Goa IIT: सुभाषभाऊ फक्त ‘आयआयटी’च! 'खरी कुजबूज'

Goa IIT: सुभाष फळदेसाई कुठेही गेले तरी त्यांची सुरवात ही ‘आयआयटी’नेच होते.
Subhash Phaldesai
Subhash PhaldesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa IIT: सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई कुठेही गेले, कोणते उद्‍घाटन असो किंवा कोणत्याही विकास प्रकल्पाबाबत पाहणी असेल, तेव्हा त्यांची सुरवात ‘आयआयटी’नेच होते. काही झाले तरी सांगेत आयआयटी उभारणारच असाच जणू त्यांनी निर्धार केला असावा.

सांगेत योगा, नॅचरोपॅथी प्रकल्पाबाबत दिव्या राणे यांच्या दौऱ्यावेळीही सुभाषभाऊंनी आयआयटीवरून विरोधकांवर टीका केली. लोकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले.

त्यामुळे ग्रामस्थही कार्यक्रमप्रसंगी सुभाषभाऊ ‘आयआयटी’वरच बोलणार अशी भाषणापूर्वीच चर्चा करू लागलेत, त्यात तथ्यही आहेच. पण ‘आयआयटी’ सांगेत राहणार की कुठे जाणार? हे सांगणे तसे कठीणच!

बाबू हरले तरी जिद्द कायम

‘एका कापडान बायल म्हातारी जायना’ अशी कोकणीत एक म्हण आहे. बाबू कवळेकर विधानसभेची निवडणूक हरले तरी त्यांचा लोकसंपर्क तुटलेला नाही. बाबू कवळेकर जरी माजी बनले असले तरी त्यांनी राजकारण व पक्षकार्य सोडलेले नाही.

बाबू आजही तेवढ्याच उमेदीने व जिद्दीने राजकारणात सक्रिय आहेत. बाबू कवळेकर यांनी काल मंगळवारी बार्से येथे कार्यकर्त्यांची भव्य सभा घेऊन केंद्रीय कौशल्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यासमोर आपली ताकद, कौशल्य, शक्ती व दम सिद्ध केला हे मात्र खरे.

Subhash Phaldesai
Goa Tourism:'रिडिस्कव्हर गोवा'; पर्यटकांसाठी डिसेंबरमध्ये Airbnb आणि पर्यटन खात्याचा अनोखा उपक्रम

त्या याचिकेचे काय झाले?

माणसाने आशावादी असावे, मात्र जे आपल्याला मिळणे शक्य नाही, त्यावर आशा ठेवणे म्हणजे मूर्खपणाच. कुंकळ्ळी नगरपालिकेची निवडणूक झाल्यास दोन वर्षे पूर्ण व्हायला आली. कुंकळ्ळी नगरपालिका निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने योग्य राखीवता राखली नसल्याचे सांगून पालिकेच्या दोघा पडेल माजी नगरसेवकांनी दोघा महिलांकडून न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.

पालिका मंडळ बरखास्त करणार व नव्याने निवडणुका घेण्यात येणार, अशा अफवा पसरविल्या जात होत्या. निवडलेले नगरसेवकही आपले सदस्यत्व रद्द होणार म्हणून घाबरून होते, मात्र दोन वर्षे पूर्ण व्हायला आली, त्या याचिकेचा निकाल लागला नाही व कदाचित पाच वर्षांपर्यंत लागणार नाही, म्हणून विद्यमान नगरसेवक खूष आहेत, तर ते पडेल माजी नगरसेवक मात्र दुःखी आहेत, ‘कही खुशी कही गम’ म्हणतात ते याला!

अतिक्रमण हटावची नाटके

राज्यातील प्रत्येक शहरात विक्रेत्यांकडून अतिक्रमणे वाढली आहेत. या विक्रेत्यांना रोखण्यासाठी पालिकेनेच कडक कारवाई करायला हवी, पण नगरसेवकांचे आणि पालिकेतील कर्मचाऱ्यांचे हित कुठे लपले आहे ते काही लपून राहिलेले नाही. त्यामुळेच तर हे असे अतिक्रमणांचे प्रकार वारंवार होतात.

आधीच खबरदारी घेतली तर... पण तसे काही होत नाही. त्यामुळे अतिक्रमण हटावची नाटके केली जातात. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर असाच हा प्रकार आहे. कारण हटवलेली अतिक्रमणे पुन्हा पूर्वपदावर येतातच की...!

Subhash Phaldesai
Petrol-Diesel Price In Goa: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

फोंडा पालिकेत संगीत खुर्ची

फोंडा पालिकेत नेहमीच संगीत खुर्चीचा खेळ सुरू असतो. मगो, काँग्रेस, भाजपचे सत्तेसाठी नेहमीच युद्धपातळीवर प्रयत्न केले जातात, पण ऐनवेळी अनेकांना नगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

आता काही महिनेच कार्यकाळ शिल्लक असताना राज्यात भाजप, फोंड्यात भाजपचा आमदार तथा मंत्री रवी नाईक असतानासुद्धा रितेश नाईक यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल झाला आहे. यावरून सत्ता कोणाचीही असो, त्याचा फोंडा पालिकेवर काहीही परिणाम होत नाही, नगरसेवक मनमानेल तेव्हा नगराध्यक्ष बदलतात, हेच खरे आहे अशी चर्चा फोंड्यात सुरू आहे. पण रवी, सुदिन आणि केतनही गप्प कसे? हाही एक गहन प्रश्‍नच आहे.

फलक कुणासाठी?

राज्य सरकारचे नागरी पुरवठा खाते जरासे सक्षम झाले आहे. आता हेच पाहा. पोलिसांनी धान्याचा काळाबाजार उघडकीस आणला, पण खात्याने सरळ हा धान्य साठा आपला नव्हेच, असा पवित्रा घेतला.

खात्याच्या संचालकांनी तर दोन्ही हात वर केले, पण हा काळाबाजार होत असलेला धान्य साठा हा स्वस्त धान्य दुकानातीलच आहे, पण त्याला कुणाचे अभय आहे, हे सर्वांना माहीत आहे. फक्त सरकारला ते माहीत नाही. त्यामुळेच आपल्या मुख्यमंत्र्यांनी या व्यवहाराला सरळ क्लिन चीट दिली. त्यामुळेच नागरी पुरवठा खात्याला अभय मिळाले.

आता तर म्हणे या स्वस्त धान्य दुकानातील शिल्लक धान्यसाठा कळावा यासाठी फलक लावण्यात येणार आहेत. हा फलक कुणासाठी ते माहीत नाही, पण धान्याची चोरी होत असल्याने बायोमेट्रिकचा वापर करण्यात आला, इथे तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार त्यामुळे येरे माझ्या मागल्या म्हणूनच हे खाते स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी काही ठोस कृती करणार आहे की नाही, असे सर्वसामान्य लोकच विचारताहेत.

स्वच्छतेसाठी धडपड; पण...

53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपादिवशी दिव्याज फाउंडेशन आणि भामला भाउंडेशनने मिरामार किनाऱ्याची स्वच्छता केली. या स्वच्छता अभियानात दिव्याज फाउंडेशनच्या अमृता फडणवीस, प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ, गोव्याच्या प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई, रेमो डिसोझा, करण कुंद्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला.

अमृता फडणवीस व हेमा सरदेसाई यांनी गाण्यांच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जागृती केली. एवढेच नव्हे, तर बालभवनच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. एक दिवस मिरामार किनारा स्वच्छ झाला, तसा कायम राहणार का हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

कारण येथे येणारे पर्यटक आईस्क्रीमच्या काड्यांपासून खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे इतरत्र फेकून किनाऱ्याचे विद्रुपीकरण करतात. यावर आता पालिकेने कर्मचारी नेमून असा कचरा टाकणाऱ्यांना जरब बसवावी हाच उपाय असल्याची चर्चा सध्या होत आहे.

Subhash Phaldesai
Goa BJP: भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु

मडकईत भूमिगत वीजवाहिन्या

मडकईचे आमदार आणि मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकरांनी वीज खात्याचा ताबा घेतल्यापासून बरेच बदल केले आहेत. विशेष म्हणजे वीज खात्याद्वारे महसूल वाढीसाठी त्यांनी चालवलेल्या कामामुळे या खात्याकडून भरीव निधीही उपलब्ध होत आहे.

त्यातल्या त्यात सुदिनरावांनी सध्या मडकई मतदारसंघात आवश्‍यक त्या ठिकाणी वीज ट्रान्स्फॉर्मर बसवून आपल्या मतदारसंघातील लोकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. शिवाय भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामालाही गती मिळाली आहे. आता हे काम त्यांनी इतर मतदारसंघातही घेतले आहे, पण मडकईत या कामाला सध्या प्राधान्य असल्याने मडकईवासीय खूष आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com