Ponda: फोंड्यात राजकीय वर्चस्वाची लढाई, ‘रुद्रेश्वर’मुळे रवी ‘फॉर्मात, ‘महाकुंभ’मुळे भाटीकरांना ‘ऊर्जा’; काँग्रेसमध्ये शुकशुकाट

Ponda Politics: विधानसभा निवडणुकीला अद्याप पावणेदोन वर्षांचा काळ असला तरी फोंड्यात राजकीय वर्चस्वाकरिता आतापासूनच लढाई सुरू झाली आहे.
Minister Ravi Naik, Ponda Politics
Minister Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Politics Assembly Election

फोंडा: विधानसभा निवडणुकीला अद्याप पावणेदोन वर्षांचा काळ असला तरी फोंड्यात राजकीय वर्चस्वाकरिता आतापासूनच लढाई सुरू झाली आहे. सध्या इच्छुक उमेदवार मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. याबाबतीत नगरसेवक विश्वनाथ दळवी हे आघाडीवर असून त्यांनी आगामी निवडणूक बरीच गांभीर्याने घेतल्याचे दिसते.

भाजपच्या उमेदवारीसाठी कृषिमंत्री रवी नाईक यांचे पुत्र तथा विद्यमान नगरसेवक रितेश हे प्रमुख दावेदार असल्याची जाणीव असल्यामुळे दळवी आपले महत्त्व वाढविण्याचे भगीरथ प्रयत्न करत आहेत. रूद्रेश्वर यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर रवी थोडे शांत वाटत असले तरी पडद्याआड अनेक हालचाली सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

यामुळे फोंड्यातील भाजपमधील गटबाजी प्रत्ययाला येत असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ती वाढणार, हे निश्चित. या लढतीचा तिसरा कोन असलेले मगोप नेते डॉ. केतन भाटीकर हे सावधपणे पावले टाकत असून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जाऊन आल्यापासून त्यांची ऊर्जा वाढलेली दिसते.

मात्र, भाजप-मगोपची युती होणार काय, युती झाल्यास फोंड्याची जागा कोणाला मिळेल, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत केवळ ७७ मतांनी पराभव झाल्यामुळे यावेळी भाटीकरांना ताकही फुंकून प्यावे लागणार, यात शंकाच नाही.

या सगळ्या घडामोडीत काँग्रेसच्या गोटात मात्र ‘ठंडा ठंडा कुल कुल’ असे वातावरण दिसत आहे. राजेश वेरेकर यांची भूमिका अस्पष्ट असून ते कोणती रणनीती आखण्यात मग्न आहेत, हे कळायला मार्ग नाही. मात्र, अशीच स्थिती राहिल्यास काँग्रेसच्या उमेदवारीबाबत ‘उलथापालथ’ होऊ शकते, असा तर्क राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

दळवींचा ‘सर्वव्यापी’ संचार

नगरसेवक विश्वनाथ दळवी सध्या सर्वच क्षेत्रांत संचार करताना दिसत आहेत. बालवाडीपासून युवकांच्या बॉडी बिल्डिंग, ज्येष्ठांच्या आरोग्य शिबिरांपर्यंत त्यांचा संचार दिसतो. यातून ते जनतेशी ‘कनेक्ट’ राहताना दिसतात. माजी खासदार विनय तेंडुलकर यांच्याशी त्यांची वाढत चाललेली जवळीकही चर्चेचा विषय होऊ लागली आहे. आता या सर्वाचा त्यांना किती फायदा होतो, हे मात्र काळच सांगेल.

भाटीकरांची ‘गणेश जयंती’

बेतोड्यात नुकत्याच झालेल्या गणेश जयंतीचे केतन भाटीकर हे यजमान होते. आमंत्रण पत्रिका घरोघरी पोहोचल्यामुळे या उत्सवाला फोंड्यातील लोकांची गर्दी झाली होती. यातून भाटीकरांनी लोकांशी थेट संपर्क साधण्याची संधी साधली. आता ही संधी ‘इष्टापत्ती’ ठरते की काय, याचे उत्तर काही दिवसांत मिळू शकेल.

Minister Ravi Naik, Ponda Politics
Goa Politics: '..हा तर सामान्य जनतेचा विजय'! दिल्ली जिंकल्यानंतर गोव्यात जल्लोष, 2027 मध्ये 27 जागांचा पुनरुच्चार

काँग्रेसची वेगळी रणनीती

सध्या राजेश वेरेकर विशेष सक्रिय नसल्याने कुर्टी- खांडेपारचे माजी सरपंच जॉन परेरा, नारायण नाईक, शेख शब्बीर, अरुण गुडेकर या निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवी रणनीती आखण्याचे ठरविल्याचे कळते. आता ही रणनीती काय, याचे दर्शन ‘झेडपी’ निवडणुकीत होऊ शकते.

Minister Ravi Naik, Ponda Politics
Goa Politics: ‘USA’त भारतीयांचा सन्मान राखण्यात सरकार अपयशी, अमित पाटकरांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

रवी ‘मुरब्बी खिलाडी’

सध्या फोंडा राजकीयदृष्ट्या सक्रिय असला तरी कृषिमंत्री रवींचे खरे मोहरे अजूनही पटलावर आलेले दिसत नाहीत. ते सहावेळा निवडून आल्यामुळे त्यांना या मतदारसंघाची नस न् नस माहीत झाली आहे. त्यामुळे ते कधी कोणते पाऊल उचलतील, हे सांगणे कठीण आहे. पण आठ महिने दूर असलेल्या झेडपी निवडणुकीपासून ते पत्ते उघडतील, अशी शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com