Durand Football Tournament: एफसी गोवा संघाने शनिवारी (ता.12) नॉर्थईस्ट युनायटेडला नमविले, तर त्यांना गटसाखळीतील एक सामना बाकी राखून 132 व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठता येईल. लढत गुवाहाटी येथे होईल.
नॉर्थईस्ट युनायटेड संघ गुवाहाटीचा असल्यामुळे त्यांना पाठिराख्यांचे जोरदार प्रोत्साहन अपेक्षित असेल. दोन्ही संघांनी अगोदरच्या लढतीत दणकेबाज विजय नोंदवून अपेक्षा उंचावल्या आहेत.
एफसी गोवाने शिलाँग लाजाँगचा 6-0 असा धुव्वा उडविला, तर नॉर्थईस्ट युनायटेडने मेघालयातील संघाला 4-0 असे नमविले होते. सध्या एफसी गोवा संघ +2 या सरस गोलसरासरीसह ड गटात अव्वल आहे.
शिलाँग लाजाँगविरुद्ध मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ निलंबनामुळे डग-आऊटमध्ये नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत साहाय्यक प्रशिक्षक अर्जेंटिनाचे बेनिटो माँटेल्व्हो यांनी जबाबदारी निभावली होती. मोरोक्कन नोआ सदोई याची हॅटट्रिक, रॉलिन बोर्जिस, स्पॅनिश खेळाडू कार्लोस मार्टिनेझ व व्हिक्टर रॉड्रिगेझ यांच्या प्रत्येकी एका गोलमुळे एफसी गोवा संघाला एकतर्फी विजयाची नोंद करता आली.
मात्र शनिवारी प्रतिस्पर्धी तुल्यबळ असल्याने गोव्यातील संघाला पूर्ण क्षमतेने खेळावे लागेल. नॉर्थईस्ट युनायटेडसाठीही पूर्ण तीन गुण महत्त्वाचे आहेत. त्यांनी विजय मिळविल्यास बाद फेरीतील प्रवेश सुकर होईल.
सदोई ठरला हुकमी एक्का
मोरोक्कोचा 29 वर्षीय मध्यरक्षक नोआ सदोई एफसी गोवासाठी हुकमी एक्का ठरला आहे. गतमोसमात त्याने संघासाठी 23 लढतीत 11 गोल केले होते, यंदा पहिल्याच लढतीत तीन गोल करून एफसी गोवातर्फे वैयक्तिक गोलसंख्या 24 वर नेली आहे.
शिलाँग लाजाँगविरुद्धच्या कामगिरीविषयी तो म्हणाला, "एफसी गोवाकडून खेळताना मी पहिली हॅटट्रिक केली याचा आनंद वाटतोय, मात्र संघ चांगला खेळला हे जास्त महत्त्वाचे आहे. नॉर्थईस्ट युनायटेड आमच्यासाठी कठीण प्रतिस्पर्धी आहे. आता प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार खेळ करून पुन्हा विजय नोंदविण्याचे लक्ष्य आहे. बाद फेरीसाठी पात्रता आणि ड्युरँड कप जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्याचवेळी वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर प्रगती साधणे हे मुख्य ध्येय आहे."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.