

पणजी: मंत्री, आमदारांसह गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी सोमवारी प्रदेश भाजपच्या विविध मोर्चे तसेच मंडळ अध्यक्षांची बैठक घेत, आगामी तीन महिन्यांत लोकांच्या घरोघरी पोहोचून योजनांचा जागर करण्याचा कानमंत्र दिला.
संघटनेला अधिकाधिक बळकटी देऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे प्रदेश भाजपने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून बी. एल. संतोष रविवारी गोव्यात दाखल झाले आणि त्यांनी बैठकांचा सपाटा सुरू केला. रविवारी त्यांनी प्रथम मंत्री, आमदारांची बैठक घेऊन त्यांच्याकडून जनतेची भाजप सरकारप्रतीची भावना आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारने गोव्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी खर्च केला आहे. त्यातून अनेक प्रकल्प उभे राहिलेले असून, त्याचा जनतेला मोठा फायदा मिळत आहे. पायाभूत साधनसुविधांसह केंद्र सरकारने जनतेचा आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी गेल्या काही वर्षांत विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतात की नाही? पोहोचत नसतील, तर त्यामागे कोणती कारणे आहेत? याचा शोध घेऊन सरकारच्या सहाय्याने त्यावर मात करा आणि जनतेला अधिकाधिक भाजपकडे आकर्षित करा’’, असे संतोष यांनी सांगितले.
तरुणाईचे प्रश्न समजून घ्या!
बी. एल. संतोष यांनी भाजप युवा मोर्चाच्या कामांचा आढावा घेतला. गोव्यातील तरुणाईचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी झटून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे तुषार केळकर यांनी सांगितले.
ढवळीकरांचे मतदारसंघ दौरे सुरू
मगोने भाजप आमदार असलेल्या शिरोडा, प्रियोळसह फोंडा या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी या मतदारसंघांचे दौरेही सुरू केले आहेत. त्याबाबत मंत्री तथा शिरोड्याचे आमदार शिरोडकर यांनी रविवारी बी. एल. संतोष यांच्यासमोर खंतही व्यक्त केली होती. मात्र युतीबाबतचा निर्णय दिल्लीत होणार असल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले.
बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. प्रदेश सहसंघटनमंत्री आणि राज्य प्रभारी यांच्या उपस्थितीत त्यांनी संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. जुन्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याच्या संकल्पनेचेही त्यांनी स्वागत केले. पन्नाप्रमुख, शक्तिकेंद्रे, मंडळे, विविध मोर्चे, प्रकोष्ठ, जिल्हा आणि प्रदेश कार्यकारिणी यांच्या कामगिरीचा आढावा घेत त्यांनी पुढील तीन महिन्यांसाठी दिशा ठरवून दिली. त्याच मार्गावर वाटचाल करत आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
- दामोदर नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष.
बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा पहिला टप्पा सुरू केला आहे. संघटना आणि सरकारच्या कामाचा आढावा घेऊन पुढील तीन महिन्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार, प्रभारींच्या उपस्थितीत बैठका घेऊन निवडणुकीची तयारी केली जाईल.
- सिद्धेश नाईक, भाजप प्रदेश माध्यम संयोजक.
मगो विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असून युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतरच घेतला जाईल.
- दीपक ढवळीकर, मगोपचे अध्यक्ष.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.