Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्री झाले न्यायाधीश!

Khari Kujbuj Political Satire: राज्य सरकारने तयार केलेल्या ‘माझे घर’ योजनेचे लोकांना केवळ अर्ज देणेच सुरू आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री झाले न्यायाधीश!

हडफडे प्रकरणातील खलनायक असलेल्या लुथरा बंधूंना थायलंडमध्ये स्थानबद्ध करून भारतात व गोव्यात आणले जाणार हे स्पष्ट झाल्यावर आपल्या दोतोर मुख्यमंत्र्यांनी त्यांना कठोर शिक्षा देण्याचे संकेत दिल्याने अनेकांच्या विशेषतः न्यायदान क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रत्यक्षात त्या बंधूंवर तसे खात्रीशीर आरोप करून भागणार नाही तर ते सिध्द करण्यासाठी वस्तुनिष्ठ पुरावा न्यायालयात सादर करायला हवा. तो सिध्द झाला व ते दोषी ठरले तरच त्यांना शिक्षा होईल, पण ती सरकारने नव्हे तर न्यायालयाने द्यायला हवी. गोव्यातील अनेक प्रकरणे पाहिली तर संशयित हे पुराव्याअभावी सुटतात वा त्यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यासाठी काय करता येईल ते पाहणे गरजेचे आहे, पण त्याकडे भर न देता सरकारचा केवळ घोषणा करण्यावर अधिक भर असतो असे लोकांचे मत बनत चालले आहे. ∙∙∙

‘माझे घर’ योजनेचे केवळ अर्ज देऊन भागणार का?

राज्य सरकारने तयार केलेल्या ‘माझे घर’ योजनेचे लोकांना केवळ अर्ज देणेच सुरू आहे. प्रत्यक्षात ‘माझे घर’ योजनेविरोधात अनेकजण न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाकडून सुनावणी व आदेश येणे बाकी आहे. मडगावातही हे अर्ज देणे सुरू आहे. हे अर्ज केवळ मडगावात स्थलांतरीतांच्या ज्या बेकायदेशीर झोपडपट्टी तयार आहेत तेथील लोक लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, सध्या एसआयआर प्रक्रिया सुरू आहे, या प्रक्रियेत अनेकजण मतदारयाद्यांतून गायब होणार आहेत. अशा परिस्थितीत मग ‘माझे घर’ योजनेचा उद्देशच नष्ट होण्यासारखा आहे. मोतीडोंगरचे उदाहरण घेतल्यास २००२ मध्ये तिथे केवळ १४०० ते १५०० मतदार होते. आता ३००० पेक्षा जास्त मतदारांची नावे मतदारयादीत आहेत. एसआयआर प्रक्रियेची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली, तर मग जे १५०० पेक्षा जास्त मतदार आज तिथे आहेत. त्यांची नावे गायब झाली तरीसुद्धा त्यांना ‘माझे घर’चा लाभ मिळेल का? मोतीडोंगरवर आता झोपड्या नाहीत तिथे पक्की घरे आहेत. आता १५०० अतिरिक्त लोकांना सामावून घेण्यासाठी एक मजली बेकायदेशीर पक्की घरे बांधली जातील का? हीच चर्चा सर्वत्र चालू आहे.

आता माकडचेष्टा बंद करा!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या वाढदिवसादिवशी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आणि आरजीचे प्रमुख व्यासपीठावर आले आणि त्यांनी भविष्यातील युतीचे संकेत दिले. जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसचे अमित पाटकर आपण शेवटपर्यंत आरजीपीच्या युतीविषयी आशावादी आहोत असे सांगत राहिले, पण कुठे माशी शिंकायची ती शिंकली आणि मनोज परब यांनी ‘उजो’ म्हणत युतीच्या बाहेरचा रस्ता पकडला. त्यावर आपण वेगळा रस्ता पकडला आहे, तर इतरांवर टीका करून काहीच फायदा नव्हता. पण आता मनोज परबांनी विजय सरदेसाई आणि अमित पाटकर यांच्यावर टीका करून त्यांना शिंगावर घेतले आहे. शुक्रवारी मात्र, ‘प्रँक’ हा शब्द बराच गाजला. यावरूनच सरदेसाई आणि परब यांनी एकमेकांवर ‘प्रँक’ कसा केला हे दाखवून दिले. असो या तिघांचे भांडण सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत तरी विरोधक म्हणून एकमेकांवर टीका करून सत्ताधाऱ्यांना नमवणे शक्य आहे का, याचे आत्मचिंतन करावे. या माकडचेष्टा बंद कराव्यात, जेणेकरून मनोरंजन म्हणून तुमच्याकडे जनता पाहणार नाही.

Khari Kujbuj Political Satire
Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

लुथरा खरे बोलतील काय?

हडफडेतील नाईट क्लबमधील दुर्घटनेनंतर त्याचा मालक गौरव व सौरभ लुथरा थायलंडला पळाले. तेथील पोलिसांनी त्यांना पकडले आणि आता त्यांना गोव्यात आणण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झाली. त्यामुळे सरकारचे कौतुक करणे येथे योग्य नाही. कारण ही दुर्दैवी घटना असल्यामुळे ते त्यांचे कर्तव्यच. बेकायदेशीरपणे एवढी वर्षे लुथरा नाईट क्लब चालवीत होते. राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी या प्रकरणाची दखल घेतल्याने त्याचबरोबर स्थानिक आमदार आणि नेत्यांना या विषयावरील चर्चेत सहभागी करून घेतले. त्यामुळे गोव्यातील वास्तव जगासमोर पोहोचले आणि सरकारविरोधात उघडपणे नव्हे, तर खालच्या आवाजात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. असो लुथरा बंधू गोव्यात येतील, सरकार पोलिसांची पाठ थोपटेलही. पण ते जे काही खरे बोलतील, ते सर्व जनतेसमोर येईल का? कारण लुथरा बंधू कोणाकोणाशी हाताला धरून हा व्यवसाय करीत होते, ते जर पोलिसांसमोर वधले तर ते नोंद होईल का? असे प्रश्न आत्तापासूनच सतावू लागले आहेत.

लोबो खरोखरच अनभिज्ञ?

हडफडे येथे क्लब आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर आमदार मायकल लोबो यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रशासनावर तोंडसुख घेतले. लोबो यांना किनारी भागात विशेषतः कळंगुट, बागा, हडफडे येथे असे प्रकार घडतात याची माहिती नसण्यावर कोणीच विश्वास ठेऊ शकत नाही. लोबो यांनी अशा बेकायदेशीर गोष्टींविरोधात आवाज का उठवला नाही असा प्रश्न विचारला जात आहे. आताही लोबो यांनी उर्वरित बेकायदेशीरपणा कायमचा मुळापासून उखडून टाकण्यासाठी पावले टाकावीत असे त्यांना समाज माध्यमांवर सुचवले जात आहे.

मयेत मतदारांची चंगळ

मये मतदारसंघात जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सध्या मतदारांची चंगळ होत आहे. मोठा खर्च करणारा एक उमेदवार सध्या रिंगणात आहे. पार्ट्या, दारू यांना सध्या मर्यादा राहिलेली नाही. कार्यक्रम, स्पर्धा यांना पुरस्कर्ता शोधावा लागत नाही. सध्या पैशाचा पाऊस पडत आहे. अनेकजण हात धुऊन घेत आहेत. पैशाला काही कमी नाही. कुठे किती खर्च करू सांगा अशी विचारणा करणारा उमेदवार मिळाला की खर्चाच्या कल्पना सुचवणारे मतदार खूश असतात. तसेच काहीचे वातावरण मये मतदारसंघात आहे. मतमोजणीपर्यंत हा उत्साह टिकेल असे सांगण्यात येत आहे.

उंदीर कोण?

भाजप पक्ष सोडण्याचा विचार झाल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संजय वेळीप यांना बोलावून घेतले व पक्ष सोडण्याची कारणे विचारली. त्यावेळी इतर पक्षातून आलेले बाबू कवळेकर आपल्याला अपमानास्पद वागणूक देतात असे वेळीप यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, की उंदराच्या भीतीने घराला आग का लावता? उंदीर या बिळातून त्या बिळात उडी मारत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पक्षातील उंदीर कोण हे नेमके ठाऊक आहे बरे. कॉंग्रेसमधून भाजपात आलेले उंदीर असे तर मुख्यमंत्र्यांना म्हणायचे नाही ना? संजय वेळीप यांनीच ही गोष्ट सांगितली आहे, त्यातील खरेखोटेपणा सुज्ञांनी तपासून पाहिलेला बरा, हेही तेवढेच खरे!

हे खरे गोंयकारपण

पाळी मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांत सरळ लढत आहे. कॉंग्रेसचे भानुदास सोननाईक तर भाजपचे सुंधर नाईक निवडणूक रिंगणात आहेत. मतदारसंघ आटोपशीर त्यामुळे प्रचार करणारे कधी ना कधी एकमेकांसमोर येणार हे ठरून गेलेले. झाले तसेच. भानुदास व सुंधर हे एकमेकांसमोर प्रचारादरम्यान आले. त्यांनी हस्तांदोलन केले. तेथे उपस्थितांनी त्यांचे एकत्रित छायाचित्र टिपले आणि ते व्हायरल झाले. राजकारणातील गळेकापू स्पर्धेत असे दृश्य आता दुर्मीळ झाले आहे. निवडणुकीनंतर दोघांनाही पाळी मतदारसंघातच रहावे लागेल. एकमेकांची कधी तरी भेटही होईल याची जाण ठेवत खिलाडूवृत्तीने एकमेकांचे त्यांनी केलेले स्वागत चर्चेचे ठरले आहे.

संजय होता बाबूंच्या पे रोलवर!

राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा कायमचा शत्रूही नसतो. जसा वारा वाहतो तसे राजकारणी सूप धरतात. भाजपा सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेसची गिरदोली जिल्हा पंचायत मतदारसंघात झेडपीची उमेदवारी मिळविलेले भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप यांचे पती संजय वेळीप हे आपल्या पे रोलवर होते असे बाबू कवळेकर यांनी जाहीर सभेत सांगून संजय वेळीप याची पोलखोल केली. आपण उपमुख्यमंत्री असताना संजय वेळीप मंडळ अध्यक्ष होते, तेव्हा त्याला आर्थिक मदत व्हावी म्हणून आपण संजय याला पे रोलवर ठेवले होते. एवढेच नव्हे भाजपाने संजय वेळीप याला मंडळ अध्यक्ष केले त्याच्या पत्नीला जिल्हा पंचायत अध्यक्ष बनविले. आणखी बरीच व्यक्तिगत मदत केली. संजयसाठी आणखी काय करण्याचे कमी राहिले म्हणून संजयने पक्ष सोडला? बाबूच्या या प्रश्नाला संजयकडे काय उत्तर आहे हे पाहावे लागेल.

प्रचारातील हुडहुडी

राज्यात जिल्हा पंचायतीच्या उमेदवारांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे. निवडणुकीला अवघे काहीच दिवस राहिले असल्याने कार्यकर्ते, नेते दिवसरात्र एक करून प्रचार करत आहेत. राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून हुडहुडी भरणारी थंडी पडत आहे, परंतु प्रचारा दरम्यानच्या या थंडीला शेकोटी पेटवून मात देत डिचोली परिसरात भाजप नेते जोरदारपणे उमेदवारांचा प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान १२ ते १५ अंशांपर्यंत पारा खाली गेला असल्याचे यांत्रिक आकडेही समाज माध्यमांवर डॉ. साळकरांनी टाकले आहेत. या कडाक्याच्या थंडीत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळकर, माजी आमदार राजेश पाटणेकर, उमेदवार पद्माकर माळी, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, विश्वास गवाणकर, संतोष माळी, संजय मापसेकर आणि इतरांच्या उपस्थितीत कोपरा बैठकीदरम्यान शेकोटी पेटवून प्रचारासोबतच थंडीचा आनंद लुटत आहेत. त्यांच्या या थंडीतील प्रचाराबाबत सध्या चर्चा रंगली आहे.

मग चर्चिल पराभूत झाले कसे?

चर्चिल आलेमाव हे एकएकदा असे बोलतात की ते ऐकून कुणी चक्रावून गेल्‍यास कुणाला नवल वाटणार नाही. कालही त्‍यांनी असेच वक्‍तव्‍य केले. गोव्‍यातील चाळीसही मतदारसंघात आपले पाठीराखे असून तिथे निवडणुकीत उभे राहिल्‍यास तीन ते चार हजार मते मला सहज मिळू शकतील. चर्चिल आलेमाव यांनी २०१४ साली दक्षिण गोव्‍यातील लोकसभेची निवडणूक लढविली होती. दक्षिण गोव्‍यात एकूण २० मतदारसंघाचा समाविष्‍ट आहे आणि एका मतदारसंघात दोन हजार मते पकडली, तर चर्चिलना त्‍या निवडणुकीत किमान ३५ ते ४० हजार मते पडणे आवश्‍‍यक होते. पण त्‍यांना त्‍या निवडणुकीत कशीबशी ११ हजार मते पडली. प्रत्‍येक मतदारसंघात जर चर्चिल यांच्याकडे मते आहेत, तर २०१४ च्‍या निवडणुकीत त्‍यांचा दारुण पराभव का बरे झाला? चर्चिल यावर काही खुलासा करू शकतील का?

Khari Kujbuj Political Satire
Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

सरपंचांना भीती का वाटली?

हडफडेतील दुर्घटनेला परवा आठवडा होणार आहे. केवळ स्थानिकच नव्हे, तर राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी तोच विषय लावून धरल्याचे पाहायला मिळते. पण मुख्य मुद्दा तो नाही, तर शनिवारी मध्यरात्री त्या नाईट क्लबमध्ये आग भडकल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर तावातावाने वल्गना करणारे हडफडेचे सरपंच व सचिव यांना सरकारी यंत्रणेने फास आवळल्यावर अटकपूर्व जामिनाची गरज का भासली अशी चर्चा आता होऊ लागली आहे. पंचायत सचिव यापूर्वीच निलंबित केले गेले आहेत, पण ते चौकशीसाठी पुढे येत नाहीत तर त्या दिवशी या बेकायदा बांधकामांबाबत वल्गना करणारे व सरकारवर ताशेरे झाडणारे सरपंच अटक चुकविण्याच्या प्रयत्नात असल्याने या प्रकरणात बरेच पाणी मुरत असल्याचे बोलले जात आहे.

विजयबाब सांगतात ते खरे का?

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी एक गंभीर आरोप केला आहे. गोव्यात कित्येक नाईट क्लब बेकायदेशीर चालू आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षाचा चुलतभाऊसुद्धा नाईट क्लब चालवत आहे. हे ऐकून कोणालाही धक्काच बसेल. एका बाजूने राम राम म्हणायचे व दुसऱ्या बाजूने नाईट क्लब चालवायचे. याला काही अर्थ आहे का असेही विजयबाब सांगतात. हे सांगून विजयबाब नेमके कोणाला लक्ष्य करू पाहात आहेत? भाजपचे नेते व त्यांचे नातेवाईक कसे बेकायदेशीर कृत्यात गुरफटले आहेत हेच तर ते सांगू पाहात नसावेत ना! अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com