Goa App Taxi Issue : गोव्यात टॅक्सीवाल्यांची मुजोरी कधी थांबणार?

Goa App Taxi Issue : दाबोळी विमानतळ स्‍थानिक टॅक्‍सीवाल्‍यांच्‍या मग्रुरीपायी बंद होण्‍याचा धोका वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केला आहे.
Goa App Taxi Issue
Goa App Taxi IssueDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी विमानतळ स्‍थानिक टॅक्‍सीवाल्‍यांच्‍या मग्रुरीपायी बंद होण्‍याचा धोका वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केला आहे. मोपा विमानतळ सुरू झाल्‍यानंतर स्‍वाभाविकपणे ‘दाबोळी’वर संक्रांत येणार आहे. पुढच्‍या 20 वर्षांत गोव्‍यातील पर्यटकांची संख्‍या किमान 50 टक्‍क्‍यांनी वाढेल, असा अंदाज घेऊन मोपा विमानतळ सुरू करण्‍यात आला. परंतु, वाढत्‍या प्रवासी संख्‍येसाठी ‘दाबोळी’ही सुरू ठेवणे परवडेल का, हा मुद्दा नेहमी चर्चेला येतो.

पर्यटन केंद्र म्‍हणून गोव्‍याची महती टिकून राहिली तर दुसरा विमानतळ सुरू ठेवता येईल. परंतु, तेवढ्या संख्‍येने पर्यटकांना आकृष्‍ट करण्‍याकरीता गोव्‍याला वेगवेगळ्या संकल्‍पना आणि पर्यटनातील क्‍लृप्‍त्‍या योजाव्‍या लागतील. त्‍यातील एक आवश्‍यकता राज्‍यातील पायाभूत सुविधा अद्ययावत बनवणे ही आहे. गोवा त्‍यात कमी पडतो आणि स्‍थानिकांची अरेरावी पर्यटनाच्‍या विकासात अडसर ठरले.

(Goa App Taxi Issue Latest News)

Goa App Taxi Issue
Goa News: पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या धार्मिक स्थळांची यादी गोवा सरकारकडे उपलब्धच नाही...

गोव्‍यात ‘ॲप’धारित टॅक्‍सीसेवा सुरू करणे काळाची गरज आहे. गोव्‍यासारख्‍या पर्यटन केंद्राला किफायतशीर आणि स्‍पर्धात्मक दर देणारी वाहतूक सेवा आवश्‍‍यक आहेच. दुर्दैवाने स्‍वस्‍त आणि आधुनिक अशी बससेवा आपण सुरू ठेवू शकलो नाही. राज्‍यात सार्वजनिक आणि खाजगी सेवा समांतर सुरू असली तरीही बससेवेला वाढत्‍या प्रवासी संख्‍येचे आव्‍हान पेलता आलेले नाही. दाबोळी विमानतळावरून योग्‍य दरात वेगवेगळ्या पर्यटन स्‍थळांवर पर्यटकांना नेणाऱ्या बसेस उपलब्‍ध नाहीत.

परिणामी ‘दाबोळी’वरील टॅक्‍सीवाल्‍यांनी आपली मक्‍तेदारी निर्माण केली आणि त्‍यातून कैक वर्षे पर्यटकांची लुबाडणूक, सतावणूक सुरू आहे. दक्षिण गोव्‍यात बहुतांश ठिकाणी त्‍या-त्‍या भागातील टॅक्‍सीवाल्‍यांची अरेरावी सुरूच असते. तेथे बाहेरचे टॅक्‍सीवाले सेवा देऊ शकत नाहीत आणि इतर कोणी आलेच तर त्‍यांना मारहाण करण्‍यापर्यंत स्‍थानिकांची मजल गेली आहे. ‘दाबोळी’वरही आज वास्‍को आणि आसपासच्‍या टॅक्‍सीवाल्‍यांनी मक्‍तेदारी निर्माण केली ती स्‍थानिक नेत्‍यांच्‍या पाठिंब्‍यामुळेच! सुरुवातीला मतांसाठी टॅक्‍सीवाल्‍यांचा दबाव सहन करण्‍यात आला.

तथापि, आता ही मक्‍तेदारी राज्‍याच्‍या पर्यटन विकासालाच ‘खो’ घालू लागली आहे. ‘दाबोळी’वर टॅक्‍सींचे दर ठरवून देण्‍यात आले आहेत. परंतु, तेही त्‍याच टॅक्‍सी संघटनांच्‍या दबावातून निश्‍चित झाले आणि ते अव्‍वाच्‍या सव्‍वा आहेत. गेल्‍या काही वर्षांत ‘गोवा माईल्‍स’सारखी अॅपधारित टॅक्‍सी सेवा सुरू झाली असली तरी स्‍थानिकांच्‍या दबावातून एअरपोर्टवर ते प्रभावीपणे सेवा देऊ शकलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला तांत्रिक कारण देऊन विमानतळावरील त्‍यांचा काऊंटरही बंद करण्‍यात आला. सरकारही या सेवेला अभय आणि पाठिंबा देऊ शकलेले नाही. परिणामी ही सेवा संख्याबळ वाढवू शकली नाही; शिवाय अजूनही तिला व्‍यावसायिक स्‍वरूप प्राप्‍त झालेले नाही. तरीही दिल्‍लीतील एका मान्‍यताप्राप्‍त संस्‍थेचा पर्यटनविषयक पुरस्‍कार यावर्षी ‘गोवा माईल्‍स’ला प्राप्‍त झाला. राज्‍याला अशा अॅपधारित टॅक्‍सीसेवेची खरोखरच निकड आहे, यावर त्‍यातून शिक्‍कामोर्तबच झाले.

उच्‍च न्‍यायालयाने ॲपधारित सेवा सुरू करण्‍याबाबत राज्‍य सरकारला आदेश देऊन आता कैक महिने उलटले आहेत. वाहतूकमंत्र्यांना ॲपसेवा सुरू करण्‍याची घाई झालीय ती न्‍यायालयाने कान पिरगळल्‍यानंतरच. सरकारला आपले व्यवसाय कठोर निकष व नियमांवर उभे करता आले नाहीत हे खरे दुर्दैवच. एका बाजूला ट्रक व्‍यावसायिक सरकारला वेठीस धरतात, तर दुसऱ्या बाजूला शॅक मालक व टॅक्‍सीवाल्‍यांनी सरकारच्‍या नाकात दम आणला आहे.

सरकारला आपल्‍या अर्थकारणाला दिशा देताना राज्‍यातील असे सेवाधिष्ठित व्‍यवसाय अत्‍यंत कडकपणे नियंत्रणात आणावे लागतील; नपेक्षा खाण व्‍यवसायाचे जे झाले, तशीच कठीण परिस्‍थिती सोन्‍याची अंडी देणाऱ्या पर्यटन क्षेत्रावरही येऊ शकते. व्‍हिसा व्‍यवस्‍थेत सुसूत्रीकरण नसल्‍याने अनेक ठिकाणचे पर्यटक येणे थांबले आहेत. शेकडो कोटींचा भुर्दंड त्‍यामुळे राज्‍याला सहन करावा लागला. त्‍यातून उद्या टॅक्सींसारखे हे व्‍यावसायिक देशोधडीला लागले तर राज्‍यातील बेरोजगारीचे संकट अधिक गडद होईल.

Goa App Taxi Issue
Goa High Court: न्यायालयाकडून कोलवातील बेकायदेशीर बांधकामांचे मॅपिंगनुसार 'सर्व्हे'

टॅक्‍सीवाल्‍यांचा प्रश्‍‍न राज्‍य सरकारला अत्‍यंत निष्‍ठूरपणे हाताळावा लागणारच आहे. परंतु तो दाबोळी बंद होईल ही भीती दाखवून नव्हे. देशभर ॲपधारित टॅक्‍सीसेवा सुरू आहेत आणि तिने जरूर गुणात्‍मक फरक निर्माण केला आहे. पर्यटकांना आपण राज्‍यात बोलावतो तेव्‍हा त्‍यांच्‍यासाठी पायघड्या अंथराव्‍याच लागतील. एकदा राज्‍यात येणारा पर्यटक सतत येथे येत राहावा, अशी अपेक्षा असेल तर त्‍यांच्‍यासाठी नव्‍या आणि किफायतशीर पायाभूत सेवा उभारणे भाग आहे. किमान त्‍यांची लुबाडणूक होणार नाही, याची दक्षता घ्‍यावीच लागेल.

ॲपधारित सेवेने देशातीलच नव्‍हे तर जगातील बहुसंख्‍य पर्यटन केंद्रांवर आराम तसेच किफायतशीर सेवा दिली. त्‍यामुळे पर्यटन व्‍यवसाय वाढला आणि लोकांना सुरक्षिततेचीही हमी मिळाली. राज्‍यातील विद्यमान टॅक्‍सींनी अशी सेवा दिली असती तर त्‍यांना पर्याय निर्माण करण्‍याची मागणी झालीच नसती. मोपा विमानतळ सुरू होईल त्‍यावेळी सरकारला पेडणे येथेही हीच खबरदारी घ्‍यावी लागेल.

‘दाबोळी’तील टॅक्‍सीवाल्‍यांची थेरं आणि अरेरावी सरकार सहन करते हे जाणल्‍याने उद्या पेडणेमध्‍येही स्‍थानिक टॅक्‍सीवाले हाच उद्धटपणा सुरू करणार नाहीत कशावरून? राज्‍य सरकारने स्‍वत:ची धोरणे राबविण्‍याची आपल्‍यात धमक आहे हे सिद्ध केले तरच निकोप वाहतूक सेवा देणे राज्‍याला शक्‍य होईल. केवळ पर्यटकच का? टॅक्‍सीसेवा सुरक्षित आणि किफायतशीर बनली तर स्‍थानिक गोवेकरही राज्‍यात याच सेवेचा उपयोग करू लागतील. शहरांमध्‍ये पार्किंग समस्‍या तीव्र झाल्‍याने खाजगी मोटरगाड्या बाहेर काढणे त्रासदायकच बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com