

सासष्टी : ‘माझे घर’ योजनेनंतर आता राज्य सरकार ‘माझा फ्लॅट’ ही नवी योजना सुरू करणार आहे. त्यामुळे विविध कारणांनी फ्लॅटचा मालकी हक्क न मिळालेल्या हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या योजनेची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. सध्या योजनेच्या नियम व अटींबाबत सरकारकडून विचारविनिमय सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘माझे घर’ योजनेअंतर्गत सासष्टी, काणकोण, केपे, धारबांदोडा, मुरगाव आणि फोंडा तालुक्यांतील एक हजारांहून अधिक लाभार्थ्यांना घराच्या मालकीहक्क सनदांचे वितरण करण्याचा शुभारंभ रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. त्यानंतर त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सनद प्रदान करण्यात आल्या.
‘हरित गोवा, स्वच्छ गोवा’ उपक्रम आजपासून
गोव्यात उद्या शुक्रवार 5 जूनपासून ‘हरित गोवा, स्वच्छ गोवा’ उपक्रम सरकारतर्फे राबविला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याअंतर्गत पुढील 90 दिवसांत म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत राज्यात 10 लाख रोपटी लावण्यात येतील. त्याचा शुभारंभ उद्यापासून करण्यात येणार आहे. प्रथम सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुला रोपटी लावली जातील. प्रत्येक नागरीकाने एक तरी रोपटे लावावे अशी सरकारची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
निश्चित काय आहे योजना?
विविध कारणांमुळे हजारो फ्लॅटधारकांना अद्याप मालकी हक्क प्राप्त झालेला नाही. या पार्श्वभूमीवर सरकार ‘माझा फ्लॅट’ योजना आणणार आहे. त्याअंतर्गत फ्लॅटधारकांना मालकीहक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित केली जाईल. योजनेचे नियम, पात्रता, निकष आणि अंमलबजावणीची रूपरेषा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.