Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

Omkar Elephant Latest Update: गोवा-महाराष्ट्र सीमेलगतच्या नेतर्डे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला ‘ओंकार’ हत्ती अखेर गोव्याच्या हद्दीत दाखल झाला.
Omkar Elephant
Omkar ElephantDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोवा-महाराष्ट्र सीमेलगतच्या नेतर्डे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला ‘ओंकार’ हत्ती अखेर गोव्याच्या हद्दीत दाखल झाला असून, त्याने कळशी-मोपा परिसरात प्रवेश केल्याने शेतकरी आणि बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्तीच्या हालचालींची माहिती मिळताच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी याच हत्तीने पेडणे तालुक्यातील विविध भागांतील शेती-बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यामुळे यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

‘ओंकार’ने गेल्या वर्षी कळशी, मोपा, तोरसे, उगवे, तांबोसे तसेच लगतच्या परिसरात धुमाकूळ घालत उभी पिके आणि बागायतींचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर गोवा व महाराष्ट्र वनखात्याने संयुक्त मोहीम राबवून हत्तीला या भागातून हटविले होते. त्याची कर्नाटकच्या दिशेने रवानगी करण्यात आल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.

Omkar Elephant
Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

गेल्या आठवडाभरापासून ‘ओंकार’ पुन्हा गोवा-महाराष्ट्र सीमेलगतच्या नेतर्डे परिसरात दिसून येत होता. त्यामुळे तो गोव्याच्या हद्दीत प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन वनखाते त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. हत्तीला गोव्याच्या दिशेने येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्याने कळशी-मोपा परिसरात प्रवेश केल्याने वनखात्यापुढील आव्हान वाढले आहे.

तोरसे, तांबोसे, मोपा आणि परिसरातील शेतकऱ्यांची शेती-बागायती सध्या बहरात आली आहे. मोठा खर्च, मेहनत आणि वर्षभराची प्रतीक्षा केल्यानंतर पिके उत्पादनाच्या टप्प्यावर आली आहेत. अशा वेळी ‘ओंकार’ने शेत किंवा बागायतीमध्ये प्रवेश केल्यास काही तासांतच मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Omkar Elephant
Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

संयुक्त मोहीम राबवा

‘ओंकार’चा वावर सीमावर्ती भागात असल्याने गोवा आणि महाराष्ट्र वनखात्याने पुन्हा एकदा संयुक्तपणे नियोजनबद्ध मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. हत्तीचा बंदोबस्त करून तो पुन्हा शेती-बागायतीच्या क्षेत्रात येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

बंदोबस्त करा!

‘ओंकार’ गोव्याच्या हद्दीत प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर स्थानिक पंच सदस्य दयानंद गवंडी यांनी सरकार आणि वनखात्याचे लक्ष या समस्येकडे वेधले होते. हत्ती तोरसे व परिसरात दाखल होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासधूस करण्यापूर्वीच त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

आता हत्ती प्रत्यक्ष गोव्याच्या हद्दीत दाखल झाल्याने गवंडी यांच्या मागणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी केवळ हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवणे पुरेसे नसून, वनखात्याने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com