

पणजी: राज्यात सलग चौथ्यांदा विधानसभा जिंकण्याच्या मोहिमेची मुहूर्तमेढ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी रोवली. शनिवारी (ता.३१) ते ताळगावच्या समाज सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात ते यासाठीचा कार्य आराखडा उलगडणार आहेत.
नवीन यांच्या दौऱ्यामुळे विधानसभा निवडणुकीला एक वर्ष असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांत जोश निर्माण झाला आहे. जिल्हा पंचायत निवडणूक जिंकल्यानंतर आगामी पणजी महापालिका निवडणूक व पालिका निवडणुका जिंकत विधानसभा निवडणूक जिंकण्याची तयारी भाजपने चालवली आहे.
मंडळ अध्यक्षांची दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बैठक घेऊन या साऱ्याचे नियोजन केले होते. दुपारच्या सत्रात नितीन नवीन यांनी गोव्यातील सर्व भाजप आमदारांची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या सामाजिक कल्याण, महिला सक्षमीकरण आणि गरीबांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला. तसेच जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात सर्वसमावेशक विकास होत आहे. भाजप सरकार सामाजिक कल्याण, सुशासन आणि प्रत्येक गोमंतकीयाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या या दौऱ्यामुळे गोव्यातील भाजप संघटनेला नवी दिशा व प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पक्ष आणि सरकार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील.”
पक्ष कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्षांनी गाभा समितीची महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री रमेश तवडकर, खासदार सदानंद शेट तानावडे, राष्ट्रीय सरचिटणीस विजय चुग, दिगंबर कामत, नीलेश काब्राल, माजी खासदार विनय तेंडुलकर, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, प्रदेश सरचिटणीस सर्वानंद भगत, खजिनदार संजीव देसाई, उपाध्यक्ष दत्ता खोलकर, गोविंद पर्वतकर आदी सहभागी झाले. त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पक्ष कार्यासाठी आज बराच वेळ दिला. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भाजपचे येथील मुख्य कार्यालय या ठिकाणी नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचे स्वागत करताना ते उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या बैठकांतही मुख्यमंत्री सहभागी झाले होते. नवीन यांचे राज्यात स्वागत करताना भाजपने कोणतीही कसर ठेवली नव्हती. नवीन यांचे विमानतळावरच जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, राज्यातील ज्येष्ठ नेते तसेच शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.यानंतर भाजप पणजी मुख्यालयात नवीन यांचे शेकडो युवक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले.
पणजी येथील एका तारांकीत हॉटेलात सायंकाळी नितीन नवीन यांनी भाजप राज्य पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस, प्रभारी तसेच सर्व मोर्चा व सेलचे अध्यक्ष यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी २०२७ च्या निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले तसेच मतदारवर्ग वाढवण्यासाठी, जनतेशी अधिक मजबूत नाते जोडण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपाय सुचवले.
गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह आणि समर्पण पक्षाची मजबूत संघटनात्मक ताकद दर्शवते. भाजप ही जनतेसाठी काम करणारी पार्टी असून कार्यकर्तेच पक्षाची खरी शक्ती आहेत, जे पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवतात.
नितीन नवीन, राष्ट्रीय अध्यक्ष.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.