
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना आणखी गती आली. या आठवड्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ फेरबदल होऊ शकतो अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होऊ लागली आहे.
मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागी त्यांचीच वर्णी लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र रात्री पावणेनऊ वाजता तेथून निघण्यापूर्वी मुख्यमंत्री सावंत यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
मुख्यमंत्री सावंत हे अमित शहा यांना भेटणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले होते. दामू म्हणाले होते की, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्र्यांचा दौरा असला तरी ते राजकीय कारणास्तव गाठीभेटी घेऊ शकतात.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शहा यांच्या भेटीत निश्चितपणे राजकीय चर्चा झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते या नात्याने राजकीय परिस्थितीचा आढावा घेणे साहजिकच होते. शिवाय राज्याच्या विकासकामांसंदर्भातही त्यांना अवगत केले. या भेटीवेळी आमदार मायकल लोबो सोबत होते. ते मुख्यमंत्र्यांसोबत शहा यांना भेटले. त्यानंतर बी. एल. संतोष यांचीही भेट झाली.
त्यामुळे लोबो यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात असला तरी मायकल यांना की त्यांची पत्नी दिलायला लोबो यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. सभापती रमेश तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांना कल्पना दिल्याचीही माहिती मिळाली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पणजीत लष्कराला दिलेल्या जागेच्या बदल्यात त्यांना बांबोळी येथे जागा देण्यात आली आहे. त्यांनी तिथे आपली कार्यालये, इस्पितळे स्थलांतरित करणे अपेक्षित आहे. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न संरक्षणमंत्र्यांसमोर मांडला आहे. शिवाय ‘हेम्रो’ प्रकल्प कार्यान्वित करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे.
तर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबतच्या भेटीत गोव्यातील निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक आधार व्यवस्थेबाबत चर्चा केली. विशेषतः कृषी उत्पादन निर्यातीसाठी राज्यात ‘अपेडा’ कार्यालय स्थापन करून ते लवकर कार्यान्वित करण्याची विनंती त्यांना केली.
दरम्यान, केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री दिल्लीत मुक्काम करतील अशी अटकळ होती. मात्र रात्री पावणेनऊ वाजता आपण दिल्ली दौरा आटोपून गोव्याला निघत असल्याचे त्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
सुभाष शिरोडकर यांना सभापतिपद?: सहकारमंत्री सुभाष शिरोडकर हेसुद्धा आज दिल्लीत होते. सभापतिपद त्यांना देण्यात येईल असा चर्चेचा रोख होता. यासंदर्भात शिरोडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील सहकारमंत्र्यांची बैठक दिल्लीत घेतली. त्यावेळी शहा यांनी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्र्यांनी केली सिक्वेरांची विचारपूस
दिल्लीतील इस्पितळात दाखल असलेले पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांचीही मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केली. या भेटीबाबत सिक्वेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. ती राजकीय स्वरूपाची नव्हती. ते विधानसभा अधिवेशनापूर्वी गोव्यात येणार असून विधानसभेत प्रश्नांना उत्तरेही देणार आहेत. मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याने त्याबाबत आपण बोलू इच्छित नसल्याचे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.