

पणजी: यंदा राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकारकडून मदत देण्यात येईल. मात्र, ती अल्प प्रमाणात असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून अनुदानात वाढ करू, असे नवनिर्वाचित कृषिमंत्री संकल्प आमोणकर यांनी सांगितले.
मंत्रालयात आपल्या कार्यालयाचा ताबा स्वीकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमोणकर यांचे कुटुंबीय, मुरगावचे नागरिक तसेच राज्यभरातील चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमोणकर म्हणाले, की मला जी खाती दिली आहेत, ती यापूर्वी माजी मंत्री रवी नाईक यांच्याकडे होती. कृषी, नागरी पुरवठा आणि हस्तकला ही सर्वसामान्यांशी जोडलेली महत्त्वपूर्ण खाती असल्याने त्यांच्या विश्वासात पात्र ठरत चांगली कामगिरी करून दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्या आमदारकीतच मंत्रिपद
मला मंत्रिपद उशिरा मिळाले किंबहुना मला काम करण्यास कमी कालावधी मिळाला, असे म्हटले जाते; परंतु पहिल्याच आमदारकीच्या कार्यकाळात माझी मंत्रिपदी निवड केली गेली आहे. यापूर्वी अनेकजण दोन-तीन वेळा आमदारपदी निवडून आले आहेत; परंतु त्यांना अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही. आज मला जे मंत्रिपद मिळाले आहे ते देवाच्या आणि मुरगाव मतदारसंघातील लोकांच्या आशीर्वादानेच, असे मंत्री संकल्प आमोणकर म्हणाले.
तिन्ही खात्यांतील अधिकारी सक्षम
माझ्याकडे कृषी, नागरी पुरवठा आणि हस्तकला ही तीन खाती दिली आहेत. या तिन्ही खात्यांत सक्षम अधिकारी आहेत. आपल्या कामाशी ते समर्पित आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.
कृषिमंत्र्यांच्या घोषणा...
सांगे येथे कुणबी ग्राम उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून दोन महिन्यांत पूर्ण करणार. संजीवनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही केली असून उर्वरित बाबी पूर्ण करणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.