

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम पदार्थ आणि सोन्यासारख्या महत्त्वाच्या आयातीबाबत संयम बाळगण्याचे केलेले आवाहन नागरिकांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले. जागतिक युद्धस्थिती आणि अनिश्चित आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, पेट्रोलियम पदार्थ आणि सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर थेट परिणाम होतो. अशा वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा परदेशात जात असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांकडे केवळ सल्ला म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या जागतिक घडामोडींवर भाष्य करताना सावंत म्हणाले की, आंतरराष्ट्रीय परिस्थिती अत्यंत अनिश्चित असून ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका अनेक देशांनी घेतली आहे.
भविष्यात काय घडेल याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने केंद्र सरकार सर्व बाबींचा सखोल विचार करून निर्णय घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.पंतप्रधान आपल्या स्तरावरून जेव्हा अशा प्रकारची विधाने करतात, तेव्हा त्यामागे विविध देशांशी असलेले भारताचे संबंध, जागतिक अर्थकारण आणि सुरक्षेचे पैलू यांचा विचार केलेला असतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला संबोधित करीत असताना, ‘पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर विचारपूर्वक करा.
कोविड काळात अवलंबलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ मॉडेलचा म्हणजे जिथे शक्य असेल तिथे कंपन्या आणि संस्थांनी पुन्हा घरून काम करण्याच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, असे आवाहन केले होते.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील घडामोडींसंदर्भात त्या–त्या देशांतील प्रमुखांशी चर्चा करीत असतात. त्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे? हे सांगता येत नाही. पण, त्यांच्या संदेशाचे पालन करणे नागरिकांची जबाबदारी आहे’, असेही त्यांनी नमूद केले.
जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाचे जनतेने पालन करावे. त्यामुळे वर्षभरात देशाचे रु.११ लाख कोटी वाचतील,असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले. युद्धजन्य स्थितीचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो, हे लक्षात घेऊनच मोदींनी दूरदृष्टी ठेवून पेट्रोल-डिझेलची बचत, ‘वर्क फ्रॉम होम’, सोने खरेदीबाबत संदेश दिला आहे. हा विचार करून सर्वांनी त्यांच्या संदेशाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आता इंधन वाचवणे हा केवळ पर्यावरणाशी संबंधित विषय राहिला नसून, तो देशाच्या आर्थिक मजबुतीशीही जोडला गेला आहे. वाढत्या जागतिक ऊर्जा किमती आणि तेल संकट पाहता, देशातील इंधनाचा वापर कमी व्हावा जेणेकरून परकीय चलनावर येणारा दबाव कमी करता येईल, अशी सरकारची इच्छा आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच दिवसांपूर्वी देशभरातील जनतेला संबोधित करीत असताना, ‘‘पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर विचारपूर्वक करा. कोविड काळात अवलंबलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ मॉडेलची पुन्हा अंमलबजावणी करा, पुढील वर्षभर सोने खरेदी करू नका’’, असा संदेश दिलेला होता. त्यांच्या या संदेशानंतर विरोधी काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच ते आता अशाप्रकारचे संदेश जनतेला देत असल्याची टीका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.