

पणजी: गोव्यातील हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेतील मृतांमध्ये पर्यटक आणि क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या भयावह घटनेत नवरा आणि तीन बहिणींना गमावलेली महिला अद्याप या धक्क्यातून सावरली नाही.
भावना जोशी या महिलेचा पती आणि तीन बहिणी या अग्नितांडवात अडकून मृत्यूमुखी पडल्या. जोशींना या घटनेचा जबर धक्का बसला असून, अद्याप त्या यातून सावरल्या नाहीत. “एक ठिणगी उडाली आणि आग भडकली, त्याचवेळी त्यावर नियंत्रण मिळवले असते तर कदाचित एवढी मोठी दुर्घटना घडली नसती”, असे मत भावना जोशी यांनी मांडले. सुरुवातीला आग विझविण्यासाठी प्रयत्नच करण्यात आले नाहीत, असा आरोपही त्यांनी हिंदी वृत्तपत्राशी बोलताना केला.
“क्लबमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा होता. आगीचा भडका उडाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी लोक किचनच्या दिशेने धावले, पण तिथून बाहेर पडण्याचा मार्गच नव्हता. धुरात कोंडल्याने अनेकांचा मृत्यू झाला. यात माझे पती आणि एक बहिणीचा समावेश आहे. तर, इतर दोन बहिणी आगीत भाजल्या होत्या”, असे भावना जोशी यांनी एका हिंदी वृत्तापत्रला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अग्शिशामक दलाचे बंब ४० मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाले, असे भावना जोशी यांनी सांगितले. “क्लबमध्ये २०० – २५० लोक अडकले होते. धुरामुळे कोंडल्याने श्वास घेण्यास अडचण येत होती. सुरक्षेची पुरेशी काळजी न घेता अवैध पद्धतीने सुरु असलेले क्लब बंद व्हायला हवेत, तसेच संबंधित क्लबच्या मालकांवर कठोर कारवाई व्हायला हवी”, अशी मागणीही भावना यांनी केली.
गोव्यात आठवणी जगण्यासाठी आलो होतो, पण ही दुर्घटना आयुष्यभर विसरणार नाही, असे भावना जोशी म्हणाल्या. आम्ही १५ मिनिटे क्लबमध्ये होतो. आग लागल्याचे सर्वात पहिल्यांदा माझ्या पतीने बघितले. त्यांनी स्टाफला सांगितले. पण, माझ्या पतीचा मृत्यू झाला. क्लबमध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी कोणताच प्रयत्न करण्यात आला नाही, सगळे तमाशा बघत होते, असा आरोपही भावना यांनी यावेळी केला.
बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधुंना थायलंडच्या पटाया येथून अटक करण्यात आला आहे. यापूर्वी लुधरा बंधूंनी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. आगीच्या घटनेशी लुथरा बंधुंचा काही संबंध नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते. तसेच, त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.