Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

Khari Kujbuj Political Satire: रो-रो फेरीबोट सेवेसाठी रायबंदर येथे उभारण्यात आलेल्या वाहनांच्या पार्किंग लॉटच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आता काही दिवसांवर आले आहे. पण विरोधी आघाडीचे अजूनही ‘अगं अगं म्हशीच’ चालू आहे. विरोधी नेते ज्या भाषेत एकमेकांवर दुगाण्या झाडत आहेत व एकमेकांची उणी दुणी काढत आहेत, ते पाहिले तर यांचे कसे जमणार, असा प्रश्न विरोधी एकजूटीची व त्यांतून रंगणाऱ्या विधानसभा कामकाजाची अपेक्षा बाळगून असणाऱ्या लोकांना पडला आहे. सगळेजण विरोधी एकजूटीमुळेच भाजपला दक्षिण गोव्यात दमदार पराभव पत्करावा लागल्याचा दावा करतात पण एरवी मात्र एकमेकांवर आरोप करत आहेत. अधिवेशन तोंडावर आलेले आहे तरीही प्रत्येकांची तोंडे परस्पर विरोधी दिशेला आहेत मग ते सत्ताधा-यांना धारेवर कसे धरणार व विधानसभा निवडणुकीत भक्कम विरोधी आघाडी कशी करणार हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे. एकजुटीचा अनुभव गाठीशी असताना ते असे का वागतात, ते मात्र अनेकांना कळेनासे झाले आहे. ∙∙∙

फितीचे दोन तुकडे झालेच नाहीत!

रो-रो फेरीबोट सेवेसाठी रायबंदर येथे उभारण्यात आलेल्या वाहनांच्या पार्किंग लॉटच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते या पार्किंग क्षेत्राचे फित कापून उद्‍घाटन करणार होते. परंतु फित कापलीच गेली नाही, उलट खासदार तानावडे यांना एका बाजूला बांधलेली फित सोडून उद्‍घाटन करावे लागले. यातील मजा म्‍हणजे फेरीबोटींचे फित कापून लोकार्पण झाल्यानंतर व्यवस्थापनातील एकाने कात्री असणारे ताट ‘द्वारका‘ या रो-रो फेरीबोटीत होते. महनीय व्यक्ती असलेली ‘गंगोत्री’ रो-रो फेरीबोट रायबंदरच्या जेटीवर ‘द्वारका’ पेक्षा अगोदर पोहोचली. महनीय व्यक्ती तत्काळ पार्किंग क्षेत्राच्या उद्‍घाटनाकडे वळले आणि त्यांनी तो कार्यक्रम उरकूनही घेतला. कात्री घेऊन तो कर्मचारी धावला खरा, परंतु उद्‍घाटन झाले होते. ∙∙∙

‘आप’चा विजयला ‘धोका’!

उशिरा आयोजित केलेल्‍या बैठकीवरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍यावर टीकास्र सोडलेल्‍या गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी युरींनी मंगळवारी घेतलेल्‍या बैठकीकडे पाठ फिरवली. काँग्रेसच्‍या बाणावली गट समितीने घेतलेल्‍या भूमिकेनंतर ‘आप’चे व्‍हेंझी व्‍हिएगश आणि क्रूज सिल्‍वा हे दोन आमदारही युरींच्‍या बैठकीला जाणार नाहीत, अशा विश्‍वास असल्‍यामुळेच विजयनी बैठकीकडे दुर्लक्ष केले. पण, व्‍हेंझी आणि क्रूज सिल्‍वांनी बैठकीला उपस्‍थित राहून आपण विरोधी पक्षनेत्‍यांसोबत असल्‍याचे दाखवून दिले. यातून ‘आप’ने विजयना जाणूनबुजून धोका तर दिला नाही ना? असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्‍थित केला जात आहे. ∙∙∙

गावडे यांची अस्वस्थता

प्रियोळ मतदारसंघातील एकेक पंचायती आमदार गोविंद गावडे यांच्या हातातून निसटतील असे चित्र तयार करण्यात आले होते. बेतकी खांडोळा सरपंच व उपसरपंचांवर अविश्वास ठरावही दाखल झाले होते. त्यानंतर गावडे यांनी बाजी पालटवली. पंचायत निवडणूक ही पक्षीय पातळीवर लढवली जात नसली तरी सत्ताधारी आमदाराचेच समर्थक पंचायतींवर सरपंच, उपसरपंचपदी असतात हे ठरून गेलेले असते. त्यामुळे आपण भाजपचा आमदार असतानाही पंचायती अस्थीर करण्याचे कारस्थान कोणाचे असा प्रश्न गावडे यांनी मंगळवारी पणजीतील बैठकीत उपस्थित केला. त्यांना काय उत्तर मिळाले हे त्यांनी मात्र अद्याप कळलेले नाही. ∙∙∙

अधिवेशन कालावधीचाहा घ्या हिशेब!

पावसाळी अधिवेशन १५ दिवसांचेच का असा प्रश्न अनेकांना पडला असेल. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तीन दिवस जमेस धरून १८ दिवसांचे अधिवेशन होते, असा हिशेब सादर केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर त्या अधिवेशनात चर्चा झाली होती. नियमानुसार कोणत्याही नव्या वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण होते. त्यामुळे त्याचा कालावधी या अधिवेशनात गणला जाण्याचा हिशेब राजकीय वर्तुळातच चर्चेचा विषयझाला आहे. ∙∙∙

अजय गावडेंना मिळाला न्याय!

मंत्री गोविंद गावडे यांना घरी पाठवल्यानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खात्यांमध्येही साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी जो आदेश जारी झाला त्यात प्रामुख्याने क्रीडा व युवा व्यवहार व कला आणि संस्कृती खात्यातील संचालकांमध्येही बदल केले आहेत. सर्वात महत्त्‍वाचे म्हणजे राज्य प्रशासनातील बुद्धिमान व कर्तव्यदक्ष अधिकारी मानले गेलेल्या अजय गावडे यांना क्रीडा खात्यात परत आणले आहे. दोन वर्षांपूर्वी या अधिकाऱ्याने गावडेंच्या उद्धटशाहीशी सामना केला होता. गुजरात येथील दौऱ्याच्यावेळी गावडेंनी त्यांचा पाणउतारा केला होता. एवढेच नाही तर त्यानंतरही त्यांच्या सतावणुकीस सुरुवात केली होती. महत्त्वाचे म्हणजे अजय गावडे एवढा दबाव येऊनही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले व मंत्र्यांच्या दबावाखाली त्यांनी कोणतेही चुकीचे काम केले नाही. त्यांनी जेथे जेथे काम केले त्या खात्यांचा आलेख त्यांनी वाढवत नेला. मुख्यमंत्र्यांना या तडफदार अधिकाऱ्याच्या कार्याची माहिती होती, त्यामुळे त्यांनी संधी मिळताच त्यांना आता पुन्हा क्रीडा खात्यात आणले आहे. सगुण वेळीप यांनाही कला व संस्कृती खात्यातून राजशिष्टाचार खात्यात नेले असून तेथे आता विवेक नाईक यांची बदली झाली आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: विरोधकांच्‍या बैठकीला विजय सरदेसाई, वीरेश गैरहजर! ‘आप’च्‍या दोन्‍ही आमदारांची उपस्‍थिती

नको असलेले डोईजड पद!

सत्ताधारी आघाडीची मंगळवारी बैठक झाली व तिला विधानसभेचे अध्यक्ष उपस्थित राहिल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. प्रश्‍न आहे, तो विधानसभा अध्यक्षाने पक्षीय राजकारणापासून कसोशीने अलिप्त रहायला हवे आणि त्यांची वागणूकही राजकीयदृष्ट्या अलिप्त असायला हवी. परंतु गोव्यात विचित्र परिस्थिती आहे. येथे कोणालाच सभापतीपद नको आहे. स्वतः रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची आपली अभिलाषा जाहीररित्या व्यक्त केली आहे. मंत्रिपद हवे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या व पक्षश्रेष्ठींच्या ‘गुडबुक्स’मध्ये रहावेच लागते व पक्ष संघटनेलाही नाखुश करून चालत नाही. दुसऱ्या बाजूला ज्यांची म्हणून सभापतिपदासाठी नावे घेतली जातात, त्यांना कोणालाच ते पद नको आहे. एक मंत्री तर आपले नाव सभापती पदाच्या संभाव्य यादीत समाविष्ट झाले म्हणून नाराज बनले होते. गोव्यात सभापतिपदाबाबत एवढा तिटकारा असेल तर तो ज्याच्या त्याच्या वागणुकीवरून दिसल्याशिवाय कसा राहिल. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; बिबट्यालाही राहायला फ्लॅट हवा!

नव्या मंत्र्यांना कितीसा काळ मिळेल?

ही विधानसभा संपुष्टात यायला आता फक्त दीड पावणेदोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, मात्र मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली होताना दिसत नाहीत. आता यापुढे जरी मंत्रिमंडळ बदल झाला तरी नवीन मंत्र्यांना कामासाठी किती काळ मिळेल याबाबत संभाव्य मंत्रिपदासाठी जी काही नावे समोर येताहेत त्या आमदारांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांतच चर्चा होताना दिसत आहे. येनकेन प्रकारेण सध्या सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून संभाव्य मंत्री होण्यास इच्छुक आमदारांना मंत्रिपदाचे गाजर दाखवले जात आहे, हे मात्र पक्के! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com