
पणजी: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? हा आता गोमंतकीयासाठी यक्षप्रश्न झाल्याचे दिसते. अनेक महिन्यांपासून विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा विस्तारावरुन राजकीय हालचालींना वेग आला आहे. निमित्त ठरले मुख्यमंत्री सावंत यांचा तीन आमदारांबरोबर चार्टरद्वारे झालेला दिल्ली दौरा. त्यापाठोपाठ पर्यटन मंत्री खंवटे देखील दिल्लीत दाखल झाले. आणि आता आमदार प्रवीण आर्लेकरांनीही दिल्ली गाठलीय.
गेल्या वर्षी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या आलेक्स सिक्वेरा यांना नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेऊन मंत्रिपद बहाल करण्यात आले होते. यानंतर विस्ताराच्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला होता. दरम्यान, सिक्वेरा यांना मंत्रिपद हा पक्षांतरावेळी दिलेल्या आश्वासनाचा भाग होता, असे सांगण्यात आले.
काही महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाच्या चर्चांना उधाण आले. पण, विधानसभा अधिवेश, लोकसभा आणि त्यानंतर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे विस्तार लांबणीवर पडत. या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमदार पेमेंद्र शेट, जीर आरोलकर आणि कृष्णा दाजी साळकर यांच्यासह जैसलमेर मार्गे चार्टरद्वारे दिल्ली गाठली. मुख्यमंत्री सावंत यांनी आमदारांसह केलेल्या दिल्ली दौऱ्याने विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्या.
दरम्यान, याच काळात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी देखील दिल्ली बड्या मंत्र्यांशी गुप्त भेट घेतल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री आमदारांसह चार्टरद्वारे गोव्यात दाखल झाले असताना पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकरांना दिल्लीतून सांगावा आला आहे.
प्रवीण आर्लेकरांनी दिल्ली गाठली असून, दिल्लीत ते बड्या मंत्र्यांशी भेटीगाठी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी मुक्तीदिनाच्या दिवशीच आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पण, राणे यांची भेट राजकीय नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान, दोन ते तीन दिवसांत गोव्यात झालेल्या राजकीय हालचाली विस्ताराच्या दिशेने असल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
सध्या सुरु असलेल्या राजकीय हालचालीत मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. पण, अद्याप संभाव्य नावे समोर आली नाहीत. विस्तारात कोणला संधी दिली जाणार? यासह कोणाचे मंत्रिपद जाणार? याबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, गोव्यातील राजकीय स्थितीबाबत दिल्लीत सध्या जोरदार खलबते सुरु असल्याची कबुली दिल्लीतून गोव्यात परतलेल्या एका नेत्याने गोमन्तकला नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.
घोटाळे आणि खान फरार प्रकरणामुळे सरकार अडचणीत
गोव्यात गाजत असणारा कॅश फॉर जॉब स्कॅम, जमीन हडप प्रकरण आणि गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झालेल्या सिद्दीकी उर्फ सुलेमान खान यामुळे राज्य सरकार अडचणीत सापडले आहे. आक्रमक विरोधक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतायेत. आगामी हिवाळी अधिवेशनात देखील हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यमंत्रिमंडळात बदल होणार की नाही? याबाबत लवकरच खुलासा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.