पणजी: मोरजी येथील कासवांच्या घरट्यांजवळ बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या दिल्लीतील रहिवाशाविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश नगर आणि देश नियोजन (TCP) मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी वन आणि TCP अधिकाऱ्यांना दिले.
(Turtle Nest In Goa)
"अनेक तपासण्या आणि काम थांबवण्याचे आदेश असूनही, दिल्लीतील एकजण मोरजी मधील कासवांच्या घरट्याजवळ, इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये परवानगीशिवाय बेकायदेशीर बांधकाम करत आहे," असे नगर आणि देश नियोजन (TCP) मंत्री विश्वजित राणे म्हणाले. "पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांचे उल्लंघन करणारे लोक, विशेषत: टीसीपी कायदा आणि वन कायद्याचे उल्लंघन करणार्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल," असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.
ते पुढे म्हणाले, गोवा सरकार असे उल्लंघन सहन करणार नाही तसेच “वनविभागाने अधिसूचित केल्या जाणाऱ्या नो-टेक झोन आणि संवर्धन क्षेत्रांबाबत संशोधन शास्त्रज्ञ सुजीत कुमार डोंगरे यांनी तयार केलेल्या अहवालाचा वन विभाग अवलंब करेल आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल. कासवांच्या घरट्यांजवळील भागांवर अधिक भर दिला जाईल,” असे राणे म्हणाले. ऑलिव्ह रिडले कासवांचे नैसर्गिक प्रजनन निवासस्थान म्हणून सरकारने गोव्यातील काही समुद्रकिनारे अधिसूचित केले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.