

पणजी: जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल–डिझेलसारख्या पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ झालेली असून, त्याचा फटका गोमंतकीय जनतेसही बसण्यास सुरुवात झालेली आहे. अमुल, गोवा डेअरी या कंपन्यांच्या दुधाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता गोवा इतर राज्यांवर अवलंबून असलेल्या भाजी, फळे, फुले, कडधान्यांसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू लागले आहेत.
त्यामुळे पुढील काहीच दिवसांत सर्वसामान्य गोमंतकीयांचे जगणे कठीण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजधानीचे शहर असलेल्या पणजी मार्केटचा सोमवारी आढावा घेतला असता, कडधान्याचे दर अजूनही स्थिर असल्याचे, पण खाद्यतेलासह भाजीपाला, फळे, फुलांच्या दरांत मात्र वाढ झाल्याचे दिसून आले. कडधान्यांचे दर सोमवारी स्थिर होते. पण, मंगळवारपासूनच त्यांच्या दरांत वाढ होणार असल्याची माहिती पणजी बाजारातील काही दुकान मालकांनी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
दैनंदिन आयुष्यात महत्त्वपूर्ण असलेल्या तांदूळ आणि खाद्यतेलाच्या दरांत दहा ते वीस रुपयांनी वाढ झाल्याचे पणजी बाजारात दिसून आले. सर्वसामान्य दर्जाचा तांदूळ आठ दिवसांपूर्वी ५० रुपये किलो, तर जिरा तांदूळ ७० रुपये किलो दराने विकला जात होता. परंतु, सध्या सर्वसामान्य दर्जाचा तांदूळ ६० रुपये, तर जिरा तांदूळ७५ ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. सर्वसामान्य जनता वापरत असलेल्या पामोलीन तेलाचे दर १२० वरून १३० रुपये इतके झाले आहेत. सोबतच मध्यमवर्गीय आणि श्रीमंत जनतेच्या वापरात असलेल्या सनफ्लॉवरसारख्या तेलाच्या पिशवीचे दर १४० वरून १६० रुपयांवर पोहोचले आहेत. दुसरीकडे, प्रत्येक मसाल्याचा दर प्रती किलोमागे दहा रुपयांनी वाढल्याचे पणजी बाजारातील विक्रेते गुणाजी धुळापकर यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसांतील भाज्यांच्या दराबाबत चौकशी केली असता, आले, लसणासह पालेभाज्यांच्या दरांतही वाढ झाल्याचे दिसून आले. आले आठ दिवसांपूर्वी २०० रुपये किलो दराने विकले जात होते. परंतु, सोमवारी त्याचा दर २५० रुपयांपर्यंत गेला होता. आठ दिवसांपूर्वी ३०० रुपये किलो दराने विकली जाणारी लसूण सोमवारी पणजी बाजारात ४०० रुपये किलो दराने विकली जात होती. यासोबतच कांदे, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर, भेंडी, काकडी, फ्लॉवर, हिरवी मिरची, वांगी आदींसारख्या सर्वच भाज्यांच्या दरांत प्रतिकिलोमागे पाच ते दहा रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. गोव्याला भाज्यांच्या पुरवठा करणाऱ्या कर्नाटकात सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. सोबतच इंधनाचे दरही वाढलेले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत या दरांत आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती पणजी बाजारातील सय्यद शेख या भाजी विक्रेत्याने दिली.
राज्याला फुलांचा पुरवठा प्रामुख्याने शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रातून होत असल्याने फुलांचे दर गगनाला भिडले आहेत. आठ दिवसांपूर्वी सरासरी १५० रुपये किलो दराने विकली जाणारी फुले सोमवारपासून पणजी बाजारात ३२० रुपये किलोप्रमाणे विकली जात आहेत. इंधनाच्या दरात अशीच वाढ होत राहिल्यास हा दर ४०० रुपयांपेक्षा अधिक होऊ शकतो, असे फुल विक्रेते रफिक मकानदार यांनी सांगितले. फुलांप्रमाणेच फळांच्या दरांतही वाढ झालेली असून, सफरचंद, डाळिंब, संत्री यांसारख्या फळांच्या दरांत प्रतिकिलोमागे ५० रुपयांची वाढ झाल्याचेही दिसून आले.
गोमंतकीयांच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या नारळाच्या किमतीतही गेल्या आठ दिवसांत पाच ते दहा रुपयांनी वाढ झालेली आहे. राज्यात तयार होणारा नारळ गोमंतकीयांना पुरत नाही. त्यामुळे नारळाची केरळ तसेच इतर राज्यांतून आयात करावी लागते. वाढलेल्या इंधन दरांमुळे नारळाचे दरही वाढल्याचे नारळ विक्रेते मेहबूब अली यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी २५ रुपयांनी विकला जाणारा नारळ सध्या ३० रुपये, ३० रुपयांचा ३५ रुपयांना, ३५ रुपयांचा ४० रुपयांना, तर ४० रुपयांचा नारळ ५० रुपयांना विकावा लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या संदेश दिल्यानंतर खाद्यतेलाची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांनीही शक्कल लढवलेली आहे. पूर्वी ९१० ग्रॅम तेलाच्या पिशवीची किंमत १२० रुपये इतकी होती. परंतु, मोदींच्या संदेशानंतर या कंपन्यांनी पिशवीचा आकार पूर्वीसारखाच ठेवला आहे. परंतु, त्यातील तेल मात्र ७५० ग्रॅम इतके केले असून किंमत दहा रुपयांनी वाढवलेली असल्याचे गुणाजी धुळापकर यांनी सांगितले.
‘‘विविध देशांतून राज्यात उच्च प्रतीच्या मद्याची आयात होते. परंतु, अमेरिका–इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजे भारतासह इतर देशांमध्ये पोहोचणे कठीण झालेले आहे. पूर्वी ही जहाजे दुबईतील बंदरांमध्ये येऊन तेथून भारतातील विविध राज्यांना विदेशी मद्याचा पुरवठा करीत होती. परंतु, आता ही जहाजे दक्षिण आफ्रिकेच्या मार्गाने भारतात यावे लागत आहे. त्यामुळे पूर्वी ४५ दिवसांत गोव्यात येणारे विदेशी मद्य आता पाच महिन्यांनी गोव्यात दाखल होत आहे. या कारणांमुळे पुढील काहीच दिवसांत विदेशी मद्याची किंमत पूर्वीपेक्षा २० टक्क्यांनी वाढणार आहे’’, असे अखिल गोवा मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले. ‘‘इंधन दरवाढीमुळे भारतीय बनावटीच्या मद्याच्या किंमतीतही वाढ होईल’’, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.