

पणजी: पोर्तुगीज राजवटीतील प्रवासाच्या जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांचे पुराभिलेख खात्याने पूर्णपणे डिजिटायझेशन केले आहे. ही महत्त्वाची कागदपत्रे आता लवकरच ''गोवा ऑनलाईन'' या शासकीय वेब पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
पोर्तुगीजकालीन ही कागदपत्रे सध्या अनेक नागरिक विविध प्रकारच्या कायदेशीर दस्तऐवजांसाठी, प्रशासकीय कामांसाठी आणि पासपोर्टसंबंधी (Passport) प्रक्रियेसाठी नियमितपणे वापरत असतात. सध्या ही कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, लवकरच ती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती माहिती संचालक डॉ. बालाजी शेणवी यांनी दिली.
शेणवी म्हणाले की, हे दस्तऐवज ''गोवा ऑनलाईन'' पोर्टलवर समाविष्ट केल्यानंतर नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील. नागरिक घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतील. विहित शुल्क भरून नागरिकांना या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या अधिकृत प्रमाणित प्रती डिजिटल स्वरूपात थेट प्राप्त करता येतील. शासन स्तरावर या प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ही ऑनलाईन सेवा गोमंतकीयांसाठी खुली करण्यात येणार आहे. हे डिजिटायझेशनचे काम पुराभिलेख खात्याचे अधिकारी राजीव कुडके यांच्या अखत्यारित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुराभिलेख खात्याने पोर्तुगीजकालीन आणि ऐतिहासिक दस्तऐवजांच्या डिजिटायझेशन प्रक्रियेत मोठी कामगिरी बजावली आहे. नागरिकांना घरबसल्या कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने लाखो पानांचे स्कॅनिंग पूर्ण केले आहे. डिजिटायझेशनमुळे गोव्यातील नागरिकांना त्यांच्या जमिनीचे जुने दाखले, पोर्तुगीजकालीन प्रवासाची कागदपत्रे आणि वारसा हक्काच्या फाईल्स लवकरच ''गोवा ऑनलाईन'' पोर्टलवर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
भूमी अभिलेख : २ लाख ४९ हजार १३८ पाने
एनटीआर (नोटरी कागदपत्रे) : १५.३६ लाख पाने
इन्व्हेंटरी फाईल्स : सर्वाधिक २८.७६ लाख पाने
''दोकुमेंतो पारा व्हियाझे'' : एकूण २१० पुस्तके असून, त्यांमधील १ लाख ६२ हजार ६६१ नोंदींचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.