Calangut Baga Road Issue कळंगुट आणि बागा ही पर्यटन स्थळे असून गोव्यात येणारे पर्यटक आवर्जून या ठिकाणी भेटी देतात. मात्र सध्या येथील रस्त्यांची दुर्दशा झाली असून खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोय.
याशिवाय याठिकाणी होणारे दैनंदिन अपघात हेही वाढत चालले असून पंचायतीने या संदर्भात सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करावा अशी मागणी स्थानिकांमधून व्यक्त होत होती.
याचा संदर्भात शुक्रवारी कळंगुट आणि बागा परिसरातील रस्त्यांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी पंचायतीतर्फे मिटिंग बोलावण्यात आली होती.
खराब रस्त्यांमुळे वाढत जाणारे अपघातांचे प्रमाण हे चिंताजनक असून या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी करण्याचा ठराव पंचायतीतफे करण्यात आला.
यावेळी सरपंच जोसेफ साकवेरा, उपसरपंच गीता परब, पंच सदस्य सपेश वैंगणकर, अॅनी फर्नांडीझ, अॅलेक्स क्युटिनो आणि सॅव्हियो गोन्झाल्विस आदी उपस्थित होते.
पर्यटन हंगाम सुरू होत असतानाच कळंगुट गावात खड्डे आणि नादुरुस्त रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉल्फिन सर्कल ते कॅटल पॉन्ड कळंगुट पर्यंतचा रस्ता आणि कळंगुट सर्कलमधून बागा बीचकडे जाणारा रस्ता अत्यंत नादुरुस्त आहे.
त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. गोव्यातील या लोकप्रिय किनारपट्टी भागातील पर्यटकांची संख्या वाढवायची असलेत तर रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करणे अत्यावश्यक आहे. खराब रस्त्यांमुळे पर्यटक आमच्या दुकानांमध्ये येणार नाहीत. याचा परिणाम साहजिकच आमच्या रोजगारावर होणार असल्याचे इथल्या स्थानिक दुकानदारांचे म्हणणे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.