
CM Pramod Sawant Amit Shah Visit
पणजी: राज्य मंत्रिमंडळात फेरबदल आणि खातेबदल यांचा मुहूर्त अखेर ठरला आहे. विधानसभा अधिवेशनानंतर हे बदल होणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे.
याउलट प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सर्वांच्या कामाचा अहवाल आपण राज्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांना सादर केल्याचे म्हटले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार, असे मानले जात आहे.
मुख्यमंत्री पहाटे दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सकाळच्या टप्प्यात शहा यांची भेट घेतली. सभापती रमेश तवडकर यांनी, येत्या १५ दिवसांत मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय मार्गी लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितेतील विषय आहे, असेही सांगितले होते. असे असले तरी मंत्रिमंडळ फेरबदल होणार नाही, असे सत्ताधारी वर्तुळातून कोणीच सांगितले नव्हते.
पुणे येथे झालेल्या आढावा बैठकीत नव्या फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीविषयी शहा यांना मुख्यमंत्र्यांनी अवगत केले होते. ती बैठक होऊन १५ दिवसही न झाल्याने तीच माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री आता पुन्हा शहा यांना का भेटले असावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतील प्रगती, खाण क्षेत्रातील घडामोडी यासह महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती दिली. तसेच, प्रशासकीय आणि विकासात्मक उपक्रमांना पुढे नेण्यासाठी मार्गदर्शनाची विनंती केली.
खात्रीलायकरित्या मिळालेल्या माहितीनुसार, संतोष यांनी गोवा दौऱ्यानंतर एक अहवाल सादर केला होता. त्याआधारे मंत्र्यांचे मूल्यमापन आणि संघटनात्मक कामासाठी त्यांचे योगदान याविषयी शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली. त्याआधारे मंत्रिमंडळ फेरबदलाला मान्यता दिली आहे. काही खातीही मुख्यमंत्री आपल्याकडे घेणार आहेत, त्याविषयीही बोलणी झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यामुळे राजकीय चर्चेला गती मिळाली आहे. असे असले तरी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दामू दिल्लीत पोचल्याची माहिती मिळाली आहे. ते आणि मुख्यमंत्री सोबतच त्या सोहळ्याला गेले आहेत.
मुख्यमंत्री उद्या (ता.१९) सागरमाला विषयावरील देशव्यापी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत सागरमाला प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. या परिषदेव्यतिरिक्त मिळणाऱ्या वेळेत ते आणि दामू नाईक हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. शहा यांनी वेळ दिला तर दामू हेही त्यांना उद्या भेटणार आहेत, असे सांगण्यात येते. मुख्यमंत्री उद्या सायंकाळी उशिरा गोव्यात पोचणार आहेत.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांच्या मंत्रिमंडळ समावेशाविषयी सत्ताधारी वर्तुळात चर्चा आहे.
त्यामुळे तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागणार आहे. ते तीन मंत्री कोण, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
भाजपला दक्षिण गोव्यात अपेक्षित यश मिळवून देऊ न शकल्याबद्दल पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांना वगळले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.