Bhoma Road Expansion: चौपदरीकरण नकोच; प्रसंगी रस्त्यावर झोपून आंदोलन करु- भोमवासियांसह सर्वपक्षीय एकवटले

सभेत महिलांचा एल्‍गार : सर्व पक्षीयांसह अनेकांचा ग्रामस्‍थांना पाठिंबा
Boma Road Expansion
Boma Road ExpansionDainik Gomantak

Boma Road Expansion: भोमच्या रस्ता आंदोलनात आता राज्यातील विविध राजकीय पक्षांसोबतच अनेक संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला असून आज झालेल्या भोमच्या सभेत जोपर्यंत भोममधील चौपदरी रस्ता रद्द होत नाही आणि बगलमार्गाचा विचार सरकार करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

सरकारने जबरदस्ती केल्यास मुख्य महामार्ग रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. भोमचा चौपदरी रस्ता रद्द करण्यासाठी मोठे आंदोलन पुकारण्याची आमची तयारी आहे, त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर झोपून आंदोलन करू, असा इशारा भोम येथील महिलांनी दिला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पुढील सरकार हे काँग्रेसचेच असेल आणि आम्ही भोम गावातील नियोजित चौपदरी रस्ता रद्द करून बगलमार्गाचा पुरस्कार करू, असे आश्‍वासन दिले.

भोम येथील या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह रेव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर, भाजपचे सुनील देसाई, सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे, परशुराम सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर तसेच आरजीचे विश्‍वेश नाईक व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

भोमच्या लोकांना आरजीचा पूर्ण पाठिंबा असून आंदोलनात आरजी सक्रिय भाग घेईल, अशी ग्वाही वीरेश बोरकर यांनी दिली.

वक्ते आक्रमक

गोव्यात पर्यावरणाचा ऱ्हास चालला आहे. लोकांच्या विरोधात भाजप सरकार निर्णय घेत आहे. या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली असून आता संघटित लढा उभारल्याशिवाय गत्यंतर नाही.

भोमवासीयांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू, असे वचन राजन घाटे यांनी दिले. तसेच शैलेंद्र वेलिंगकर यांनीही भाजप सरकारवर टीका करताना गोमंतकीयांना बेघर करण्याचे षडयंत्र भाजप सरकारने अवलंबले असल्याचे नमूद केले.

आम्ही सोबत, तुम्ही घाबरू नका

विश्‍वेश नाईक, नीलेश गावडे तसेच पेडणे व काणकोण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या सभेत सहभाग घेऊन भोमवासीयांना आपला पाठिंबा दर्शवला. तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे ठामपणे या कार्यकर्त्यांनी भोमवासीयांना सांगितले.

प्रियोळचे आमदार तथा कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याकडून एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोपही वक्त्यांनी यावेळी केला व सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

...तर काँग्रेसची भक्कम साथ

अमित पाटकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाने 2012मध्ये रिजनल प्लॅन तयार केला होता, त्याचा पुरस्कार करताना भोमची अस्मिता टिकवण्यासाठी आणि गाव वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम भोमवासीयांच्या पाठीशी राहील.

भोमवासीयांना जाचक ठरलेला आणि गावाला त्रासदायक ठरलेला नियोजित रस्ता त्वरित रद्द करून बगल मार्ग स्वीकारावा. काँग्रेस पक्ष याप्रकरणी मोठे आंदोलन पुकारेल, असा इशारा दिला.

वेठीस धरण्याचा प्रकार

भोमवासीयांचा आवाज विधानसभेपर्यंत पोचवण्यात येणार आहे. मागच्या काळात भोमचा हा प्रश्‍न विधानसभेत घेण्यात आला होता, पण त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी भोमवासीयांना विश्‍वासात घेऊन हा प्रश्‍न निकाली काढू असे सांगितले होते, पण तसे न करता भोमवासीयांना वेठीस धरण्याचा प्रकार चालला आहे. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी केला.

Boma Road Expansion
Santosh Cup Football: गटविजेता बनण्यासाठी गोव्यासमोर मोठा टास्क, केरळला पराभूत करावेच लागेल, अन्यथा..

भाजपचे सुनील देसाई सभेत... :

भाजपचे फोंड्यातील नेते सुनील देसाई भोमच्या सभेला उपस्थित होते. त्यांनी भोमवासीयांना आपला पाठिंबा दर्शवताना हा प्रश्‍न भोमवासीयांना विश्‍वासात घेऊन सोडवण्याची आवश्‍यकता व्यक्त केली. भोमवासीयांना जर गावातून रस्ता नको असल्यास बगलमार्गाचा विचार केला जाऊ शकतो, त्यामुळे त्यासंबंधी सरकारने निर्णय घ्यावा.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भोमवासीयांशी चर्चा करावी. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या रस्त्याचा प्रश्‍न ज्यावेळेला उपस्थित झाला, त्यावेळेला भोमवासीयांना विश्‍वासात घेऊनच योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते, त्याची आठवण करून दिली. त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घ्यावा आणि हा तिढा सोडवावा, असे आवाहन सुनील देसाई यांनी केले.

Boma Road Expansion
School Student Missing Case: शेल्पे-धुळेर येथून 15 वर्षीय शालेय विद्यार्थी बेपत्ता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com