Amarnath Panjikar: ‘शाखेतील शिक्षण ज्याचे त्याला कसे कळावे? हृदयात प्रेम ज्याच्या त्यालाच हिंदुत्व ठावे.’ हिंदू धर्म ही एक जीवनशैली आहे. अपरिपक्व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी योग्य पुस्तके वाचून हिंदू धर्म समजून घ्यावा. स्वयंघोषित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय पंडितांकडून हिंदू धर्म त्यांना कदापि कळणार नाही, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, भाजपने कितीही धडपड केली तरी ‘जुडेगा भारत जितेगा इंडिया’ हेच सत्य आहे.
हिंदू धर्म ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची, नेत्याची जहागीर अथवा खासगी मालमत्ता नाही.
हिंदू हा सनातन धर्म आहे, जो आम्हीही आमच्या खासगी जीवनात तितक्याच तन्मयतेने पाळतो. आमच्याही दैनंदिन जीवनात देव, धर्म, व्रतवैकल्ये आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे.
सरकारी खर्चाने कोणत्यातरी मंदिरात जाऊन पूजा पाठ करणे, हे देवालाही आवडणारे नाही. त्यामुळे राज्याच्या संविधानात्मक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे.
‘इंडिया’ एक आघाडी
‘इंडिया’ ही आघाडी आहे, तो राजकीय पक्ष नाही. ‘इंडिया’ आघाडीतील बहुतांश नेते, कार्यकर्ते हिंदू धर्मातील असून, धर्मरक्षणात त्यांचाही मोठा वाटा आहे. केवळ सणसणाटी निर्माण करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी बालिश वक्तव्य करून आपलेच हसे करून घेतले आहे, असे पणजीकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
थकबाकी द्या!
गोव्यातील हिंदूंचा सर्वात मोठा सण आठवड्यावर येऊन ठेपला आहे. गोव्यातील गरीब व गरजू जनता समाजकल्याण खात्याच्या अर्थसाहाय्याच्या प्रतीक्षेत आहे. 320 कोटींची थकबाकी सरकारने आता तरी लाभार्थी जनतेला द्यावी, असेही पणजीकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.