Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

Khari Kujbuj Political Satire: दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकर मारून पितात, अशी मराठीत एक बोध वाक्य आहे. काँग्रेस पक्षाची स्थिती अशीच झाली आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकर मारून पितात, अशी मराठीत एक बोध वाक्य आहे. काँग्रेस पक्षाची स्थिती अशीच झाली आहे. काँग्रेस नेते ‘व्होट चोरी’चा आरोप करून गोंधळ घालतात खरे. पण त्यांना ‘व्होट चोरी’ पेक्षा जास्त भीती वाटते ती उमेदवार चोरीची मागे कसे ‘होलसेल’ आमदार फुटले याचा अनुभव काँग्रेस पक्षाला आहे. त्याच कारणामुळे काँग्रेस जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित करीत नाही. गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षांनी व इतर नेत्यांनी ही भीती सरळ सरळ व्यक्त केली आहे. आपण भाजपाच्या आधी उमेदवार घोषित केले तर उमेदवारच पळविले जातील, अशी भीती काँग्रेसला सतावत आहे. अमित साहेब ‘कोंबड झाकलं म्हणजे दिवस उजाडायचा राहत नाही’ याची आठवण ठेवा.

होडार जेटी भाजपला त्रासदायक

जिल्‍हा पंचायत निवडणूक अवघ्‍या महिनाभरावर आलेली असताना शेल्‍डे पंचायत मतदारसंघात समाविष्‍ट असलेल्‍या असोल्‍डा, शेळवण व होडार या ठिकाणी ज्‍या प्रस्तावित जेटींचा प्रकल्‍प पुढे रेटला जातो त्‍याचा बराच मोठा फटका भाजपला बसण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे शेल्‍डे मतदारसंघाचे सध्‍या प्रतिनिधीत्‍व करणारे जिल्‍हा पंचायतीचे उपाध्‍यक्ष सिद्धार्थ गावस देसाई या विरोधाची धार कितपत कमी करतात ते पहावे लागणार आहे. दुसऱ्या बाजूने या जेटींना विरोध करणाऱ्यांत आघाडीवर असलेले पर्यावरण कार्यकर्ते जेम्‍स फर्नांडिस हे ‘आप’च्‍या उमेदवारीवर या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्‍यामुळे या जेटींचा मुद्दा जेम्‍स यांना फायद्याचा ठरू शकतो. त्‍यामुळे या मतदारसंघात भाजपची रणनिती काय असेल? यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पोलिस ठाण्याचे ‘सीसीटीव्ही’ गायब?

राज्यातील पोलिस स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक… हे सगळ्यांनाच माहिती आहे. काही ठिकाणी कॅमेरे ताठ उभे, लाल दिवे लुकलुकत आपली ड्युटी बजावताना दिसतातही. पण किनारी भागात मात्र चित्रच निराळे! इथल्या काही पोलिस स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही दिसलेले नाही. पोलिसांच्या कामापेक्षा ‘सीसीटीव्ही’ नसल्याची चर्चा मात्र किनारपट्टीवर जोरात सुरू आहे. यात गंमत म्हणजे, सीसीटीव्ही नसल्याने स्थानिक लोक तर उलट पोलिस स्थानकात जायलाच कचरत आहेत. लोकांची ही भीती, पोलिस स्थानकांची ही गोपनीयता आणि गृहखात्याची शांतता… याबाबत सध्या किनारी भागात भन्नाट चर्चा रंगली आहे!

Khari Kujbuj Political Satire
Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

कुर्टीसाठी काँग्रेसकडून उमेदवार निश्‍चिती

फोंड्यात भारतीय जनता पक्षाची दोन शकले आहेत. एक म्हणजे रवी नाईक गट आणि दुसरा म्हणजे अपूर्व आणि इतरांचा. आता या दोन गटांचे काही जमेना पण एकमेकांच्यावाचून होईना, असा प्रकार आहे. कारण जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपची ही दोन्ही शकले एकत्र आली नाहीत, तर विरोधकांचे नक्कीच फावेल, असा होरा राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. आता या दोन गटांपकी कुणाला जिल्हा पंचायत तिकीट मिळणार हे अजून तरी ठरलेले नाही. त्यातच गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मगो पक्षाच्या प्रिया च्यारी यांनी बाजी मारली होती, त्यामुळे आता मगो समर्थक की भाजप समर्थक उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल, हेही अजून ठरलेले नाही. मात्र विरोधातील काँग्रेस पक्षाकडून जय्यत तयारी सुरू असून पेशाने वकील असलेल्या एका उमेदवाराला कुर्टी जिल्हा पंचायतीसाठी मुक्रर करण्यात आले आहे, फक्त नाव जाहीर करायचे बाकी आहे.

जुझे फिलीपचा त्रागा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी कॉंग्रेस विश्वासात घेत नसल्याचा त्रागा करणे सुरु केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारले देखील नसल्याचे जुझे फिलीप यांना वाईट वाटले आहे. यामुळे रागाने त्यांनी दक्षिण गोव्यात सहा जागा लढवण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस जिंकून यावेत, यासाठी जुझे फिलीप यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्यांनाही यावेळी जुझे फिलीप आठवू नयेत, याचे मनस्वी दुःख जुझे फिलीप यांना झाले आहे.

सत्ताधाऱ्यांमध्ये आलबेल?

नुकताच म्हापसा पालिका मंडळाची बैठक झाली. यावेळी अनेक प्रस्तावांवर चर्चा झाली, यातील काही ठराव मंजूर झाले तर काही बारगळले. या बैठकीच्या अजेंड्यावर रक्ताच्या नात्यासंबंधित दुकाने हस्तांतरणाचा विषय होता. ज्यामध्ये एका नगरसेवकाने अर्ज केला होता. या अर्जावर सत्ताधारी पक्षातील दोघांनी जोरदार हरकत घेतली. मुळात ज्या नगरसेवकाने आक्षेप नोंदविला तो लोकप्रतिनिधी व ज्या नगरसेवकांचा अर्ज आला होता, या दोघांत चांगले ‘ट्युनिंग’ अन् मैत्री आहे. असे असताना, आपल्याच गटातील नगरसेवकांच्या अर्जाला हरकत घेतल्याने, सत्ताधाऱ्यांमध्ये खरोखर आलबेल म्हणायचे की, आलेल्या अर्जाची व्यवस्थित पूर्तता झाली नाही म्हणून विरोध म्हणायचा? कारणं काहीही असली तरी पाणी कुठेतरी मुरत आहे, याला वाव दिसतो.

उमेदवार जाहीर करण्यात चालढकल

राज्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापला उमेदवार निर्धारित करण्यासाठी धडपडत आहे, मात्र त्यात एक गोम आहे, एखाद्या राजकीय पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला तर त्याला अन्य राजकीय पक्ष पळवण्याचा प्रकार होणार हे गृहीत धरून आपापला उमेदवार जाहीर करण्यात सध्या चालढकल चालली आहे. सत्ताधारी भाजपकडे उमेदवारांची जंत्री आहे, त्यामुळे आपला उमेदवार हा परफेक्ट असावा यासाठी भाजपेतर पक्षांकडून धडपड चालली आहे. फोंड्यात सध्या उमेदवार जाहीर करण्याच्याबाबतीत सध्या तरी सामसूम आहे. दबकत दबकत उमेदवारांची नावे घेतली जात आहेत, त्यामुळे कोण कुठल्या पक्षातर्फे उमेदवारी दाखल करणार हे कळायला मार्गच नाही.

निवडणूक आयोगाचे कार्यालय रविवारीही खुले?

जिल्‍हा पंचायत निवडणुकीतील युतीबाबत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डशी चर्चा सुरू असतानाच आरजीपीचे अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांनी रविवारी दिल्ली गाठली. आपण युतीसंदर्भातच चर्चा करण्‍यासाठी दिल्लीला जात असल्‍याचे रविवारी परब यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले. पण, आम्‍ही निवडणूक आयोगाच्‍या अधिकाऱ्यांकडे समस्‍या मांडण्‍यासाठी दिल्लीत गेलो होतो, असे आमदार बोरकर यांनी सोमवारी सांगितले. त्‍यामुळे बोरकर यांचे म्‍हणणे खरे असेल तर दिल्लीतील निवडणूक आयोगाचे कार्यालय रविवारीही खुले असते का? आणि परब खरे बोलत असतील तर युतीबाबत ते कोणत्‍या पक्षाच्‍या श्रेष्‍ठींशी चर्चा करण्‍यासाठी गेले होते? असे प्रश्‍‍न मतदारांकडून विचारले जात आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Agriculture: कृषी लागवडीत 1.927 हेक्‍टरने घट! भात लागवडीचे 10,207 हेक्‍टर क्षेत्र घटले; 11 वर्षांचा तपशील

..तर युती होणार?

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या दोन पक्षांशी युती करण्‍याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतल्‍याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी सांगितले. पण, दोन ते तीन जागांबाबत या दोन्‍ही पक्षांच्‍या अध्‍यक्षांसोबत चर्चा झाल्‍यानंतर युतीवर शिक्‍कामोर्तब केले जाईल, असेही ते म्‍हणाले. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या पक्षांच्‍या नेत्‍यांमध्‍ये युतीची चर्चा गेल्‍या काही महिन्‍यांपासून सुरू होती. पण, फॉरवर्ड आणि आरजीपीने युती आणि जागा वाटपावर शिक्‍कामोर्तब होण्‍याआधीच काही मतदारसंघांतील उमेदवार निश्‍चित करून त्‍यांचा प्रचारही सुरू केला आहे. आता त्‍याच दोन ते तीन मतदारसंघांतील उमेदवारीवर काँग्रेसचा ‘डोळा’ असेल, तर युती होईल का? असा प्रश्‍‍न फॉरवर्ड आणि आरजीपीच्‍या कार्यकर्त्यांना पडला आहे.

पाणी कसे वाचवाल?

पिण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्यापैकी ४० टक्के पाण्याचा हिशेब लागत नाही, असे खुद्द मंत्री सुभाष फळदेसाई यांनी जाहीरपणे सांगितले आहे. पण पाणी वाहून जाते ते बंद करणे यासाठी यंत्रणा काम करत नाही, असे दिसते. आमयावाडा टोंक येथे जलवाहिनीला गळती लागल्यास दोन वर्षे झाली. संबंधितांनी तक्रारी केल्या तरी गळती बंद झालेली नाही. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी लागणारे साहित्य कोणी आणावे असा प्रश्न आहे. लोकांनी पैसे देण्याची तयारी दाखविली तरी दुरूस्ती झालेली नाही. अशाने पाण्याचा हिशेब मिळणार तरी कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवोलीतील राजकारण

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो कोणामुळे जिंकल्या, अशी चर्चा गेले दोन दिवस सुरू झाली आहे. त्याला आता लोबो यांनीच उत्तर दिले आहे. कोणा एकामुळे आपण जिंकले नाही, असे त्यांनी ठणकावले आहे. सर्वजण सोबत आल्याने आपल्याला विजय मिळाला असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे आता लोबो यांचा विजय आपल्यामुळे झाला, असा दावा करणाऱ्यांवर लोबो यांना जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने धडा शिकवण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. तीन पार पाडल्यास विधानसभेचे स्वप्न भंग पावेल, असे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com