पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या मांद्रे दौऱ्यात मला स्थान नव्हते. त्यामुळे त्यादिवशी मी दारे-खिडक्या बंद करून घरीच राहायचे, की अन्य काही करायचे, काहीच सुचत नव्हते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा रात्री 11 वाजता दूरध्वनी येईपर्यंत मी अस्वस्थ होतो, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मांद्रेतील दौऱ्यादरम्यान पार्सेकर यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहून संवाद साधला. कार्यकर्त्यांचेही म्हणणे जाणून घेतले. या साऱ्याविषयी पार्सेकर यांना विचारले असता ते म्हणाले, समाजमाध्यमावरून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम माझ्यापर्यंत पोचला होता. त्यात मी कुठेच नव्हतो. गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षानिमित्त कार्यक्रम ठरवण्याच्या समितीचा सदस्य या नात्याने दौऱ्याच्या आदल्याच दिवशी मी बैठकीला उपस्थित होतो. बैठकीनंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांना विचारले, आपण दौऱ्यावर येणार हे समजले आहे. त्या दौऱ्यात मी कुठे व कसा सहभागी होऊ हे समजत नाही. त्यामुळे तुम्हीच काय ते सांगा, अशी विनंती त्यांना केली.
मांद्रेचा दौरा पहिल्या टप्प्यात कसा काय ठरवला, असेही ते मला म्हणाले. दोन तासांत दूरध्वनी करतो, असे ते मला म्हणाले. मी पर्वरीहून हरमलकडे निघालो आणि घरी पोचलो. रात्रीचे नऊ वाजले, दहा वाजले तरी दूरध्वनी नाही. मी थोडा अस्वस्थ झालो. दौऱ्यावेळी कुठे दारे-खिडक्या बंद करून बसू की काय, अशी भावना मनात दाटू लागली. तेवढ्यात रात्री 11 वाजता मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी आला आणि माझे मन हलके झाले.
मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
ध्यानीमनी नसताना हे सारे घडले. विचारांवर प्रामाणिक श्रद्धा असली तर नियतीही सकारात्मक वातावरण तयार करते, याचा प्रत्यय मला आला. मुख्यमंत्री केवळ आलेच नाहीत, तर एक दोन करता 10 कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. तेथे आलेल्यांना कोणी गाडी पाठवली नव्हती, की त्यांना सरकारी नोकरी हवी होती. मुख्यमंत्र्यांच्या मांद्रे मतदारसंघाच्या दौऱ्यात त्याच त्या व्यक्ती सगळीकडे होत्या. त्यामुळे आमच्याकडील मेळाव्यात त्यांना खऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला. मुख्यमंत्री आले आणि बोलले याचे मला बरे वाटण्यापेक्षा पक्षाचा झेंडा निष्ठेने खांद्यावर घेऊन चालणाऱ्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
बोलावले 250, आले 550
मुख्यमंत्र्यांनी दुपारी भोजन झाल्यानंतर भेटायला येतो, असे सांगितले. मी त्यांना म्हटले, मला तर तुम्ही कालही भेटलात. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भेटा, अशी विनंती त्यांना केली आणि त्यांनीही ती मान्य केली. रात्री 11 वाजता कोणाला निरोप देणे शक्य नव्हते. त्यामुळे सकाळी निरोप देणे सुरू केले. सकाळी 11 वाजता 200 ते 250 कार्यकर्ते जमतील असे वाटले. त्यामुळे अडीचशे बटाटावडे आणि चहाची ऑर्डर दिली. ती ऑर्डर स्वीकारणाऱ्याने आपण 300 आणतो, असे सांगितले आणि प्रत्यक्षात साडेपाचशे कार्यकर्ते जमले. सभागृहात जागा नसल्याने दीडशे जणांना बाहेरच थांबावे लागले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.