Goa Politics: खरी कुजबुज; युरीबाबको गुस्सा क्यों आता है?

Khari Kujbuj Political Satire: रोरो फेरी सुरू झाल्यापासून ती वारंवार दुरुस्तीसाठी जात आहे, तर कधी मध्येच समुद्रात बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

युरीबाबको गुस्सा क्यों आता है?

गोवा विधानसभा अधिवेशनाचा आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे अन् सोमवारी पहिल्याच दिवशी सभापती तसेच मुख्यमंत्र्यांनी सदस्यांना सभागृहाची सभ्यता पाळा असे बजावले. त्यांचा रोख खासकरून विरोधी पक्ष नेते युरीबाब यांच्या दिशेने होता, असे म्हटले जाते. असे म्हणतात की विरोधीपक्षनेत्याला कॅबिनेट दर्जा असतो. आजवरच्या बहुतेक विरोधी पक्ष नेत्याने म्हणे त्या पदाची शान राखली आहे. त्यांच्याशी तुलना करताना युरीबाबांनी आत्म परिक्षण करावे, असा सल्ला तर त्यांनी दिला नाही ना, अशी चर्चा काल विधानसभा परिसरात सुरू होती. असे म्हणतात की कोणत्याही मुद्द्यावर युरीबाब लगेच आक्रमक होतात व तावातावाने बोलतात. पूर्वी व्हेन्झी यांचाही तोच पवित्रा असायचा पण सध्या ते नरम वाटतात. तावातावाने मुद्दा मांडला म्हणूनच तो विचारांत घेतला जातो, असे नाही. पण युरीबाबांची ही पहिलीच टर्म असल्याने त्यांच्या ते लक्षात आलेले नसावे, असे सत्ताधारी म्हणतात. ∙∙∙

कुंकळ्‍ळीत चायना वॉल?

काही दिवसांपूर्वी कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत विधानसभेत चर्चेत आली होती, ती तिथे असलेल्‍या घातक औद्योगिक कचऱ्यामुळे. विधानसभेतील चर्चेच्‍यावेळी मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा घातक कचरा तीन ते चार महिन्‍यात हटविला जाईल असे सांगून कुंकळ्‍ळीकरांना दिलासा दिला. पण पुन्हा कुंकळ्‍ळीची ही औद्योगिक वसाहत चर्चेला आली ती तिथे असलेल्‍या कथित अशा चायना वॉलमुळे? काल ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना, अविराज देसाई यांनी कुंकळ्‍ळी आयडीसीत एका माफिया उद्योजकाने ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ उभारली असून दोन वर्षे तिला हात लावण्‍यास कुणीही धजावत नाहीत, असा आरोप केला. ही जर चायना वॉल सरकार हटवू शकत नाही, तर कमीत कमी ही जागा पर्यटन क्षेत्र म्‍हणून जाहीर करा, असे ते म्‍हणाले. या कथित चायना वॉलमुळे कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत पुन्‍हा एकदा चर्चेत येणार हे नक्‍की. ∙∙∙

रोरो ः सोय की डोकेदुखी?

रोरो फेरी सुरू झाल्यापासून ती वारंवार दुरुस्तीसाठी जात आहे, तर कधी मध्येच समुद्रात बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. "आता अचानक काही घडले आणि वाईट गोष्ट घडली तर जबाबदारी सरकार घेणार का?, असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. प्रवाशांच्या या प्रश्नांमध्ये तथ्य आहे. एखादी नवीन सेवा सुरू केल्यानंतर ती सातत्याने तांत्रिक बिघाडांमुळे थांबत असेल, तर प्रवाशांचा तिच्यावरील विश्वास कमी होतो. विशेषतः समुद्रात असताना अचानक फेरी बंद पडल्यास प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रोरो फेरीची तांत्रिक तपासणी करावी आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खात्री द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ∙∙∙

शपथ घेतली शनिवारी; मंगळवारीच शिष्टमंडळ हजर!

राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी शनिवारी गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली, आणि अवघ्या तीन दिवसांत मंगळवारी त्यांच्या भेटीस गोवा राज्य हज समितीचे शिष्टमंडळ राजभवनात हजर झाले! गोव्यातील राजकीय वा सामाजिक संस्थांमध्ये निर्णय प्रक्रियेचा वेग सामान्यतः काहीसा संथ असतो, हे सर्वश्रुत आहे. पण हज समितीने दिलेली ही गतीमान भेट पाहता, नव्या राज्यपालांचे स्वागत ‘प्रारंभीच’ औपचारिक गतीने पार पडल्याचे स्पष्ट होते! शिष्टमंडळाने ही सदिच्छा भेट घेतली असली, तरी ती इतक्या तत्परतेने घेण्यामागे काय गूढ दडले आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते, नव्या राज्यपालांच्या कार्यपद्धतीची चुणूक लवकरच दिसेल, हे ओळखूनच ही ‘प्रारंभीची उपस्थिती’ दाखवण्यात आली! हज यात्रेसारख्या धार्मिक, संवेदनशील आणि आस्थेच्या विषयात सरकार आणि समिती यांच्यात समन्वय महत्त्वाचा असतो, याचा विचार करता ही भेट निश्चितच महत्त्वाची म्हणावी लागेल. पण तिच्या वेळेने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या! राजभवनात झालेल्या या भेटीत सौहार्दाचे वातावरण होते, पण पाहुण्यांच्या गडबडलेल्या उपस्थितीने आता चर्चा मात्र ताज्या झाल्या आहेत – शपथ घेतली शनिवारी आणि शिष्टमंडळ पोचले मंगळवारी! ही गती कायम राहिली, तर पुढच्या दिवसांत राजभवनातील भेटींना नवे वेग मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.∙∙∙

स्वच्छतेचा पुरस्कार आणि दुर्गंधीची वास्तववाट!

‘गोव्यातील सर्वात स्वच्छ शहर – पणजी!’ हा पुरस्कार मोठ्या अभिमानाने स्वीकारण्यात आला. बॅनर लावले गेले, फोटोसेशन झाले, आणि सोशल मीडियावर स्वच्छ शहर ट्रेंडही झाला! पण काही नागरिकांनी एक छोटीशी चूक केली ते थेट पणजी मार्केटच्या पार्किंगमध्ये शिरले आणि तिथेच सर्व पुरस्कार गुदमरला! या पार्किंग भागात पाऊल टाकताच श्वास रोखावा लागतो. तोंडाला रुमाल लावूनही वाचणं कठीण! आजूबाजूला प्लास्टिक, कुजलेली फळं, भिजलेले बॉक्स आणि एकंदर वातावरण असा की जणू "कचरा पर्यटन" अनुभवायला मिळतोय! स्वच्छ भारत अभियानात नाव आघाडीवर, पण भूमीवर ढीग. काही जण म्हणतात, ‘पुरस्कार रिपोर्टवर मिळतो, पण दुर्गंधी अनुभवावर!’ अनेक नागरिक आणि पर्यटकांची अवस्था – फोटो काढायचे होते पण नाक बंद करताच चेहरा दिसेना! ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने झपाट्याने – पण माशांच्या घमघमीत वळणावर! पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भाग असताना देखील बाजाराच्या मागच्या बाजूस असलेली ही दुर्दशा म्हणजे स्मार्टनेसचा ‘स्मेल टेस्ट’ फेल झाल्याचा पुरावा वाटतो. हे दृश्य म्हणजे सणाच्या दिवशी वर अंगारख्याचा बटण लावलेलं, पण खाली पॅन्ट फाटलेली! शहराच्या मुख्य रस्त्यांवर फुलांची रोपं लावून फोटो टाकायचे, पण नागरिकांनी तिथून बाजूला वळून पाहिलं तर तोंडावर कचऱ्याचा फटका बसायचा! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

अन् मोरपिर्लाचे नाव दिल्लीत गाजले !

कधी कोणाचे नशीब फळफळणार हे सांगणे कठीण. मोरपिर्ला हा केपे तालुक्यातील एक दुर्गम गाव. या गावात योग्य त्या साधन सुविधा नाहीत म्हणून काही शिक्षित लोक शहरात स्थायिक झालेले आहेत. एसटी बाहुल्य या गावाचे नाव काल दिल्लीत गाजले.केंद्र सरकारने पीएम श्री योजने अंतर्गत सुरू केलेल्या शाळांचे लोकार्पण केले. केंद्रीय शिक्षण मंत्री व इतर मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. मोरपिर्ला सरकारी शाळेला पीएम श्री शाळेचा दर्जा मिळाला असून या शाळेचे ही लोकार्पण दिल्लीत करण्यात आले. दिल्लीत या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम मोरेना यांनी खास उपस्थिती लावली होती.दिलीत धर्मेंद्र प्रधान यांनी मोरपिर्ला शाळेचे नाव वर काढले तर मोरपिर्ला येथे जाऊन समाज कल्याण मंत्री सुभाष फळ देसाई यांनी पीएम श्री शाळेचे विमोचन केले. काही का असेना मोरपिर्ला चे नाव दिल्लीत गाजले. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; रवी नाईकांचे विनोद

बेघर आहेत तरी किती?

बेकायदेशीर बांधकामांचा म्हणजे बेकायदेशीर घरांचा मुद्दा अजून निकालात निघालेला नाही, अन् आता दोतोर मुख्यमंत्र्यांनी गोव्यात कुणीही बेघर रहाणार नाही त्यासाठी पेडणेत जागाही पाहिली आहे , तेथे घरे बांधून ती बेघरांना दिली जातील, असे जाहीर केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कारण गोव्यात आजवर विविध योजनांखाली गरजूंना भूखंड व घरेही दिली गेलीत दुसरीकडे सभापतींनी हाती घेतलेल्या श्रमधाम योजनेखाली घरे उभी रहात आहेत. मग सरकारचा बेघरांना निवारा देण्याचा हा आटापिटा नेमका कोणासाठी, गोव्यात बेघर आहेत तरी किती, असा प्रश्न केला जाऊ लागलाय. कारण अनेक सरकारी योजनांचा होत असलेला गैरवापर तो झाल्यावर उघडकीस येतो कोकणीत ‘नागोवन म्हाबळेश्वर’ अशी जी म्हण आहे, तशी गत सरकारची होते. यास्तव प्रथम बेघर किती आहेत, ते शोधा असा सल्ला अनेकजण देऊ लागलेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com