दिगंबर कामत यांच्या विजयानंतरही मडगावात आनंदोत्सव नाही

आनंदोत्सव साजरा न करण्यामागचे एक कारण कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आलेला नाही.
Digambar Kamat News | Madgaon News
Digambar Kamat News | Madgaon NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: निवडणुकीत एखादा उमेदवार जिंकला तर त्या मतदारसंघात कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, यावेळी मडगाव याला अपवाद ठरला. दिगंबरबाबांच्या विजयाचा आनंदोत्सव कुठेही साजरा झाला नाही. कोंबवाड्यासारख्या ठिकाणीही फटाके वाजले नाहीत. याचे सध्या सर्वांनाच आश्र्चर्य वाटू लागले आहे. आनंदोत्सव साजरा न करण्यामागचे एक कारण कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आलेला नाही. दुसरे कारण मुख्यमंत्रिपदही मिळणार नाही. तिसरे कारण विरोधी बाकावार बसावे लागणार आहे. आता कदाचित विरोधी पक्षनेतेपदी निवड होते की काय हे पाहण्यासाठी बाबांचे कार्यकर्ते आनंदोत्सवासाठी वाट पाहात असतील अशी चर्चा सुरू आहे. (Madgaon News Updates)

‘मामी’चे स्वप्न पूर्ण

निवडणुकीत नेहमीच गुंडप्रवृत्तीचे लोक हे निवडून येत असतात व जनताही त्यांच्या पाठीशी उभी राहते. कधी काळी त्याने धमकी किंवा दपटशाही केलेली असते ते लोक तो आमदार झाल्यावर विसरतात. असेच काही सांताक्रुझचे नवनिर्वाचित आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्याबाबत घडले आहे. एकेकाळी त्यांच्या गुंडप्रवृत्तीमुळे सांताक्रुझमध्ये त्यांचा दरारा होता. मात्र, त्यांनी हे सर्व काही सोडून देऊन तो ‘वाल्याचा’ वाल्मिकी झाला.

मामीचा आशीर्वाद व लोकांनी दाखविलेला विश्‍वास यावर तो आमदार झाला. सांताक्रुझमधून त्याने विजयी मिरवणूक काढली, तेव्हा एखादा सामान्य व्यक्ती याप्रमाणे त्याची वागणूक यामुळे लहानथोरांपासून तो सगळ्यांना भेट असताना घाबरत नव्हते. त्यांनी प्रतिमा बऱ्यापैकी बदलली आहे व ‘मामी’चा पुत्र म्हणून लोकही त्याच्याकडे मदतीसाठी जातात. त्यांची साधी राहणी व लोकांचा संपर्क यामुळेच ते लोकांपर्यंत पोचले आहेत. मुलाने आमदार होण्याचे त्यांच्या आई ‘मामी’चे स्वप्न होते ते पुरे झाले आहे, अशी चर्चा मिरवणुकीवेळी होत होती. ∙∙∙

आवेर्तान का हरले?

सासष्टी तालुक्यातील आठही मतदारसंघ हे एकेकाळी खरे तर काँग्रेसचे बालेकिल्ले होते. अन्य कोणताही पक्ष तेथे विचार करण्यासही धजावत नव्हते. नव्वदच्या दशकात व त्यानंतर मात्र तेथील समीकरणे बदलली ती काँग्रेसमधील गटबाजीमुळे. आता तर काँग्रेस (Congress) तेथील आपले एकेक गड याच कारणातून गमावत चालला आहे. यावेळी तर काँग्रेसने खात्रीचा नावेली केवळ गमावला नाही, तर काँग्रेसचे आवेर्तान फुर्तादो चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत व त्याचे कारण आहे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने फिरविलेली सूत्रे. आवेर्तान व मायकलची जुनी दोस्ती व ते जिंकून आले, तर मायकलच्या गटाला मिळतील यास्तव म्हणे ही सूत्रे हलविली गेली. काँग्रेसला हीच प्रवृत्ती नडते म्हणतात ते असे. ∙∙∙

कथा पणसुले रस्त्याची

काणकोणमध्ये या निवडणुकीत परिवर्तन झालेले आहे व काणकोण पालिकेच्या बहुतेक प्रभागांनीही भगव्याला पसंती दिलेली असल्याने आता तरी चावडी ते पाटणे रस्त्याचे भाग्य फळफळणार अशी अपेक्षा तेथील रहिवासी बाळगून आहेत. गेली कित्येक वर्षे रहिवाशांची मागणी असताही संबंधित यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामागील कारणांची खालच्या सुरांतील चर्चा चावडीवर चालू आहे. पर्रीकर बगलरस्त्याच्या ठेकेदाराने म्हणे स्वखर्चाने हा रस्ता हॉटमिक्स करण्याची तयारी दर्शवली होती, पण संबंधितांनी ती नाकारली. वेगळ्या कामामुळे मिळणारे कमिशन हे तर त्यामागील कारण नव्हे? ∙∙∙

सुभाष - राजेश रंगले शिगम्यात

निवडणूक कधीचीच संपली आणि शिगमा सुरू झाला. शिगमा हा असा सण की जुने भेदभाव संपवून एकत्र येण्याचा हा उत्सव आणि त्यात एकाच घराण्यातले, पण दोन वेगवेगळ्या पक्षाचे असले, तरी या उत्सवात ती बाधा येत नाही. सांगे मतदारसंघात भाजप उमेदवारीवर जिंकून आलेले सुभाष फळदेसाई आणि कुंभरजुवे मतदारसंघात काँग्रेस उमेदवारीवर जिंकून आलेले राजेश फळदेसाई हे दोघेही कावरे पिर्ला येथील एकाच घराण्यातले. रविवारी ते शिगम्याच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्या दोघांनीही ढोल ताशे वाजवून शिगम्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे शिगमा हा सर्वांची मने एकत्र आणणारा हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ∙∙∙

कुंकळ्ळी भाजपाचे चुकले कुठे?

अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण कुंकळळी भाजपा नेत्यांना बरोबर लागू पडते. कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपाच्या पराभवाला स्थानिक भाजपा मंडळ व स्थानिक नेते जबाबदार असल्याची टीका आता भाजप समर्थकांकडून व्हायला लागली आहे. तलवडा हा भाजपाचा बालेकिल्ला. या प्रभागात युरीने आघाडी घ्यावी याचा अर्थ काय? कुलवाडा, भिवसा, वेरोडा, माड्डीकटा, गोठण या भागात भाजपाला मते मिळत नाही याला जबाबदार कोण? गळ्यात शाल घालून मिरवणारे व भाजप सत्तेवर असताना आपल्याच नातेवाईकांची व सग्या सोयऱ्यांची कामे करून घेणारे आता तोंड बंद करून गप्प का? असा सवाल भाजप समर्थक विचारीत आहेत. नुसत्या घोषणा देणारे हे पोकळ नेते पक्षाला काय खाक तारणार? ∙∙∙

Digambar Kamat News | Madgaon News
गोवा सरकार: तरुण तेजपालविरोधात आज सुनावणी

इंद्रदेव शुक्ला गोव्यात रमले

राज्याचे पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी भारतीय पोलिस सेवेतील कारकीर्द गोव्यातूनच केली व ते मार्च महिन्याच्या अखेरीस गोव्यातूनच निवृत्त होत आहेत. पहिल्या पोलिस सेवेतील पोस्टींगवेळी ते अनेक वर्षे गोव्यात वास्तव्य करून राहिल्याने त्यांना गोवा खूपच आवडला. त्यामुळे ते पुन्हा निवृत्तीच्या वाटेवर असताना केंद्रामधून सूत्रे हलवून ते गोव्यात आले. निवृत्तीनंतर काही काळ पोलिस सेवेतच राहण्याची त्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने त्यांनी निवडणुकीपूर्वी सरकारकडे विनंती केली आहे.

त्यांना सहा महिने मुदत वाढवून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, ते शक्य नसल्यास यावर्षी मोपा विमानतळ ऑगस्टपर्यंत सुरू होत असल्याने तेथे एखाद्या मोठ्या पदावर नेमणूक व्हावी यासाठी शुक्ला यांनी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे. त्यांचे हे स्वप्नही पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण गोव्यात महासंचालकपदाचा ताबा घेतल्यापासून ते सरकारच्या इशाऱ्यानुसार वागत आहेत व असे अधिकारी नेहमी सरकारला हवेच असतात. ∙∙∙

उल्हासचे कार्यकर्ते फॉर्मात

नावेलीत भाजपने(BJP) आजवर कधीच निवडणूक लढविली नव्हती, तर किमान दोनवेळा इतरांना पाठिंबा देऊन निवडून आणले होते. यावेळी मात्र त्याने स्वतः उमेदवार केवळ उभाच केला असे नाही, तर त्याला निवडूनही आणले. या विजयाने नावेलीतील भाजपवाल्यांना अस्मान ठेंगणे झाले आहे. शनिवारी त्यांनी काढलेली मिरवणूक व साजरा केलेला विजयोत्सव हे त्याचे उदाहरण आहे. या उन्मादामागेही एक कारण आहे. तुयेकर यांना सुरवातीपासून एक त्रिकूट विरोध करत होते. त्यांनी दिल्लीपासून पणजीपर्यंत आटोकाट प्रयत्न करूनही त्यांची डाळ शिजली नाही. विजयोत्सवाचे तेच कारण तर नव्हे! ∙∙∙

Digambar Kamat News | Madgaon News
काँग्रेस विधिमंडळात गटनेते पदासाठी चढाओढ

पराभूत होऊनही भाटीकर जिंकले

77 मतांनी पराभूत होऊनही फोंड्यात मगोचे केतन भाटीकरच जिंकले अशी सध्या हवा आहे. याउलट भाजपचे बंडखोर उमेदवार संदीप खांडेपारकर यांचा सपशेल पराभव झाला असे बोलले जाते. संदीप खांडेपारकर हे चारवेळा सरपंच म्हणून निवडून आले आहेत, पण त्यांना हजारांच्या वर मजल मारता आली नाही. असे म्हणतात संदीप रिंगणात असल्यानेच रवी फोंड्यात काठावर पास झाले. आता भाजपही या निकालाकडे गंभीरपणे पाहात आहे. ∙∙∙

बाबूंना फॅमिलीराज भोवले!

बाबूश, मायकल, विश्वजीत यांनी आपापल्या पत्नींना राजकारणात आणून आमदारकीच्या निवडणुकीत उतरविले म्हणून बाबूंनीही सावित्रींना सांगे मतदारसंघात उभे केले आणि जे व्हायचे तेच झाले. दोघेही हरले. काही वर्षांपूर्वी ज्योकीम आलेमाव यांनी केलेली चूक करू नका पश्चाताप होण्याची पाळी येणार असा इशारा याच सदरात दिला होता. मात्र, बाबू ऐकले नाहीत आणि पत्नी हट्टापोटी स्वतःच्या राजकीय प्रवासाची होळी केली. ∙∙∙

Digambar Kamat News | Madgaon News
मडगाव येथे ‘द काश्मीर फाईल्स’ वरून गोंधळ

कावरेचे दोन सुपुत्र बनले आमदार!

आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन अशी भावना केपे तालुक्यातील कावरे या दुर्गम भागातील जनतेची झाली आहे. या गावांतील दोघे गोवा विधानसभेचे सदस्य बनले आहेत. सुभाष फळदेसाई सांगे मतदारसंघाचे आमदार बनले आहेत, तर राजेश फळदेसाई कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार बनले आहेत. राजेश व सुभाष एकाच गावचे असले तरी दोघे वेगवेगळ्या पक्षाचे आमदार बनले आहेत. दोघेही जरी दोन वेगवेगळ्या पक्षाचे आमदार असले, तरी आपल्या गावाने दोन आमदार दिल्याच्या आनंदात सध्या कावरे गावातील नागरिक आहेत. ∙∙∙

‘आरजी’चे तगडे आव्हान!

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ‘आरजी’ म्हणजेच रिव्होल्युशनरी गोवन्सने बजावलेली कामगिरी नेत्रदीपक अशीच आहे. ‘उजो उजो’ करणारी ही पोरे काय करणार, असे म्हणून त्यांना हिणविणाऱ्यांची मतमोजणीनंतर दातखिळीच बसली आहे

‘आरजी’चा एक उमेदवार निवडून येणे आणि शहरी भाग वगळता अन्यत्र त्यांना मिळालेली मते खरे तर मगो व गोवा फाॅरवर्डसारख्या प्रादेशिक पक्षांना त्यांच्या भवितव्याचा विचार करायला लावणारी आहेत. ‘आरजी’चे गोंयकारपण आणि त्यासंदर्भातील लक्षवेधी मुद्दे गोमंतकीय तरुणांना भुरळ घालतात, हाच त्याचा अर्थ आहे. पण त्यांची ही तडफदार कामगिरी यापुढेही सुरू राहील, की मिकी म्हणतात त्याप्रमाणे ‘आरजी’ म्हणजे सतीश धोंड यांचे बाळ, हे लवकरच कळून येईल म्हणा!

एका बोटलेराने दुसऱ्या बोटलेराला हरविले!

‘लोहा, लोहे को काटता है’ असे म्हटले जाते. परशुरामाच्या बाणावलीत असेच घडले. आमदार व मुख्यमंत्री बनणारा आपण पहिला ‘बोटलेर’ म्हणजे जहाजावर काम करणारा, अशी शेखी मिरवणारे चर्चिल आलेमाव यांना वेंझी व्हिएगश या बोटलेराने हरविले. जहाजाच्या कॅप्टनने एका खलाशाला हरविले म्हणून आता बाणावलीकर म्हणू लागले आहेत, ‘बाप आखीर बापही होता है.’ कळले ना चर्चिलबाब!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com