

पणजी: हडफडे येथील बिर्च बाय रोमिओ लेन क्लबच्या आगीत २५ जण जळाल्याप्रकरणी परवानाधारक गौरव आणि सौरभ लुथरा यांना थायलंडची राजधानी बॅंकॉक येथे आणण्यात आले आहे. त्यांचे मंगळवारपर्यंत भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने या प्रकरणाच्या मुळाशी जात बोगस कागदपत्रांच्या आधारे कसे परवाने दिले, याचा तपास आरंभला आहे.
दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुकेत येथे हॉटेलमध्येच लुथरा बंधूंना सुरुवातीला थायलंड पोलिसांनी अटक केली. तेथे त्यांना बेड्या ठोकल्या आणि फुकेत पोलिसांत नेण्यात आले. थायलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सल्ल्याने त्यांना आता बॅंकॉक येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले असून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
भारत आणि थायलंडचा प्रत्यार्पण करार असला तरी एखाद्या व्यक्तीने केलेला गुन्हा भारत व थायलंड या दोन्ही देशांच्या कायद्यानुसार दखलपात्र अपराध असेल, तर त्याच्यावर थायलंडमध्येही खटला चालवण्याची तरतूद आहे. त्यामुळेच भारतीय अधिकाऱ्यांनी पासपोर्ट निलंबित करण्याचे पाऊल उचलले. साहजिकच अवैधपणे थायलंडमध्ये राहिल्याप्रकरणी पोलिस लुथरा बंधूंना अटक करू शकले.
त्यांना भारतात आणण्यासाठी सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी थायलंड प्रशासनाच्या संपर्कात आहेत. गृह खात्याने थायलंडमधील भारतीय वकिलातीच्या माध्यमातून बॅंकॉक ते दिल्ली प्रवासासाठी हंगामी कागदपत्रे जारी केली आहेत.
त्याला थायलंड प्रशासनाची मान्यता हवी आहे. थायलंडमध्ये शनिवारी व रविवारी प्रशासनाला सुट्टी असल्याने ही सारी प्रक्रिया आता सोमवारी करावी लागणार आहे. त्यानंतर लुथरा बंधूंना भारताच्या हवाली केले जाईल. मंगळवारी त्यांना दिल्लीत आणले जाऊ शकते.
घटनास्थळी कोणत्या त्रुटी होत्या, त्याला कोण जबाबदार, याचीही चर्चा चौकशी समितीच्या अहवालात असेल. केवळ पंचायत सचिव याला जबाबदार आहेत, की त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले गटविकास अधिकारी यांचीही कोणती जबाबदारी आहे, याचाही तपास केला जात आहे.
हप्तावसुली वाढली; परूळेकरांची टीका
मी पर्रीकर यांच्या काळात मंत्री होतो. त्या काळात हप्तावसुली होत नव्हती. विद्यमान भाजप सरकारकडून मात्र हप्तावसुली होत आहे. सरपंच, सचिव पातळीवरचे लोक या कामात गुंतले आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप परूळेकर यांनी आज एका चॅनेलवरील चर्चेत केला. ते म्हणाले, की सरकारे येतात आणि जातात. गोव्यात सध्या भाजप सरकार ज्या पद्धतीने काम करीत आहे, ते धक्कादायक आहे. हप्तावसुलीचा प्रकार प्रचंड वाढला असून ग्रामपंचायत पातळीपर्यंत पोचला आहे.
पुढील आठवड्यात कारवाई तीव्र
याप्रकरणी चौकशी समिती येत्या सोमवारी अहवाल सरकारला सादर करणे शक्य आहे. समितीने गेल्या चार दिवसांत ५० जणांच्या जबान्या नोंदवल्या आहेत. ती मूळ जागा कशी होती, तेथे कसे बदल होत गेले, याचाही तपास करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रशासकीय पातळीवर अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
ताबा गोव्याला मिळणार की दिल्लीला
इंटरपोलने सीबीआयच्या विनंतीवरून ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस बजावली होती. त्याआधारे थायलंड पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले आहे. त्यांना थायलंड प्रशासन सीबीआयच्या हवाली करणार, की मूळ गुन्हा नोंदवणाऱ्या गोवा पोलिसांच्या हवाली करणार, याविषयी दिल्लीत अद्याप स्पष्टता नाही. थायलंडहून त्यांना आणण्यासाठी पथक मात्र तयार ठेवण्यात आले आहे. त्यांना दिल्लीत आणल्यानंतर न्यायालयाकडून वॉरंट घेऊनच गोव्यात चौकशीसाठी आणावे लागणार आहे.
अटक टाळण्यासाठी काल्पनिक कारणे
लुथरा बंधूंना थायलंडमधून गोव्यात आणण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी गोव्यात न येण्यासाठी त्यांना अनेक काल्पनिक कारणे पुढे केली होती. त्यातील एक “गोव्यात गेलो तर आम्हाला ठेचून मारतील,” हे कारण होते. मात्र, दिल्लीच्या न्यायालयाने आरोप “अत्यंत गंभीर व चिंताजनक” असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
पोलिसांपुढे मोठे आव्हान
लुथरा बंधूंनी न्यायालयात दावा केला आहे की, ही आग एका बेली डान्सरने आपल्या सादरीकरणादरम्यान अनार प्रकारची फटाक्यांची फाउंटन पेटविल्यामुळे लागली.
त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले की, “आरोप काय आहे? एका महिला परफॉर्मरने अनार पेटवला आणि छताने पेट घेतला. यातून माझ्या क्लायंटचा हेतूपुरस्सर सहभाग कसा सिद्ध होतो?”
क्लबमालकांवर थेट जबाबदारी टाकता येणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. ४ त्यामुळे लुथरा बंधू या दुर्घटनेला जबाबदार होते, हे सिद्ध करण्याची जबाबदारी गोवा पोलिसांवर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.