाठी राज्य सरकार पुढे सरसावले आहे. याला कोमुनिदादचा विरोध आहे व असायलाच हवा. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांमध्ये वाहतूक व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो मात्र जास्तच आवेशाने बोलताना दिसत आहे. जर बेकायदेशीर बांधकामे पाडायचे झाले तर ५० हजार घरे पाडायची व त्यातील कुटुंबांना रस्त्यावर आणावे? असा प्रश्न ते करीत आहेत. त्यांचे म्हणणे चुकीचे असे म्हणता येणार नाही. पण ही बेकायदेशीर अतिक्रमणे करण्यास लोकांना प्रोत्साहन कुणी दिले, त्यांना परवाने, वीज. पाणी कनेक्शन दिले कोणी? यांनीच ना, अशी तमाम गोमंतकीयांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कोमुनिदादची जमीन ही मूळ गोमंतकीयांच्या पूर्वजांची असल्याने भविष्यात या प्रकरणाला रौद्र रुप प्राप्त होण्याची शक्यता बोलली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com