Goa News: विजय सरदेसाईंचा इशारा 'खरी कुजबुज'

काल सरदेसाई यांनी आपल्या मतदारसंघात 25 कोटींचा प्रकल्प उभा होत आहे असे सांगतील.
Vijai Sardesai |Goa News
Vijai Sardesai |Goa News Dainik Gomantak

दिगंबर कामत भाजप पक्षात सामील झाल्यानंतर त्यांचे सर्वात मोठे टीकाकार हे त्यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी म्हणून मानले जात होते ते विजय सरदेसाई. काल सरदेसाई यांनी आपल्या मतदारसंघात 25 कोटींचा प्रकल्प उभा होत आहे असे सांगत.

धमक असेल तर विरोधी पक्षात राहूनही कामे करता येतात. विकासासाठी आपण भाजपात गेलो असे जे सांगतात ते फक्त निमित्त असे म्हणत दिगंबर स्वतःच्या स्वार्थासाठी भाजप पक्षात गेले असे ते म्हणाले.

पुढच्या वेळी मडगाव मतदारसंघात कोण पास होतो आणि कोण नापास हे दिसून येईलच असे जाता जाता त्यांनी आव्हानही देऊन टाकले. बघूया कोण पास होणार आणि कोण नापास!

क्लिनचीट मिनिस्टर

सध्या नागरी पुरवठा खात्याचा जो धान्य विक्री घोटाळा उघडकीस आला आहे, त्यासाठी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना पक्षाचे नाव खराब होऊ नये यासाठी येथेही ते शहाजहान यांना वाचवू पाहतात असा टोमणा मारला.

सध्या ते अशारीतीने सर्वांना क्लिन चीट देतात की त्यांना चीफ मिनिस्टर म्हणण्याऐवजी ‘क्लिन चीट’ मंत्री म्हटले तर गैर वाटणार नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

सासष्टीतील विरोधाभास

गोव्यात 2015 मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली लागू झाली व त्याबाबत ग्रामपंचायती तसेच नगरपालिका यांच्यासाठी अनेक उपाय लागू झाले, पण अजूनही कोणीच ते गांभिर्याने घेत नाही.

त्यामुळे न्यायालयांना त्याची दखल घ्यावी लागली आहे. आता तर कचरा व्यवस्थापन महामंडळाने केलेल्या पाहणीत सासष्टी तालुक्यातील अनेक पंचायतीत रस्त्यालगत कचऱ्याचे ‘ब्लॅक स्पॉट’ तयार झालेले आढळून आल्यानंतर त्याने पंचायतींना सतर्क केले आहे.

अनेक सामाजिक प्रश्नांबाबत सतर्क असलेला सासष्टीकर कचरा मिळेल तेथे का फेकतो हा प्रश्न अनेकांना पडला आहे. लोकांनी शिस्त पाळण्याची गरज नाही का?

आता मुख्यमंत्र्यांची परीक्षा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कर्मचारी निवड आयोगातर्फेच (स्टाफ सिलेक्शन कमिशन) सरकारी कर्मचारी निवड होणार असल्याचे सांगितले आहे.

जानेवारी महिन्यात पहिली भरतीही आयोगामार्फत होईल, असे त्यांनी आत्मविश्‍वासाने सांगितले आहे. आता कर्मचारी निवड ही स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे होणार असल्याचे त्यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होत आहे, परंतु हे आयोग स्वायत्त असणार का असा प्रश्‍न आहे.

त्याशिवाय आयोगामार्फत खरोखरच सर्व नोकरभरती होणार असेल, तर अनेक मंत्र्यांच्या कोट्याचे काय? असा सवाल मंत्र्यांच्या निकटवर्तीयांना पडलेला आहे. कारण मंत्र्यांच्या निकटवर्तीयांची अशा नोकरभरतीतून हात ओले करण्याची संधी हिरावली जाऊ शकते.

यापूर्वी अनेक मंत्र्यांचे नोकऱ्यांबाबतचे व्हिडिओ अशाच प्रकारातून बाहेर आलेत, हे कारण यासाठी पुरेसे आहे.

जनतेच्या मनातून सरकार उतरले

घोटाळे पाठीशी घालण्यात येत असल्याने सामान्य जनता सरकारच्या मनातून उतरू लागले आहे. धान्य घोटाळा झाला नसेल, तर मग इतक्या मोठ्या प्रमाणात तांदूळ आला कुठून याची चौकशी व्हायलाच पाहिजे.

गोदाम स्वच्छ आहे, तर मग तांदूळ कुठून आला याची चौकशी करा आणि जनतेला नको असलेला तांदूळ ठेकेदारांना विकला जात असेल, तर मग अपचन होईल इतका तांदूळ का म्हणून दिला जात आहे. गेल्या दोन वर्षांत कोविडच्या नावाने दिला जाणारा तांदूळ सर्रासपणे विकला जात असल्याचे सरकार कबुली देत असेल, तर मग ते थांबवा.

कारण अशातून भ्रष्टाचार बोकाळू लागला आहे. एक प्रकरण थांबविण्यासाठी दुसरे प्रकरण काढले जात आहे. सरकारच्या या सारवासारव प्रकरणातून ते सामान्य जनतेच्या मनातून उतरू लागले आहे. लोक उघडपणे सरकारला दोष देऊ लागले आहेत.

भाजप नेत्यांच्या शुभेच्छा

उत्पल पर्रीकर यांचा शुक्रवारी वाढदिवस साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांचे फोन आणि संदेशही आले. त्यांच्या समर्थकांनी महालक्ष्मी मंदिरात त्यांना शुभेच्छाही देण्यासाठी गर्दी केली होती.

उत्पल यांनी तसे पाहिले तर काही कामांबाबत स्पष्टपणे आपली मते यापूर्वी मांडली आहेत. पक्षीय विचारधारणा त्यांनी आजही जोपासली आहे. त्यामुळे भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार व खासदारांनीही त्यांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. काही आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेशही पाठविले.

Vijai Sardesai |Goa News
Goa News: धान्यचोरी सरकारी गोदामांतूनच; पोलिसांच्या दाव्यामुळे खळबळ

काही मंडळींनी त्यांना घरी जाऊन पुष्पगुच्छही दिले. पणजीत उघडपणे त्यांच्यामागे न फिरणारे पण त्यांना मानणारा गट असल्याचे त्यांना पडलेल्या मतांवरून दिसून येते. अशाच पद्धतीचे त्यांचे पाठिराखे महालक्ष्मी मंदिर परिसरात वावरत होते. भाजपच्या नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

महागाई बरीच वाढली?

म्हापसा कोर्ट जंक्शन ते जिल्हा इस्पितळपर्यंत रस्त्यालगत स्थानिक पालिकेकडून लवकरच पदपथ उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी 3.92 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, दोन कि. मी. पेक्षा कमी रस्त्याकडेच्या पदपथासाठी इतकी मोठी किंमत ? असा सवाल काही नगरसेवकांनी यावेळी उपस्थित केला.

यावर नगराध्यक्षांनी सांगितले की, आता जीएसआर व जीएसटी वाढल्याने हा दर लागू केला आहे. मात्र, या उत्तराने या नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे या प्रकाराविषयी अ‍ॅड. शंशाक नार्वेकर म्हणे तक्रार करणार आहेत.

Vijai Sardesai |Goa News
Turtle Nest In Goa: कासवांच्या घरट्यांजवळ बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या परप्रांतीयाविरुद्ध राणेंचे कारवाईचे निर्देश

आता या अंदाजित किमतीला मान्यता मिळते की नाही हा दुसरा प्रश्न! मात्र, ही किंमत पाहून एक गोष्ट लक्षात येते की महागाई प्रचंड वाढली आहे व लोक हे काही उगाच बोलत नाहीत!

किमान चहा तरी द्या...

म्हापसा पालिका मंडळाची शुक्रवारी विशेष बैठक झाली. यात केवळ एकच अजेंडा होता, तो म्हणजे पदपथ उभारण्याविषयीचा. ही बैठक फक्त पाच ते दहा मिनिटांत संपली. यावेळी नगरसेवक प्रकाश भिवशेट व नगरसेवक अ‍ॅड. शंशाक नार्वेकर हे नगराध्यक्षांना पदपथाच्या कामाविषयी आपले प्रश्न विचारत होते.

मात्र, नगराध्यक्ष मॅडम त्यांच्या शंकांचे अपेक्षित निरसन करत नव्हत्या. त्यामुळे दोघेही बोलताना आपली नाराजी व्यक्त करत होते. बैठकीत तुम्हाला आमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे नसते, तर बैठका बोलावता तरी कशाला? असा सवाल त्यांनी विचारला. शिवाय बैठक संपताच भिवशेटबाब यांनी नगराध्यक्षांना आम्हाला चहासुद्धा दिली नाही अशी खंत त्यांच्यासमोर मांडली.

बैठकीत प्रश्न विचारू देत नाहीत, शिवाय लोकप्रतिनिधींना चहासुद्धा विचारत नाहीत, हे काही बरोबर नाही, असेही ते म्हणाले. बैठकीनंतर नगराध्यक्ष मॅडमनी आपल्या केबिनमध्ये सर्वांना नंतर चहा व सामोसा खाण्यासाठी मागवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com