Margao Municipality मडगावच्या जुन्या मासळी मार्केटच्या जागेत येणाऱ्या प्रस्तावित बहुमजली पार्किंग प्रकल्पात रुफ टॉप रेस्टॉरंट सुरू करण्याचा जाे प्रस्ताव आहे त्याला यापूर्वी विरोध झालेला असताना आता माजी नगराध्यक्ष व सध्याचे नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी परत एकदा विराेध केला आहे.
हे रेस्टॉरंट बांधायला देऊ नका, अशी मागणी करणारे पत्र नगरविकास मंत्री विश्र्वजीत राणे यांना पाठविले आहे. मंगळवारी (ता.१२) घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिरोडकर यांनी ही माहिती दिली.
मडगावातील पार्किंग समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प बांधला जात आहे. या प्रकल्पातच जर रेस्टॉरंट येत असेल तर त्याचे पार्किंग कुठे केले जाईल, हा प्रश्र्न उपस्थित होत असून यामुळे शहरातील पार्किंग समस्या अधिकच बिकट होईल, अशी शंका शिरोडकर यांनी व्यक्त केली.
आपण नगराध्यक्ष असताना मालभाट पीकअप स्टँड जागेत असाच पार्किंग प्रकल्प उभारण्यासाठी निविदाही जारी झाल्या होत्या. मात्र, नंतर त्यात काही राजकारण्यांनी विघ्न आणले, त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहू शकला नाही.
मडगावात पार्किंग प्रकल्प उभारणे ही तातडीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने आपला सहा कोटींचा निधी सरकारच्या स्वाधीन केला आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
मडगावात पार्किंग प्रकल्पात रेस्टॉरंट उभारण्याचा कुठलाही ठराव पालिकेने घेतला नव्हता, त्यामुळे पार्किंग सोडून या प्रकल्पात कुठलाही व्यावसायिक प्रकल्प घुसवण्याचा प्रयत्न केल्यास आमचा त्याला विरोध असणार आहे. याची कल्पना आपण आपल्या पत्रातून नगरविकास मंत्र्यांना दिली आहे. - घनश्याम शिरोडकर, नगरसेवक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.