Goa Gangwar Case: रुमडामळ हाऊसिंग बोर्डमधील सादिक उर्फ लॉली बेल्लारी याचा खून हा ‘गॅंगवॉर’चाच परिपाक असल्याचे आता सिद्ध झाले आहे.
सादिकला संपवून तीन वर्षांपूर्वीच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी महिनाभर तयारी चालू होती, हे आता उघड झाले आहे. या हत्येनंतर रुमडामळ भागात पुन्हा टोळीयुद्ध तर भडकणार नाही ना, ही चिंता पोलिसांना सतावत आहे.
या गुन्ह्यात पाच जणांचा हात असून तिसरा संशयित राहिल पानवाला (रा. हाऊसिंग बोर्ड) याला मायणा कुडतरी पोलिसांनी काल रात्री अटक केली.
त्याच्यावर या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. आज त्याला न्यायालयात रिमांडसाठी हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
राहिलचा भाऊ जावेद पानवाला याचाही या हत्येत हात असल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. या कटात आणखी एका संशयिताचा हात असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत.
रुमडामळ हाऊसिंग बोर्ड येथील सादिक खूनप्रकरणी यापूर्वी कर्नाटकातून संशयित कादर खान खानजादे व तौसिफ कदेमणी यांना अटक केली होती.
संशयितांना ९ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सादिकचा खून हा पूर्ववैमनस्यातून झाला होता. खुनासाठी पूर्वनियोजन झाल्याचे तपासात पुढे आले होते.
सादिक खूनप्रकरणी अटकेतील दोन्ही संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुझाहिदच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हा प्रकार झाल्याचे उघड झाले.
याप्रकरणी रविवारी मायणा कुडतरी पोलिसांनी केलेल्या चौकशीत कट रचण्यात राहिल पानवाला या हाऊसिंग बोर्ड परिसरातील युवकाचा समावेश असल्याचे पुढे आले. तो खुनाच्या कटात सामील असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.
भांडणातून झाला मुझाहिदचा खून
सादिक बेल्लारी खून प्रकरणाचा २८ मे २०२० रोजी भगवती कॉलनी, दवर्ली येथे झालेल्या मुझाहिद खान खुनाशी संबंध असून त्यावेळीं विरोधी टोळीतील सादिक आणि इस्माईल मुल्ला यांनी जावेद पानवाला आणि त्याचा मित्र मृत मुझाहिद खान यांच्याशी भांडण सुरू केले.
सादिकने आधी जावेदला चपलेने मारहाण केली आणि नंतर त्याने लोखंडी रॉड आणला जो त्याने आपल्या स्कूटरवर आणला होता. त्यावेळी त्याने जावेदवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र जावेदने रॉड हिसकावून घेऊन सादिकलाच मारहाण केली.
इतक्यात सादिकचा मित्र इस्माईल मुल्ला (२३) याने नंतर चाकू आणला. तो जावेदवर हल्ला करणार होता, पण मध्ये मुझाहिद खान मध्ये आल्याने सुरा त्याच्या पोटात खुपसला गेला, नंतर उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला होता.
भावालाही मारेन! ; धमकीमुळे सादिकचा गेम
मुझाहिद खानच्या हत्येप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी नंतर अटक केलेल्या सादिक बेल्लारीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सादिकची २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली होती.
तुरुंगातून परतल्यावर सादिकने मुझाहिदचा भाऊ कादर खान याला तुझ्या एका भावाला मी मारले, आता दुसऱ्यालाही मारू, अशी धमकी दिली होती. त्या दिवसापासूनच कादर आणि त्याचे मित्र सादिकचा काटा काढण्याच्या तयारीला लागले होते. सादिकला जामीन मिळताच १ सप्टेंबरला त्यांनी त्याचा गेम केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.