

काही सेकंदांची ‘तो’ व्हायरल झालेला ह्या कझाकी नर्तिकेच्या मादक नृत्याचा व्हिडिओ मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सावकाश ‘फ्रेम बाय फ्रेम’ तपासला. कझाकस्थानातून हडफड्यात गुपचूप येऊन तिने हे नृत्य केलेच नसते तर? मग तिला पूरक आगलाव्या इलेक्ट्रिक आतषबाजीचा प्रश्नच उद्भवला नसता. हडफड्याच्या अग्निकांडाचे खरे मूळ आहे ते कझाकस्थानात.
आग, वणवे हा माझ्या अभ्यासाचा व जिव्हाळ्याचा विषय पूर्वीपासून आहे. बालपणी आईला फुंकून फुंकून मातीच्या चुलीतील लाकडे पेटवता येत नसत तेव्हा बोंदीर, कालापुरच्या आमच्या जुन्या घरात ती मला बोलवून हातात फुंकणी देई. मी उत्साहाने ती फुंकून आईला चुलीतील लाकडे पेटवून देत असे. मगच आमचा चहा व जेवण होई.
हिवाळ्यात परसदारी सुका पाला-पाचोळा, चुडते, काटक्या जमवून सकाळी आग पेटवून शेकोटी करून त्वचेवर ती गरम धग घ्यायला मजा येत असे. शेकोटी समोरून उठूच नये असे वाटत असे. पण शाळा चुकायची भीती म्हणून माती टाकून, टाकून झक मारत धुमसणारी शेकोटी विझवावी लागे.
गोवा विद्यापीठात २००१साली बिर्हाड हालवल्यावर अक्राळविक्राळ लाल जिभा चाटत अंगावर धावून येणाऱ्या खऱ्याखुऱ्या विनाशक वणव्यांचे दर्शन झाले. तब्बल वीस वर्षे मी हे दाट गवताळ परिसरातले भयावह वणवे अनुभवले आहेत. हा सर्व फार पुरातन जंगली, सैराट गवताळ प्रदेश. आमच्या सरभोवती सहस्रावधी वर्षांची जुनी गायराने, नैसर्गिक कुरणे.
इथल्या गवताला आगीचे खूप प्रेम असावे; अन्यथा या रानगवतावर, करडावर निसर्गाने सहज पेटणारा जलाभेद्य मेणाचा थर निर्माण केलाच नसता. महामार्गापासून सुरू होणारे हे वणवे आमच्या बंगल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून मला दरवर्षी धावत जाऊन फार आटापिटा करावा लागे. पणजीच्या अग्निशमन दलाला तर माझ्या फोनवरील आवाजाची नंतर सवय होत गेली व मी काही सांगण्यापूर्वीच तिथून उत्तर येई - ‘येता सर, येता. आमची गाडी धाडटा.’ त्यांना आजही धन्यवाद.
आता या सर्व अग्निपुराणाचा हडफड्याच्या ‘निशा नृत्यरजनी’ आयोजकांशी संबंध काय असा प्रश्न वाचकांना पडेल. २००७सालापासून मी गोवा सरकारकडे दिवाळीनंतर सर्वत्र लागणाऱ्या वणव्यांविरुद्ध प्रतिबंधक उपाय सुचवणारी तपशीलवार योजना, वार्षिक निवेदने ई-मेलद्वारे पाठवीत आलो आहे.
ह्यासंबंधी आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी, माजी महसूलमंत्री मडकईकर, आतनासियों ऊर्फ बाबुश व जेनीफर मोसेंरात, रोहन खंवटे यांच्याशी माझी फोनवर अनेकदा चर्चा झालेली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडेही हा विषय मांडला होता. बाणावलीचे आमदार वेंझीनी खोचक विचारणा केल्यावर मुख्यमंत्री सावंतांनीही विधानसभेत, ‘होय! कामतांचे ‘वणवे प्रतिबंधक निवेदन’ ईमेलवर मिळाले’, अशी कबुली दिली होती.
या आधीही अग्निशमन दलाचे माजी महासंचालक मेनन यांनी अग्निप्रतिबंधनासाठी १९८६च्या फार जुन्या व कालबाह्य झालेल्या गोवा अग्निशमन सेवा कायद्यात दुरुस्त्या करण्याचे आश्वासन पाच-सहा वर्षांपूर्वी मला दिले होते. काल ह्या विषयावर गोवा अग्निशमन सेवेचे नूतन महासंचालक नितीन रायकरांशी चर्चा झाली आहे व नव्या अग्निशमन विधेयकाचा पाठपुरावा मी करणार आहे.
हडफड्याचे अग्निकांड योगायोगाने घडलेले नाही. ह्या दुर्घटनेतून नशिबाने वाचलेल्या कझाकी व्यावसायिक नर्तकीने आपण त्या गावाचीच नव्हे अशी भूमिका घेऊन प्रचंड सहानुभूती पदरात पाडून घेतली आहे. त्यात तिचा काही दोष नाही. तिला आता जगभर फुकट प्रसिद्धी मिळाली आहे. ती एक चांगली, मादक नृत्याद्वारे पर्यटकांना भुरळ घालणारी आकर्षक नर्तिका आहे याबद्दल शंकाच नाही.
गोव्यातील हजारो स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांनी ‘दृष्टीआड सृष्टी’ ह्या न्यायाने अशा मादक, कामुक नृत्यांना सातत्यपूर्ण आक्षेप घेतलेला मला तरी दिसला नाही. निशाचरांची नशा आणि निशारजनीतील नृत्ये, म्हणजे ‘नाईट क्लब्ज ‘ विषयी गोवा सरकारचे कसलेच धोरण नाही. ही रात्रीची करमणुकीची, मौजेची खासगी बाजारपेठ आहे असे राजकीय व व्यापारी वर्ग मानतो. सूर्यास्तानंतर गोव्याच्या किनारी पर्यटनपट्ट्यात जे काही उघडे नागडे चालते ते सर्व संबंधित सरकारी कचेऱ्या रात्री बंद असल्याने आम्हांला असले काही लागत नाही हीच आजवरची शासकीय भूमिका आहे.
त्यामुळे ‘नाईट लाईफ’ व नाईटक्लब्ज / निशानृत्यरजनीपीठे इथे हे व्यवहार बेधडक, अनिर्बंध व खुल्लमखुल्ला चाललात. स्थानिकांचा व राजकारणी वर्गाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आर्थिक फायदा असल्याने प्रचंड गोंगाटाच्या, ध्वनिप्रदूषणाच्या असंख्य तक्रारी असूनही बधिरपणा न आलेली किनारपट्टीतील पोलिसांची बेशरम फौज या निशानृत्यरजनींकडे दुर्लक्ष करीत आली आहे. हे सगळे समाजमान्य ‘सेटिंग’ असते. अळीमिळी गुपचिळी. आता हे सगळे उघडे पडले आहे. ह्या कझाकस्थानच्या निशानर्तकीने सगळे भांडे आता फोडून टाकले आहे.
आता समजा ही कझाकस्थानातील मादक निशा नर्तिका टुरीस्ट व्हिसावर गोव्यात आलीच नसती तर हडफडेचे अग्निकांड झाले असते का? आपण हे गणित सहज सोडवू शकतो कारण त्या अग्निकांडाचे मूळ कझाकस्थानात आहे. या मध्य आशियातील विशाल मित्रराष्ट्राशी भारताचे सांस्कृतिक, पर्यटनविषयक परस्पर सहकार्याचे करार आहेत. पण निशारजनीसाठी भारतात, गोव्यात व्यावसायिक कझाकी नर्तिका पाठवण्याचा करार नाही. कारण असे काही होईल हे दोन्ही पक्षांनी, राष्ट्रांनी विचारात घेतले नसणार.
आता यांची धावपळ गुपचूप सुरू झाली आहे- हे तपासायला की हडफड्यातील ही नर्तिका टुरीस्ट व्हिसावर आली होती की बिझनेस, व्यावसायिक व्हिसावर? हा व्यवहार गोव्यात या किनारी पर्यटन क्षेत्रात, केरी तेरेखोल ते कांदोळी केगदेव्हाळपर्यंत निशानृत्यरजनींच्या नावाने चालत असल्याचे दिसेल व त्यातील विदेशी पर्यटकांचा खुल्लमखुल्ला अर्धनग्न व्यवहार पाहून आपले हे लोकप्रिय, पापभीरू, देवभीरू नेते चकीत होतील. गेल्या तीस वर्षात सत्ताबदल होत गेले तरी हे सर्व चालू आहे. या निशारजनींची पाळेमु्ळे गोव्याच्या ऑक्टोपसप्रमाणे विळखा घालून बसलेल्या समांतर अर्थव्यवस्थेत, ‘पॅरलल इकोनॉमी’मध्ये खोलवर रुतलेली आहेत. कुठच्याही सरकारला पाच वर्षात प्राधान्यक्रमाने हे नियंत्रित करणे शक्य नाही.
वीसेक वर्षापूर्वी जेव्हा माझे मित्र असलेल्या एका कर्तव्यदक्ष व प्रामाणिक मुख्य सचिवांची, सनदी अधिकाऱ्याची अकस्मात गोव्यातून उचलबांगडी झाली तेव्हा त्यांचा निरोप घेताना त्यांनी मला सांगितले की वरूनच आदेश येतात की इथून मिळणाऱ्या विदेशी चलनाची गंगाजळी वाढवायची असेल तर किनारप्ट्टीतीत पर्यटन क्षेत्रात जे आक्षेपार्ह चालते त्याकडे जरा कानाडोळा करा. हे ऐकून मी उडालोच.
कझाकस्थानातून त्या नृत्यरजनीसाठी ही नर्तिकाच आली नसती तर तर विद्युतजन्य आतिषबाजी म्हणजे इलेक्ट्रिक फायरवफायरवर्क्स वापरले गेले असते का? उत्तर आहे, नाही. हे आगलावे घातक पदार्थ वापरताना उसळून ठिणग्या पडल्या असत्या का? पुन्हा उत्तर आहे, नाही. ठिणग्या पसरून क्लबच्या ज्वालाग्राही वस्तूंनी पेट घेतला असला का? उत्तर पुन्हा आहे, नाही. या वस्तूंनी पेट घेतल्यावर समुद्राच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर ज्वालाग्राही छपराने पेट घेतला असला का? उत्तर आहे, नाही. थोडक्यात जर ती कझाकस्थानची नर्तिका त्या भयावह रात्री ‘मेहबुबा ओ मेहबुबा’च्या तालावर तिथे निशानृत्य करायला पोहोचली नसली तर पुढचा सगळा अनर्थ आपोआप टळला असता.
काही सेकंदांची ‘तो’ व्हायरल झालेला ह्या कझाकी नर्तिकेच्या मादक नृत्याचा व्हिडिओ मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सावकाश ‘फ्रेम बाय फ्रेम’ तपासला. छपरातून ठिणग्या, राख खाली वाद्यवादकांवर पडली, धूर निघाला तरी नर्तिका गुंगीत असल्याप्रमाणे नाचत होती. कुणीच धूर निघाला तरी फारसे गंभीर दिसले नाहीत. हे सर्व क्लबच्या ‘स्पेशल इफेक्टस’चा, आतषबाजीचा भाग असावा , ठिणग्या, आग, धूर वगैरे असेच बेसावध पर्यटकांना वाटले असणार.
अग्निकांडातून नर्तिका बचावली खरी पण तिने हे कबूल करायला हवे होते की त्या भयाण जीवघेण्या रात्री, तिच्याकडे पर्यटन वा व्यावसायिक व्हिसा असो वा नसो, भारतातील, गोव्यातील तिचा प्रवेश वैध, अवैध असो वा नसो, चार हजार किलोमीटर अंतर प्रवास करून, गवताळ, पशुपालक कझाकस्थानातून हडफड्यात गुपचूप येऊन तिने हे नृत्य केलेच नसते तर? मग तिला पूरक आगलाव्या इलेक्ट्रिक आतषबाजीचा प्रश्नच उद्भवला नसता. म्हणून माझ्या अल्पबुद्धीनुसार हडफड्याच्या अग्निकांडाचे खरे मूळ आहे ते कझाकस्थानात. कुणी सांगावे ते पुढच्या वेळी रशिया, युक्रेन, ताजीकिस्तान, ईजिप्त, उझबेकिस्तानातही असू शकेल.
- नंदकुमार कामत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.