

मडगाव: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सावर्डे मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने आपला उमेदवार बदलून दुसऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘युनायटेड फोर्स सावर्डे’च्या बॅनरखाली सहा इच्छुक एकत्र आले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या सहा प्रमुख स्थानिक नेत्यांनी एकत्र येत मोठी मोट बांधली आहे. माजी राज्यसभा खासदार आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, भाजप सावर्डे मंडळाचे माजी अध्यक्ष विलास देसाई, रमाकांत गावकर, बालाजी गावस आणि डॉ. मिलिंद देसाई यांनी ‘युनायटेड फोर्स सावर्डे’ या बॅनरखाली एकत्र येण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल घेतला.
या सर्व नेत्यांची बुधवार, ११ रोजी रात्री बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील सद्यस्थिती व आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. तिकीट वाटपावरून पक्षात किंवा कार्यकर्त्यांमध्ये फूट पडू नये, यासाठी या सहाजणांपैकी कोणत्याही एका नेत्याला पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी या गटाने केली आहे. कोणा एकाला तिकीट मिळाले तरी इतर पाचजण पूर्ण ताकदीने त्याचा प्रचार करतील, असा विश्वास या एकजुटीतून व्यक्त केला गेला.
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
गेल्या काही महिन्यांपासून या नेत्यांनी ‘युनायटेड फोर्स’च्या माध्यमातून मतदारसंघात सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांतून आपली ताकद दाखवण्यास सुरवात केली होती. आता थेट निवडणुकीच्या तिकिटासाठी हे सहा दिग्गज एकत्र आल्यामुळे सावर्डेतील भाजपच्या गोटात आणि विद्यमान आमदारांच्या गटात खळबळ उडाली असून, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सावर्डेचे विद्यमान आमदार आणि सभापती गणेश गावकर यांना भाजपने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी या सर्वांची मागणी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.