Flame Throated Bulbul: गोमंतकाचे मानदंड! गोवा राज्याचा पक्षी 'अग्निकंठी बुलबुल'

Flame Throated Bulbul: अग्निकंठी बुलबुल हा पक्षी इंग्रजीत पूर्वी रुबी थ्रोटेड म्हणजे माणिक कंठी म्हणून ओळखला जात होता
Flame Throated Bulbul
Flame Throated Bulbul
Published on
Updated on

Flame Throated Bulbul

गोवा राज्याचा पक्षी हा सन्मान अग्नीकंठी बुलबुलला प्राप्त झालेला असून, इथल्या सदाहरित जंगलांची शान ठरलेला हा पक्षी पहाण्यासाठी पक्षी निरिक्षक धडपडत असतात.

गोव्यातल्या सहा अभयारण्यांत आणि एका राष्ट्रीय उदयानातल्या जंगलात हा पक्षी पहाण्यास मिळत असला तरी त्याचे दर्शन पक्षीनिरिक्षकांना संरक्षित जंगलाच्या परिघात तसेच अन्य परिसरात झालेले आहे. फोंडा तालुक्यातल्या केरी, बेतकी, वरगाव, त्याचप्रमाणे पेडणेतल्या धारगळच्या जंगलातही अग्नीकंठी बुलबुलाची नोंद पक्षी निरिक्षकांनी केलेली आहे.

परंतु असे असले तरी हा पक्षी प्रदेशनिष्ठ असून त्याचे वास्तव्य गोव्यातल्या जंगलाबरोबर महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक तामिळनाडूतल्या पश्‍चिम घाटातल्या जंगलात पूर्वापार असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

गोव्यात ४७३ पक्ष्यांच्या विविध प्रजातींची नोंद प्रणोय वैद्य आणि मंदार भगत या पक्षी संशोधकांनी शोधनिबंधात केलेली आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यात पक्ष्यांच्या प्रजातींची जी विविधता आढळते ती देशविदेशातल्या पक्षी निरीक्षकांना थक्क करत असते.

भारतात बुलबुल पक्ष्याच्या २२ प्रजाती आढळत असून गोव्यात आठ प्रजातीतल्या बुलबुल पक्ष्यांची नोंद करण्यात आलेली आहे. शिपाई बुलबुल, शुभ्रकर्ण बुलबुल, रक्तपार्श्‍व बुलबुल, खर बुलबुल, हळदी भुवईचा बुलबुल, कृष्ण बुलबुल अशी बुलबुलांना त्यांच्या एकंदर रंगरूपावरुन नावे प्राप्त झालेली आहेत.

गोव्यात पक्ष्याचा सन्मान लाभलेल्या बुलबुलाचा गळा आगीच्या रंगासारखा असल्याने त्याचा उल्लेख अग्निकंठी बुलबुल असा करण्यात आलेला आहे.

गोव्यातल्या जंगलात विविधरंगी पक्षी आढळत असून पक्षिसंशोधनाचा ध्यास आणि अभ्यास आरंभलेल्या डॉ. सलीम अली यांनी भारतभरातल्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींची नोंद आपल्या ग्रंथात केली होती त्याला त्यापूर्वी ब्रिटीश कालखंडातील पक्षी निरिक्षक, तज्ञ आदींनी ज्या नोंदी केल्या होत्या ती पार्श्‍वभूमी कारणीभूत होती.

Flame Throated Bulbul
Goa Cashew Farmers: काजू उत्पादनात घट! राज्यातील शेतकरी चिंतातुर, हमीभाव वाढवण्याची मागणी

गोवा,दमण आणि दीव हे प्रदेश पोर्तुगीज सत्तेखाली असल्याकारणाने त्यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यासारख्या गोव्यातल्या पक्ष्यांचा अभ्यास आरंभला नव्हता आणि त्या संदर्भात नोंदी ठेवल्या नसल्याकारणाने इथले पक्षी वैभव बऱ्याच प्रमाणात अज्ञात राहिले होते.

गोवा मुक्तीनंतर गोवा, दमण आणि दीवचा समावेश केंद्रशासित प्रदेशात करण्यात आला आणि १९७२च्या सुमारास इथे मुख्य वनपाल म्हणून एस.एस.भाटटी यांची नियुक्ती करण्यात आली तेव्हा त्यांनी पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना गोव्यात निमंत्रित केले.

डॉ. सलीम अली आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षीनिरीक्षकांनी गोव्यात १५४ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद केली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सत्तरीच्या जंगलात भ्रमंती करताना डॉ. सलीम अली यांना अग्निकंठी बुलबुलाचे दर्शन झाले होते आणि त्यांनी त्यावेळी ‘रुबी थ्रोटेड’ या नावाने परिचित असलेल्या या बुलबुलला राज्य पक्ष्याचा सन्मान देण्याची शिफारस तत्कालीन सरकारला केली. त्यामुळे अग्निकंठी बुलबुल गोव्याचा राज्यपक्षी म्हणून अधिसूचित करण्यात आला.

Flame Throated Bulbul
Goa Tourism: गोव्याच्या ‘पर्यटन’ला डिजिटल प्रचाराचे पाठबळ; ‘अगोडा’शी सामंजस्य करार

डॉ. सलीम अली यांनी गोव्यातल्या जंगलात शेकडो प्रजातीच्या पक्ष्यांची जरी नोंद केली होती तरी त्यांना ज्वाला रंगाचा कंठ असलेल्या आणि उर्वरित पिवळा धमक रंगाचा हा पक्षी विशेष भावला. त्याचे देखणे रूप आणि सदाहरित जंगलात असलेला नैसर्गिक अधिवास बहुधा कारणीभूत असू शकेल.

प्राणी शास्त्राच्या परिभाषेत रुबिगुला गुलारिसे म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी सर्वसाधारणपणे चिमणीपेक्षा मोठा व साळुंकीपेक्षा लहान असून त्याचा प्रजननाचा कालखंड फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. वाळलेले गवत-मुळ्या एकत्रित करुन वाडग्यासारखे घरटे दाट झुडपात सहसा लक्षात येणार नाही अशा स्थितीत बांधले जाते.

मादी एकावेळी फिकट गुलाबी रंगाची २-३ अंडी घरट्यात घालते आणि चौदा दिवसांनंतर उबवलेल्या अंड्यातून पिल्ले जन्माला येतात. घरटे बांधणे, अंडी उबवणे, पिकांना भरविणे आणि त्यांना उडायला शिकवणे ही कामे नर आणि मादी दोघे मिळून करतात. अंडी किंवा पिल्ले जेव्हा घरट्यात असतात तेव्हा नर आणि मादी दोघे जण शत्रूंना घरट्याजवळ फिरकू देत नसतात.

Flame Throated Bulbul
Fishing In Goa: गोव्यात कर्नाटक, महाराष्ट्रातील बोटींचा शिरकाव; पारंपरिक मच्छीमारांना मासळीचा तुटवडा

अग्निकंठी बुलबुल हा पक्षी इंग्रजीत पूर्वी रुबी थ्रोटेड म्हणजे माणिक कंठी म्हणून ओळखला जात होता. परंतु आज त्याचा पक्षी विश्‍वात त्याची ओळख मात्र अग्निकंठी बुलबुल अशी झालेली आहे. गोव्यात बुलबुल पक्ष्याच्या ज्या आठ प्रजातींची नोंद झालेली आहे त्यांना स्थानिक भाषेत बोचूडी हेच नाव रूढ आहे.

खरंतर बुलबुल पक्ष्यांच्या ज्या आठ प्रजातींची नोंद गोव्यात झालेली आहे त्यांचे रंग, रूप भिन्न असताना लोक मानसाने त्यांना बोचूडडी हेच एकमेव नाव प्रदान केलेले आहे.

बुलबुल पक्ष्यांच्या ज्या आठ प्रजाती गोव्यात आढळतात, त्यापैकी अग्निकंठी बुलबुल सहसा जेथे लोकवस्तीचे प्राबल्य आढळते त्याच्यापासून दूर राहण्यात पसंत करतो. सदाहरित जंगलाबरोबर जेथे बांबू वने आहेत आणि बारामाही पाणी खळाळत असते तिथे या पक्ष्याचे वास्तव्य पहायला मिळत असते.

Flame Throated Bulbul
Goa Weather Update: गोव्यात सोमवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता; तापमानाचा पारा 33.5 अंशांवर

दिण्याच्या हिरव्यागार झुडपावरती छोटेखानी जी फळे येतात आणि काही काळाने पिकतात, ती खाण्यासाठी बऱ्याच पक्ष्यांची वर्दळ असते. त्यात हमखास अग्निकंठी बुलबुल दिण्याच्या फळांचा आस्वाद घेण्यास न चुकता या झुडपावर येतात.

वड, पिंपळ, औदुंबर वृक्षावरती जेव्हा फळे पिकतात तेव्हा या फळांवरती ताव मारण्यास वेगवेगळ्या पक्ष्यांचे थेव आढळतात, त्यात अग्निकंठी बुलबुलाचा समावेश असते. फळांबरोबर काही फुलांत मधुरस असतो तो प्राशन करण्यात हे पक्षी तरबेज असतात बऱ्याचदा शाकाहारावर गुजराण करणारा हा पक्षी काही वेळा जेव्हा त्याला कृमी कीटक आढळतात तेव्हा त्यांचेही आवडीने भक्षण करत असतो.

गोव्यात जी पश्‍चिम घाटातील जंगल संपदा आहे. तेथे अग्निकंठ बुलबुलाचे दर्शन हमखास घडत असते. आज गोव्यातल्या जंगलांची अपरिमित अशी तोड केली जात असल्याने, त्याचे गंभीर दुष्परिणाम प्रदेशनिष्ठ अशा पशुपक्ष्यांच्या प्रजातीना भोगावे लागत आहे.

त्यामुळे अथल्या सदाहरित जंगलाची शान असणारा हा पक्षी पहाण्यासाठी पक्षीनिरिक्षकांना बरीच पायपीट करावी लागते. गोव्याला जशी पश्‍चिम किनारपट्टी लाभलेली आहे.

Flame Throated Bulbul
Goa Theft Case: भाटले-पणजीत 12 लाखांची चोरी; गाझियाबाद, दिल्लीतील दोघांना अटक, सात दिवसांची कोठडी

त्याचप्रमाणे पश्‍चिम घाटाचे जंगल लाभलेले आहे हे ध्यानात ठेवून भारत सरकारच्या क्रीडा खात्याने ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे मानचिन्ह म्हणून २०२० साली अग्नीकंठ बुलबुलाला सन्मान बहाल केला होता.

वन्यजीव सप्ताहा निमित्त वनखात्याने अग्नीकंठ बुलबुलाचे चिन्ह असलेली कॅप, टीशर्ट प्रसारित केलेली आहे. परंतु असे असले तरी जोपर्यंत सदाहरित जंगले सुरक्षित राहतील तोपर्यंत आम्हाला अग्निकंठी बुलबुलासारख्या पक्ष्याचे दर्शन घेता येईल. अन्यथा त्यांचे दर्शन दुरापास्त ठरेल.

सजीवाच्या विविध प्रजाती एका गुंतागुंतीच्या व्यवस्थेत बांधलेले आहे. आपले अस्तित्व एकमेकांवर कसे अवलंबून आहे हे उमजले की हे अनुबंध जपले पाहिजे हे लक्षात येते आणि तेव्हाच अग्निकंठी बुलबुलाचे पर्यावरणीय परिसंस्थेतले स्थान टिकवण्यास आम्ही कटिबध्द होतो.

- राजेंद्र पां.केरकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com