पणजी: राज्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला राष्ट्रीय महामार्गावरील झुआरी नदीवरील नवीन पुलाची अंतिम प्लेट (सेगमेंट) आज मंगळवारी जोडण्यात आली. सकाळी विधिवत पूजनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ‘कनेक्ट’चा आदेश दिल्यानंतर ही अंतिम प्लेट उचलून जोडण्यात आली. दक्षिण भारताला जोडणाऱ्या आणि राज्य सरकारसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या या आठ पदरी पुलावरून नोव्हेंबरपर्यंत चौपदरी वाहतूक सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्याच्या दृष्टीने दक्षिण गोव्यात जाणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाची प्रतिक्षा आहे.
(Four-way traffic will be started from Zuari bridge till November)
सेगमेंट जोडणी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, दिनेश गुप्ता, गोवा राज्य औद्योगिक महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, तसेच दिलीप बिल्डकॉनचे उपाध्यक्ष अतुल जोशी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘मांडवी पूल ही स्व. मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी होती. तर झुआरी पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे व्हिजन आणि राज्यावरचे प्रेम आहे. पूर्वी केवळ स्वप्ने दाखवली जात होती. विरोधक निवडणुका जवळ आल्या की पूल किंवा इतर प्रकल्पांच्या भूमिपुजनाचे कार्यक्रम करत होते.
प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी कधी झालीच नाही. पण आम्ही साधनसुविधा आणि कल्याणकारी योजना राबवत आहोत. हेच या सरकारचे उद्दिष्ट आहे. हा पूल येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल आणि उद्घाटन सोहळ्याला गडकरी हेच प्रमुख पाहुणे असतील. देशातील द्वितीय क्रमांकाच्या लांबीचा हा पूल कोरोनामुळे काहीसा लांबला असला, तरी योग्य वेळी पूर्ण होत होत आहे. मार्च 2025 पर्यंत पुलाचे सर्व काम होईल.’
प्रकल्पासाठी 1,436 कोटींचा खर्च
हा प्रकल्प एकूण 13vकिलोमीटर लांबीचा आहे. याचे काम तीन टप्प्यात होत आहे. यात बांबोळी ते आगशी (8किमी) आगशी ते कुठ्ठाळी (1.8 किमी), कुठ्ठाळी ते वेर्णा (4.3 किमी) या टप्प्यांचा समावेश आहे. यातील दुसऱ्या टप्प्यात हा 1 किमी लांबीचा हा पूल असून आठपदरी रस्त्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी 1,436 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यातील पहिल्या चौपदरीचा टप्पा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.