Vedanta Bicholim Mine Block वेदांता खाण कंपनीला पर्यावरणीय दाखला देण्यापूर्वी खाण व्यवसायाच्या प्रभावाखाली येणाऱ्या गावांतील जनता आणि ग्रामस्थांना विश्वासात घ्या. त्यांच्या समस्या आणि भावना जाणून घ्या. यापूर्वी खाण व्यवसाय सुरू असताना शेती, बागायती, नैसर्गिक जलस्रोत कसे संकटात कसे आले, ही पूर्वपीठिका अभ्यासा. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामसंस्थांसह खाण क्षेत्रांतर्गत येणाऱ्या भागांची पाहणी करावी.
लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पुन्हा जनसुनावणी घ्या, अशी मागणी आज डिचोली येथील जनसुनावणीप्रसंगी करण्यात आली.
‘ग्रीन प्रकल्प’ भासवून वेदांताने सादर केलेला पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल (ईआयए रिपोर्ट) एकतर्फी आणि वस्तुस्थितीला धरून नाही, असा थेट आरोप यावेळी करण्यात आला.
डिचोली खाण ब्लॉक-१ अंतर्गत खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी वेदांता कंपनीला आवश्यक असणाऱ्या पर्यावरणीय दाखल्यासाठी (ईसी) आज (शुक्रवारी) डिचोलीत जनसुनावणी आयोजित केली होती.
वाठादेव-डिचोली येथील झांट्ये महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात सकाळी १०.३० वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी डॉ. मोहन गिरप यांच्या उपस्थितीत जनसुनावणीस प्रारंभ झाला. या
जनसुनावणीला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. खाण सुरू व्हावी तसेच संघर्ष करणाऱ्या कामगारांवर अन्याय होऊ नये, असे मतही मांडण्यात आले.
अहवालातील त्रुटी दूर करा!
जनसुनावणीच्या सायंकाळच्या सत्रात खाण व्यवसायाला ठाम विरोध झाला नाही. मात्र, जनतेने मांडलेले मुद्दे विचारात घ्यावेत. घरे, शेती, जलस्रोत बफर झोनमधून वगळावीत. पूर्वाश्रमीच्या कामगारांवर अन्याय होता कामा नये.
प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेऊन पर्यावरणपूरक खाण व्यवसाय सुरू व्हावा, हा मुद्दाही पुढे आला. पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालातील (ईआयए) त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली.
शुक्रवारी दुपारपर्यंत दीपक पोपकर, किशोर लोकरे, नीलेश कारबोटकर, ॲड. मनोहर शिरोडकर, लता न्हावेलकर, मीना सालेलकर, मोहिनी जल्मी, संदेश परब, प्रशांत धारगळकर, सुनयना हळदणकर, प्रतिभा धारगळकर, अरुण नाईक, नागेश नाईक, भीमाकर पळ, ॲड. अजय प्रभुगावकर, पर्यावरण अभ्यासक रमेश गावस आदींनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मुद्दे मांडले.
निसर्ग उद्ध्वस्त : यापूर्वी जेव्हा खाण व्यवसाय सुरू होता, तेव्हा शेती, जलस्रोत नष्ट झाले, निसर्ग उद्ध्वस्त झाला. त्यामुळे वेदांताने सादर केलेल्या अहवालाला अनुसरून पर्यावरणीय दाखला देणे योग्य ठरणार नसल्याचे प्रखर मत ॲड. मनोहर शिरोडकर, रमेश गावस, ॲड. अजय प्रभुगावकर, किशोर लोकरे आदींनी मांडले.
खाणींना विरोध नाही पण...: प्रशांत धारगळकर, संदेश परब, प्रतिभा धारगळकर, श्रीकांत धारगळकर यांनी पर्यावरण सांभाळून खाण व्यवसाय लवकर सुरू व्हावा, अशी मागणी केली. पिळगाव आणि मुळगावच्या सरपंच अनुक्रमे मोहिनी जल्मी आणि तृप्ती गाड यांनी गावांच्या हिताचा विचार व्हावा, अशी मागणी केली.
हजारोंची उपस्थिती
या जनसुनावणीला शिरगाव, मुळगाव, मये, पिळगावसह डिचोली, बोर्डे, लामगाव येथील लोकांसह पर्यावरणप्रेमीही उपस्थित होते. जनसुनावणीस्थळी सकाळी ८ वाजल्यापासूनच लोक जमले होते. नोंदणी करण्यासाठी सभागृहाबाहेर खास काऊंटरची व्यवस्था केली होती. जनसुनावणीस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. अग्निशमन दलासह आपत्कालीन सेवाही उपलब्ध केल्या होत्या.
नियम पाळून खाणी सुरू करा!
खाणबंदीमुळे ट्रकमालक आदी घटक संकटात आले आहेत. खाण व्यवसाय सुरू व्हावा; पण पर्यावरण सांभाळून, असे मत तुळशीदास चोडणकर, राजाराम गावकर, काशिनाथ मयेकर, आझाद कडकडे, बालाखान गौरी, तुषार फळारी, प्रशांत धारगळकर यांनी व्यक्त केेले .
माहिती लपविल्याचा आरोप
रमेश गावस, स्वप्नेश शेर्लेकर, प्रवीर फडते, विनोद मांद्रेकर यांनी ‘ईआयए’ अहवालातील मुद्यांना हरकत घेतली. जलस्रोत, वन क्षेत्र, धार्मिक स्थळांबाबत माहिती लपविल्याचा आरोप त्यांनी केला. लीज क्षेत्र तयार करणाऱ्या एजन्सीचे तज्ज्ञ राजू यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही : ग्रामस्थांचा आक्षेप
1 जनसुनावणीच्या सुरवातीस वेदांता कंपनीतर्फे ध्वनिचित्रफितीद्वारे खाण प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. मात्र त्यातील अनेक बाबींना उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला.
2 कंपनीने खाण प्रकल्पाबाबत सादर केलेला अहवाल पूर्ण चुकीचा आणि एकतर्फी असून हा अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही, असा मुद्दा अनेकांनी पोटतिडकीने उपस्थित केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.