Goa 54 IFFI: गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मंगळवारी सांगता झाली. या सोहळ्यासाठी सिनेजगतातील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक व सिनेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह कलाकारांच्या मांदियाळीत पुरस्कारांचे वितरण पार पडले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर रंगारंग कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
डग्लस थिरकले ‘नाचो नाचो’वर
ऑस्कर विजेते ज्येष्ठ अमेरिकन अभिनेते मायकल डग्लस यांनी ‘इफ्फी’मध्ये कला अकादमी येथे मुलाखत सत्रादरम्यान ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाचो नाचो’ या गाण्याच्या तालावर थिरकून प्रेक्षकांची दाद मिळविली.
मंगळवारी सकाळी भारतीय चित्रपट निर्माते शैलेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत कला अकादमी येथे झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, ज्येष्ठ अमेरिकन अभिनेते मायकल डग्लस यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील काही गोड आठवणी सांगून त्यांची मजेदार बाजू लोकांना दाखवली.
नंतर, त्यांच्या सत्कारादरम्यान, शैलेंद्रनी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाचो नाचो’ गाणे वाजवण्यास सांगितले, ज्यावर नृत्य गट आणि अभिनेता मायकल डग्लस यांनी थिरकवून दाखवत प्रेक्षकांना आनंदित केले. शेवटी त्यांच्या चित्रपट प्रवासात प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल प्रेक्षकांचे डग्लस यांनी आभार मानले.
गोवा निर्मात्यांचे नंदनवन : सावंत
गोवा हे चित्रपट निर्मात्यांसाठी नंदनवन आहे. सुलभ परवाने, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय निर्मात्यांना प्रोत्साहन देऊन गोव्याला चित्रपट उद्योगासाठी स्वर्ग बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. चित्रपट उद्योगासाठी गोव्याने नेहमीच रेड कार्पेट अंथरले आहे, असे सांगत त्रासमुक्त चित्रीकरणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
असे होते ज्युरी
या वर्षीच्या ज्युरींमध्ये भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर, ज्युरींचे अध्यक्ष तथा स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुईस अल्केन, फ्रेंच चित्रपट निर्माते जेरोम पेलार्ड, कॅथरीन दुसार्ट आणि ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्मात्या हेलन लीक यांसारख्या चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा समावेश होता.
...आणि डग्लस झाले भावुक
मायकल डग्लस यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री कॅटरिन जीना जोन्स आणि मुलगा डायलन हे दोघे उपस्थित होते.
मायकल यांना पुरस्कार दिल्यानंतर कॅटरिन यांनाही सन्मानित करण्यात आले. गौरवास उत्तर देताना डग्लस यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत असताना दिसत होते. ते म्हणाले, जागतिक सिनेमाची भाषा ही पूर्वीपेक्षा अधिक कक्षा रुंदावत गेली आहे.
इफ्फी हा चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील मंतरलेपणाची पुनर्अनुभूती करून देणारा महोत्सव आहे. सांस्कृतिक, कलात्मक अभिव्यक्ती ओलांडणारा हा इफ्फी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अनुराग ठाकूर यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी इफ्फीच्या समारोपासाठी संदेश पाठविला. ते म्हणाले, इफ्फीने समावेशकता आणि सर्वांनाच आनंद घेता येईल, अशा सोयीसुविधा उपलब्ध केल्या. चित्रपटांचे प्रदर्शन दिव्यांग सिनेरसिकांनाही मोठ्या पडद्यावर सहजपणे पाहता यावे, यासाठी सांकेतिक भाषा आणि श्राव्य वर्णनाची सोय केली होती.
मायकल डग्लस यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. डग्लस यांच्यासोबत उपस्थित कॅथरीन झेटा जोन्स यांचेही त्यांनी आभार मानले. सुवर्ण मयूर पुरस्कार विजेत्यांसह इफ्फीमधील सर्वोत्कृष्ट वेब सीरिजसाठीच्या (ओटीटी) पहिल्या पुरस्कार विजेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.