Goa Politics: खरी कुजबुज; रवी नाईकांचे विनोद

Khari Kujbuj Political Satire: मडगावचे आमदार दिगंबर कामत हे देवभक्त आहेत, हे सर्वश्रुत आहेत. आता त्यांनी मडगावातील सर्व मंदिरांमध्ये उत्सवाच्या दिनी न चुकता भेटी देण्यास सुरवात केली आहे.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
Published on
Updated on

रवी नाईकांचे विनोद!

कृषिमंत्री रवी नाईक यांची हल्लीची भाषणे म्हणजे विनोद कसा असावा, याचे प्रात्यक्षिकच असते. तोंडावरची रेषही न हलवता ते असे काही बोलतात की ऐकणाऱ्यांची व बघणाऱ्यांची हसून हसून पुरेवाट होते. विधानसभेतही ते बोलायला उभे राहिले की, आता विनोदाची खमंग मेजवानी मिळणार या आशेने बघणाऱ्यांच्या तोंडावर हास्य फुलू लागते. आणि पात्रावही त्यांना निराश करताना दिसत नाहीत. परवा त्यांनी गवे व बिबटे पाळण्याचा लोकांना दिलेला संदेश तर ‘टॉक ऑफ गोवा’ ठरला होता. त्यांचा हा आगळावेगळा संदेश बघून तर काहीजण म्हणे हसून हसून खुर्चीवरून खाली पडले. आता ही अतिशयोक्ती आहे की नाही, हे सांगता येत नसले तरी हा संदेश चर्चेचा मोठा विषय ठरलाय, एवढे नक्की. मात्र पात्रावच्या या विनोदांमुळे एरव्ही रुक्ष असलेले राजकारण करमणूक प्रधान होत चाललेय, हेही नसे थोडके! ∙∙∙

म्हादई खरे तर कॉंग्रेसच्याच हाती

गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात म्हादई मुद्दा चांगलाच गाजला. कॉंग्रेसने सरकारला चांगलेच धारेवर धरले. केवळ विधानसभेतच नव्हे तर बाहेरही अनेक नेत्यांनीही सरकारबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या व सरकार काहीच करत नसल्याचा ठपका ठेवला. या प्रकरणात भाजपवाले उघडपणे काहीच बोलत नाहीत, पण कॉंग्रेस सत्तेवर असताना जे दुर्लक्ष झाले त्याचीच ही फळे असल्याचे म्हणतात. काहीजण तर हे नेते गोव्यात आकांडतांडव करतात. पण त्यांना जर म्हादईची खरेच इतकी चिंता असेल तर कर्नाटकातील त्या पक्षाच्या सरकारचे म्हादई बाबत मतपरिवर्तन का करत नाहीत, असेही विचारतात. कर्नाटकाने जर थोडा दिलदारपणा दाखवला तर ही समस्या चुटकीसरशी सुटू शकते. पण सगळ्याच राजकीय पक्षांना म्हादईचा गुंता सुटलेला नको असावा, अन्यथा भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी या प्रश्नी बोटचेपी भूमिका घेतली नसती, हे मात्र खरे.∙∙∙

दिगंबरचा तंबोरा

मडगावचे आमदार दिगंबर कामत हे देवभक्त आहेत, हे सर्वश्रुत आहेत. आता त्यांनी मडगावातील सर्व मंदिरांमध्ये उत्सवाच्या दिनी न चुकता भेटी देण्यास सुरवात केली आहे. याबद्दल कुणाचाही आक्षेप नसावा. श्रावण महिना सुरु झाल्याने मंदिरात भजनी सप्ताहांना सुरवात झाली आहे. दिगंबरबाबांना या सप्ताहाचा शुभारंभ करण्यास आवर्जुन आमंत्रण असते व ते पालनही करतात. आता सप्ताहाची सुरवात तंबोरा हातात घेऊन करावयास त्यांनी सुरवात केली आहे. श्री विठ्ठल मंदिरात व पेडवाडा येथील मारुती मंदिरातील सप्ताहाची सुरवात त्यांनी तंबोरा काही वेळ हातात घेऊनच केली. जेव्हा राम मंदिराचे उदघाटन झाले तेव्हा मडगावात फारसा उत्साह नव्हता. पण लोकसभा निवडणुकी नंतर मंदिरामधील भेटी वाढलेल्या आहेत असे भाजपचेच कार्यकर्ते बोलताना दिसत आहे. भाजप मध्ये प्रवेश केल्याने अल्पसंख्यांकांची मते तर कमी होणार नाहीत ना ही भिती कदाचित असावी अशीही शंका भाजप कार्यकर्ते व्यक्त करू लागलेत.∙∙∙

भंडारी समाज अन् गट-तट

राज्यातील सर्वात मोठा घटक असलेल्या भंडारी समाजात दोन गट पडले आहेत. एकीकडे हे दोन्ही गट एकत्रित यावेत, असे काही बोटावर मोजता येतील इतक्या लोकांना वाटते, परंतु काहींना गटबाजी आहे तीच बरी असेही वाटत असणार. सर्वात मोठा समाज एकत्र येईल, याची चिन्हे अजिबात दिसत नाहीत. या समाजात अनेक नेते आहेत, मंत्री होऊन गेले आहेत आणि काही आमदारही आहेत. पण एकसंध राहू, असे या समाजाला का वाटले नाही, याचा विचार कोणीच करीत नाहीत. सत्तेवर येणारा पक्ष या समाजाचा वापर करीत आला आहे, हे काही लपून राहत नाही. दोन गटातील एका गटाचे नेतृत्व करणारे उपेंद्र गावकर हे ठिकठिकाणी तालुका समित्या स्थापन करीत आहेत. काही समित्या स्थापून जाहीरही केल्या आहेत. त्यांनी आपल्या गटाचे काम सुरूच ठेवले आहे, त्यामुळे कोणी काय म्हणतो, याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. ∙∙∙

पक्ष्यालाही काहीतरी सांगायचे नाही ना?

पर्वरीत आज एक घटना घडली... घटना तशी निश्चित विचार करायला लावणारी म्हणा किंवा काहीजणांसाठी तो निव्वळ योगायोगही. रविवार असल्याने भाजप नेत्यांना पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकावाच लागतो. कोण आपापल्या घरी तर कोण कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन हा कार्यक्रम ऐकतात. आजही पर्यटनमंत्री रोहन खंवटे आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी ‘मन की बात’ ऐकत होते. त्याचवेळी ‘शिपाई बुलबुल’ हा पक्षी अगोदर शेजारी बसलेल्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसतो, त्यानंतर तो मागील बाजूने जाऊन मंत्री खंवटे यांच्या खांद्यावर बसतो. कार्यक्रम पाहत असताना मान वळवून ते पक्षाकडे पाहत असेपर्यंत तरी तो पक्षी खांद्यावर बसल्याचे दिसत आहे. यावेळी कार्यक्रम ऐकण्यासाठी बसलेल्या एका कार्यकर्त्याने हा क्षण मोबाईलवर चित्रित केला आणि आता ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झालीय. विशेष बाब म्हणजे कदाचित त्या पक्ष्याला काही तरी ‘मन की बात’ सांगायची तर नव्हती ना? असा प्रश्न अनेकांना पडलाय! ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; रामदेवबाबांचे कुंकळ्‍ळीतही कारनामे?

बाबूंचा पुढाकार स्वागतार्ह!

हे बाबू आहेत केपेंचे. म्हणजे अनेक कार्यकाळ ते केपेंचे आमदार होते व नंतर भाजपात आल्यावर उपमुख्यमंत्रीही झाले. आज जरी ते आमदार नसले तरी सरकारात त्यांच्या शब्दाला वजन आहे, हे निश्चित. तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे सरकारने तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय घेतला येथवर ठीक होते. पण त्या जिल्ह्याचे मुख्यालय कुडचडे असेल असे जाहीर केल्यावर बाबू गप्प बसले नाहीत. तर त्यांनी तडक पर्वरी गाठून कुडचडे मुख्यालय करणे कसे अयोग्य आहे, ते पटवून दिले. खास करून काणकोणमधील लोकांना कुडचडे कसे त्रासदायक ठरेल, ते त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. त्यासाठी म्हणे त्यांनी ‘फातर्पेच्यान गोंय लागीं’ या म्हणीचे उदाहरणही दिले. एरवी मितभाषी असलेल्या बाबूंच्या या पुढाकाराबद्दल काणकोण मधील लोक मात्र फिदा झाल्याचे म्हटले जातेय.∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

कुत्र्याचा हल्ला अन् राजकारण

विधानसभेत नुकतेच पिटबुल आणि रॉटविलरसारख्या हिंस्त्र कुत्र्यांवर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले, तेव्हा विरोधकांनी त्याला विरोध केला होता. आता चिंबल येथे हल्ल्यानंतर आमचा निर्णय कसा योग्य होता, हे या घटनेतून सिद्ध झाले आहे, असे सत्ताधारी पक्षाचे समर्थक छाती ठोकून सांगत आहेत. विरोधकांवर निष्काळजीपणाचा आणि लोकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते सर्रास करत आहेत. या सगळ्या गदारोळात, हल्ल्यात जखमी झालेल्या त्या चिमुकलीची प्रकृती स्थिर असली तरी, तिच्या वेदना आणि भीती कुणाच्याच लक्षात येत नाही. राजकारण्यांना मात्र हा मुद्दा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आयता मिळाला आहे. एकूणच, एका दुःखद घटनेचे रूपांतर आता राजकीय चिखलफेकीत होताना दिसत आहे आणि यावरच सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com