Goa Politics: खरी कुजबुज; दामूंच्‍या मनात चाललंय काय?

Khari Kujbuj Political Satire: सध्‍या सर्वत्र गाजणाऱ्या ‘दशावतार’ या सिनेमाचे विशेष प्रदर्शन पणजीच्या आयनॉक्स सिनेमागृहात काल आयोजित करण्यात आले होते.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

दामूंच्‍या मनात चाललंय काय?

राज्‍यात भाजपची मुहूर्तमेढ रोवण्‍यात आणि पक्षाला ‘अच्‍छे दिन’ आणून देण्‍यात माजी मुख्‍यमंत्री लक्ष्‍मीकांत पार्सेकर यांचा किती मोठा वाटा आहे, हे संपूर्ण राज्‍याला माहीत आहे. पण, २०२२ च्‍या विधानसभा निवडणुकीत पक्षाने मांद्रेतून उमेदवारी न दिल्‍याच्‍या रागातून पार्सेकरांनी भाजपला रामराम ठोकला आणि त्‍यांनी अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवली. त्‍याचा फटका मांद्रेत भाजपच्‍याच उमेदवाराला बसल्‍याचे निकालातून दिसूनही आले. तेव्‍हापासून भाजपने पार्सेकरांकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले होते. आता दामू नाईक प्रदेशाध्‍यक्ष झाल्‍यापासून पार्सेकर वारंवार भाजपात पुन्‍हा येण्‍याची इच्‍छा व्‍यक्त करीत होते. सोमवारी पत्रकारांशी बोलताना पक्षाने प्रस्‍ताव दिल्‍यास आपण ‘घर वापसी’साठी तयार असल्‍याचे स्‍पष्‍टच सांगितले. त्‍यानंतर पत्रकारांनी दामू नाईक नाईक यांना यासंदर्भात छेडले. पार्सेकरांना घेण्‍यास तुम्‍ही तयार आहे का? असा प्रश्‍‍न केला असता दामूंनी साधे पार्सेकर यांचे नावही घेतले नाही. याबाबत आपली पहिली भूमिका कायम आहे, इतकेच ते म्‍हणाले. नव्‍या पिढीत भाजपबाबत प्रेम आणि आपुलकी निर्माण होत आहे. त्‍यामुळे अनेकजण भाजपात दाखल होत आहेत, असे म्‍हणत त्‍यांनी पत्रकारांच्‍या मूळ प्रश्‍‍नाला बगल देण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे पार्सेकरांबाबत दामूंच्‍या मनात नेमके चाललेय काय? असा प्रश्‍‍न सर्वांसमोरच उभा राहिला.

राजकारण्‍यांच्‍या डोळ्‍यांमध्‍ये अंजन घालणारा ‘दशावतार’

सध्‍या सर्वत्र गाजणाऱ्या ‘दशावतार’ या सिनेमाचे विशेष प्रदर्शन पणजीच्या आयनॉक्स सिनेमागृहात काल आयोजित करण्यात आले होते. भाजप कार्यालयातून या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सर्वांना निमंत्रणे गेली होती व त्‍यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे जातीने हजर होते. खाण उद्योग व तथाकथित विकासासाठी पर्यावरणाचा ऱ्हास आपण कशा प्रकारे करत आहोत, हे चित्रपटात दाखवण्‍यात आले आहे. एक दशावतारी कलाकार यात गुंतलेल्या सर्व खलनायकांचा वध करतो व आपल्या पूर्वजांनी राखलेल्या जंगलाचे जतन करत़ो अशी या सिनेमाची कहाणी आहे. गोव्यातील पर्यावरण ऱ्हासाला समांतर गोष्ट असलेल्‍या या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन भाजपाने नेमके कोणत्‍या उद्देशाने केले होते, हे मात्र अनेकांना कळले नाही. मागच्या रांगेत बसलेल्‍या राजकारणी लोकांना याबाबत काय वाटत असेल याची कल्पना प्रेक्षक करत होते व हसत-हसत कुजबूजतही होते. बघुया, राजकारणी आता तरी काही बोध घेतात का ते!

Khari Kujbuj Political Satire
Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

कलामंदिरात कला कुठे? कारभार फक्त गोंधळाचे!

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिराला कार्यकारिणी नसल्याने सध्या कारभार रामभरोसे चालला आहे. कुणाचा कुणाला पायपोस नाही. काल आयोजित राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धा तब्बल पावणे दोन तास उशिरा सुरू झाली. वास्तविक या स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा सकाळी दहा वाजता निर्धारित करण्यात आला होता, पण तो चक्क पावणेबारा वाजता झाला. साहजिकच उपस्थितांना नाईलाजाने बसून रहावे लागले. उद्‌घाटन सत्रातील केवळ एकच व्यक्ती उपस्थित राहिली, बाकीचे कुणीच नसल्याने शेवटी आयोजकांना तिसऱ्याच व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावे लागले. कलामंदिरातील हा गोंधळ कधी थांबणार? असा सवाल उपस्‍थित लोक एकमेकांना करत होते.

काँग्रेसची धावपळ, पळापळ

निवडणूक असो किंवा नसो, भाजप मात्र आपल्या कार्यकर्त्यांना वर्षभर जुंपून ठेवतो. पण कॉंग्रेसचे तसे नाही. निवडणुकीला अवघेच दिवस बाकी असताना उमेदवार जाहीर करणे, नंतर प्रचार सुरू करणे आदी कामे हाती घेतली जातात. पण भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष वयाने मोठा असल्याने अनेकांना त्‍यांच्‍याबद्दल सहानुभूती असते. आता भाजपच्या उदयाने व त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे काँग्रेसच्‍या कामात कमीपणा जाणवू लागला आहे. आता मात्र सर्वप्रथम काँग्रेसने जिल्हा पंचायतीची तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक तीन ते चार महिने दूर असली तरी उमेदवार निवडण्यासाठी पक्षाने कंबर कसलीय. त्यामुळे जिंकण्याची संधी काँग्रेसवाल्यांना दिसू लागली आहे म्‍हणे. धावपळ, पळापळ सुरू झाली आहे.

नाक्यानाक्यावर फोंड्याचे पात्राव!

फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांच्‍या वाढदिवस सोहळ्याचे फलक सध्या शहरभर झळकत आहेत. तसेच नाक्यानाक्यांवर कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांचे फलक दिसत आहेत. आतापर्यंतच्या शुभेच्छा फलकांवरून सध्या रवी पात्रावाचा दरारा जास्त असल्याचे दिसून येते. शेवटी पात्रावाचा वाढदिवस म्हटल्यावर सर्वचजण उत्साही आहेत.

दयानंद नार्वेकरांचा हात

गोवा क्रिकेट असोसिएनच्या राजकारणात सध्या सक्रिय नसलेले माजी मंत्री दयानंद नार्वेकर हे पडद्याआड मात्र सक्रिय असतात. राजकारणापासून आपण दूर आहे, असे ते सांगत असले तरी राजकीय डावपेच आखत असतात. अडचणीत आलेल्या रोहन गावस देसाई यांच्या पॅनलला सर्वाधिक क्लबांचे समर्थन असलेल्या नार्वेकर यांनी ऐनवेळी हात दिला. त्यामुळे त्यांना किमान निवडणुकीत सपशेल धुव्वा होण्यापासून तरी वाचता आले. नार्वेकरांच्या या अदृश्य मदतीमागे कारण काय, याचा शोध आता काहीजण घेऊ लागले आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Road Closure: गोव्यातील 'हा' रस्ता राहणार बंद! प्रवाशांना बसणार मोठा फटका; पर्यायी मार्ग जाणून घ्या..

भाऊंचे ‘भंडारी कार्ड’ सपशेल झाले फेल

भाऊ म्हणजे जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांचे बंधू मेघनाद हे उमेदवार होते. निदान आपला भाऊ तरी विजयी व्हावा यासाठी त्यांनी ‘भंडारी कार्ड’ बाहेर काढले. अनेक क्लबांशी संपर्क साधताना ‘तुम्ही-आम्ही भंडारी, निदान माझ्या भावाला तरी मत द्या’ अशी आर्जवे त्यांनी केली. क्लबच्या चालकांनी ही विनंती फारशी मनावर घेतली नाही आणि व्हायचे तेच झाले. त्यामुळे क्रिकेटच्या वर्तुळात भाऊंचे ‘भंडारी कार्ड’ कसे फेल गेले याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बाबूशच्‍या निशाण्‍यावर ‘पर्यटन’

बाबूश मोन्‍सेरात तसे रोखठोक मंत्री. एखाद्या खात्‍याची गोष्‍ट पटली नाही की कुणाचाही मुलाहिजा न बाळगता ते खात्‍यावर घसरतात. याआधीही मंत्री असतानाच त्‍यांनी सार्वजनिक बांधकाम खात्‍यातील नोकर भरतीत घोटाळा झाल्‍याचा थेट आरोप केला. या प्रकरणात पुढे काय काय झाले, ते संपूर्ण गोव्‍याने अनुभवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ७५व्‍या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपतर्फे बुधवारी आयोजित स्‍वच्‍छता मोहिमेत सहभागी होत बाबूश यांनी करंजाळे समुद्रकिनारी स्‍वच्‍छता केली. त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना किनाऱ्यांवर कचरा साठण्‍यास पर्यटन खाते जबाबदार असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर कचरा फेकण्‍यासाठी कुंड्या ठेवण्‍याची जबाबदारी पर्यटन खात्‍याची आहे. परंतु, करंजाळे किनाऱ्यावर कचराकुंड्या ठेवण्‍यात आलेल्‍या नाहीत. त्‍यामुळेच येथे कचरा अस्‍ताव्‍यस्‍तपणे फेकला जात असल्‍याचेही ते म्‍हणाले. एकीकडे पर्यटनमंत्री रोहन खंवटे गोव्‍याइतके स्‍वच्‍छ किनारे देशात नाहीत असा दावा करीत असताना मंत्रिमंडळात त्‍यांचे साथीदार असलेल्‍या बाबूशनी असा आरोप का केला असेल?

अकबर-सूरजची कमाल-धमाल

चेतन देसाई आणि बाळू फडके या दोघांनी एकत्र येऊन जीसीएच्‍या निवडणुकीत उभे केलेले पॅनल जिंकून येण्‍यामागे अकबर मुल्‍ला तसेच जीसीएचे माजी अध्‍यक्ष सूरज लोटलीकर यांचे ‘कार्य’ फार मोलाचे होते. एक म्‍हणजे, चेतन आणि बाळू या दोघांचीही तोंडे दोन दिशांना होती. त्‍या दोघांनाही एकत्र आणायचे ‘महान’ काम अकबर आणि सूरज या जोडगोळीने केले. वास्‍तविक चेतन आणि बाळू गट एकत्र येणे शक्‍यच नव्‍हते. पण ही एकी झाल्‍याशिवाय जीसीए काबीज करणे शक्‍य नाही हे दोघांनीही चेतन आणि बाळू यांना पटवून दिले. अर्थातच या कामासाठी या दोघांनाही त्‍यांचे जवळचे मित्र असलेले फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचाही चांगला पाठिंबा मिळाला. त्‍याचाच परिणाम जीसीए निवडणुकीच्‍या निकालावर स्‍पष्‍टपणे दिसून आला. आता म्‍हणे, अकबर-सूरज या थिंक टँकवर विधानसभा निवडणुकीच्‍या काळात विरोधक मोठी जबाबदारी देण्‍याचे घाटत आहेत. बघु, काय होतं ते!

Khari Kujbuj Political Satire
Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

विरोधकांचे एकीचे बळ!

गोवा क्रिकेट संघटनेच्‍या (जीसीए) निवडणुकीत संपूर्ण सरकारी यंत्रणा ‘परिवर्तन’ पॅनलच्‍या बाजूने असतानाही चेतन-बाळू गटाने शेवटी बाजी मारलीच. त्‍यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी २०२७ मध्‍ये होणाऱ्या बदलाची ही नांदी असे म्‍हटले आहे. आता सरकारी पाठिंबा असलेले पॅनल पराभूत झाले म्‍हणून काँग्रेसला आनंद होणे साहजिकच. पण या निकालातून काँग्रेस खरेच काही धडा शिकणार का? चेतन-बाळू या दोघांचे एकमेकांच्‍या विरोधात असलेले गट एकत्र आल्‍यामुळेच सरकारचे समर्थन लाभलेले पॅनल पराभूत झाले. विधानसभेत सरकारला पराभूत करायचे असेल तर सर्व विरोधकांनी असेच एकत्र येणे गरजेचे नाही का? गिरीशरावांचा काँग्रेस पक्ष या निकालातून हा धडा घेणार का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com