Goa Extortion Case: खंडणी नव्हे, 'हायवे रॉबरी'; दिल्‍लीच्‍या व्‍यावसायिकांचा सुनियोजित पाठलाग, अनेक प्रश्न अनुत्तरीत

Goa Extortion Case: या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरा वेर्णा पोलिसांनी मुरगावच्‍या भरारी पथकाचा अधिकारी अनिरुद्ध पवार आणि निवडणूक कामकाज अधिकारी नितेश नाईक या दोघांना अटक केली होती.
Goa Extortion Case
Goa Extortion CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Extortion Case

दाबोळी येथे जे १६ लाखांचे खंडणी प्रकरण घडले, ते जरी वरवर अकस्‍मात केलेली लूट, असे जरी वाटत असले, तरी आतापर्यंत जो पोलिस तपास झाला, त्‍यातून जी माहिती पुढे आली आहे, ती पाहिल्‍यास हे प्रकरण म्‍हणजे सुनियोजित ‘हायवे रॉबरी’ असेच म्‍हणावे लागेल.

या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरा वेर्णा पोलिसांनी मुरगावच्‍या भरारी पथकाचा अधिकारी अनिरुद्ध पवार आणि निवडणूक कामकाज अधिकारी नितेश नाईक या दोघांना अटक केली होती. त्‍यांच्‍यावर खंडणी वसूल करणे आणि बनावट ओळख दाखविणे, असे आरोप ठेवले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या चौघांची आज जामिनावर सुटका करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, या चौकडीने ज्‍यांना लुटले, ते अशोक चौधरी आणि पवनकुमार वर्मा हे दिल्‍लीतील रिअल इस्‍टेट व्‍यावसायिक असून कासावली येथे एका जमिनीचा सौदा करण्‍यासाठी ते ३१ मार्च रोजी राेख रक्‍कम घेऊन गोव्‍यात आले होते. त्‍यांचा करंजाळे येथे एक फ्‍लॅट आहे.

पैशांची टीप कोणी दिली? : कोडे उलगडेना; चौघांना जामीन मंजूर

पैशांची माहिती फुटली कुठून?

- दिल्‍लीतील हे दोन व्‍यावसायिक पैसे घेऊन आले असून ते गाडीने करंजाळे येथे जाणार, अशी माहिती चंदन यादवने नितेश नाईकला दिली होती.

- या व्‍यावसायिकांकडे एवढी मोठी रक्‍कम आहे, ही माहिती चंदनला कुठून मिळाली, याचे कोडे वेर्णा पोलिसांना पडले आहे.

- ज्‍याअर्थी ही माहिती बाहेर फुटली, त्‍याअर्थी यात आणखी कुणाचा तरी हात असावा, असा संशय पोलिस व्‍यक्‍त करत आहेत.

- पोलिसांनी अटक केलेल्‍या चौकडीचा एकमेकांशी काय संबंध आहे, याचाही तपास पोलिस करीत आहेत.

Goa Extortion Case
Goa CM Pramod Sawant: कर्नाटकात लय जबरा फसले सीएम सावंत; अचानक हॉटेलची लिफ्ट बंद झाल्यानं उडाली भांबेरी

चंदनला माहिती कुठून मिळाली?

३१ मार्च रोजी रात्री हे दोन्ही व्यावसायिक दाबाेळी विमानतळावर उतरल्‍यावर टॅक्‍सी पकडून करंजाळे येथे जात असताना नितेश नाईक आणि इतरांनी त्‍यांचा पाठलाग करून वालीस जंक्‍शनवर अडविले. यावेळी नितेशने आपण आयकर खात्‍याचा अधिकारी असल्‍याची बतावणी केली.

नितेशने ज्‍या गाडीने त्‍या दोघांचा पाठलाग केला, ती गाडी आज पकडलेला संशयित केशव खाणवेकर चालवित होता, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे. हे दोन व्‍यावसायिक भली मोठी रक्‍कम घेऊन गाडीने जात असल्‍याची माहिती नितेशला त्‍याचाच मित्र चंदन यादव याने दिली होती. पण चंदनला ही माहिती कशी मिळाली, याचे कोडे उलगडलेले नाही.

तोंड बंद ठेवले म्‍हणून निलंबन

१) १६ लाखांची खंडणी चौकडीने वसूल केली, हे उघड झाले असले तरी या खंडणी वसुलीत निलंबित केलेल्‍या त्‍या दोन्‍ही पोलिसांचा सहभाग नाही, हेही उघड झाले आहे.

२) हा व्‍यवहार सुरू होता, त्‍यावेळी हे दोन्‍ही पोलिस गाडीतच बसले होते. ज्‍यावेळी पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी चौकशी केली, त्‍यावेळी या दोन्‍ही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही.

३) या खंडणी प्रकरणाची माहिती दडवून ठेवल्‍यामुळेच त्‍या दोन पोलिसांना निलंबित केल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे.

‘ते’ दोघे पोलिस गाडीतच होते

नितेशने भरारी पथकाचे मुरगावचे अधिकारी अनिरुद्ध पवार याला तिथे बोलावून घेतले. यावेळी त्‍याच्‍या गाडीत आज निलंबित केलेले पोलिस हवालदार विनायक कळंगुटकर आणि पोलिस शिपाई आनंद नाईक हे दोघे होते. हे दोघेहीजण वास्‍को रेल्‍वे पोलिस स्‍टेशनवर काम करत होते आणि त्‍या दिवशी त्‍यांची नियुक्‍ती भरारी पथकात करण्‍यात आली होती.

Goa Extortion Case
Goa Congress: उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसचे गोव्यात गुप्त सर्वेक्षण, शेजारच्या राज्यांतून दोन नेते दक्षिणेत

आठ लाख रुपये जप्त

आज या प्रक़रणात वेर्णा पोलिसांनी मुख्‍य संशयित नितेश नाईक़ याच्‍याकडून आठ लाखांची रक्‍कम जप्‍त केली.

या प्रकरणात त्‍यांना साथ देणारे केशव खाणवेकर आणि चंदन यादव या वास्‍कोतील अन्‍य दोघांना पोलिसांनी अटक केली असून एवढे मोठे कांड होऊनही त्‍याची माहिती वरिष्‍ठांना न दिल्‍याबद्दल हवालदार विनायक कळंगुटकर आणि पोलिस शिपाई आनंद नाईक या दोघांना निलंबित केले आहे.

या प्रकरणात आणखी एकाचा हात असण्‍याची शक्‍यता असून पोलिस त्‍या दृष्‍टीकाेनातून तपास करीत आहेत.

संभाषण ध्वनिमुद्रित केल्याने भांडाफोड

पवार याची गाडी दाबोळी पोलिस स्‍थानकाकडे पोचल्‍यावर त्‍याने दोन्‍ही पोलिसांना गाडीतच बसायला सांगून तो स्‍वत: नितेशकडे गेला. त्‍यानंतर त्याने व्यावसायिकांकडून रक्‍कम उकळली. मात्र, या दोन्ही व्‍यावसायिकांनी यावेळचे संभाषण ध्‍वनिमुद्रित केल्‍याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि पोलिस अलगद कचाट्यात सापडले.

व्यावसायिकांना काळोखात अडविले

ज्‍यावेळी नितेश आणि केशव आपल्‍या गाडीने त्‍या व्‍यावसायिकांचा पाठलाग करत होते, त्‍याचवेळी चंदन स्‍कूटरवरून त्‍यांच्‍या मागोमाग येत होता. या सर्वांनी वालीस जंक्‍शनवर असलेल्‍या काळोखाचा फायदा घेऊन त्‍या व्‍यावसायिकांच्‍या टॅक्‍सीपुढे आपली गाडी घालून त्‍यांना अडविले. त्‍यानंतर त्‍यांना दाबोळी पोलिस स्‍थानकाजवळ आणले.

Goa Extortion Case
Cancer Treatment: राष्ट्रपतींनी लॉन्च केली देशातील पहिली स्वदेशी CAR T-Cell थेरपी; कमी खर्चात उपलब्ध होणार कर्करोगावरील उपचार

पोलिसांच्या तांत्रिक चुकीमुळे जामीन

खंडणी प्रकरणातील चारही संशयितांना आज वास्को प्रथम वर्ग न्यायालयात न्या. शाहीर इसानी यांच्यासमोर उपस्थित केले असता, सर्व संशयितांना प्रत्येकी २० हजारांच्या जामिनावर मुक्त केले. ज्या गुन्ह्यातील शिक्षा तीन वर्षापेक्षा कमी असते.

अशावेळी संशयितांना थेट अटक न करता आधी त्यांना चौकशीसाठी बोलावून नंतर काही गुन्हा केल्याचे दिसून आल्यास त्यांना अटक करावी, असे कायद्यात नमूद केलेले असताना वेर्णा पोलिसांनी ही प्रक्रिया पूर्ण न करता त्यांना थेट अटकच केली. त्यामुळे पोलिसांची घाई संशयितांच्या पथ्यावर पडली आहे.

संशयितांचे वकील ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी हाच मुद्दा लावून धरला. तीन वर्षांपेक्षा कमी वर्षांची शिक्षा असलेला गुन्हा केल्यास कायद्याप्रमाणे फौजदारी आचार संहितेच्या कलम ४१ खाली संशयितांना पत्र पाठवून चौकशीला बोलावण्याची गरज असते. मात्र, तसे न करता पोलिसांनी सर्व संशयितांना थेट अटक केली, असा युक्तिवाद केला.

पोलिसांनी संशयितांवर जो खंडणीचा आरोप ठेवला होता, तोही नाकारताना कायद्याच्या व्याख्येनुसार खंडणी मागताना कुठल्या तरी प्रकारची धमकी देण्याची गरज असते; पण या प्रकरणात धमकी दिली, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटलेले नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

जामिनाला विरोध करताना साहाय्यक सरकारी वकिलांनी अजून संशयितांकडून आठ लाख रुपये वसूल करायचे बाकी आहेत आणि या प्रकरणात आणखी कोण सामील आहेत का, याची चौकशी करण्यासाठी संशयितांना कोठडीत घेऊन चौकशी करण्याची गरज व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com