Heavy Rain In Goa: ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसावेळी कारापूर येथे भर लोकवस्तीत वीज कोसळली. ही घटना बुधवारी (ता.8) पहाटे घडली.
भोळवाडा-कारापूर येथील दौलत साखळकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या माडावर अगोदर वीज कोसळली. नंतर विजेचा लोळ घराला जोडून असलेल्या लॉण्ड्रीच्या स्लॅबवर पडला.
या वीज लोळाच्या धक्क्याबरोबर सिलिंग पंखा तसेच वीजसाहित्य जळाले. तसेच वीजप्रवाह खंडित झाला. यात सुदैवाने अन्य कोणताही अनर्थ घडला नाही.
या घटनेची माहिती देताच वीज खात्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. डिचोलीत बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान, भोळवाडा येथे दौलत साखळकर यांच्या घराजवळ वीज कोसळली.
विजेच्या लोळाबरोबर लॉण्ड्रीमधील सिलिंग फॅन जळाला. तसेच विजेची अन्य उपकरणे निकामी झाली.
वीज कोसळली तेव्हा मी लॉण्ड्रीत झोपलो होतो. पहाटे अचानक कानठळ्या बसवणारा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. क्षणभर नेमके काय झाले, ते कळले नाही. पाहतो तर सिलिंग फॅनमधून धूर येत होता.
स्लॅबवर जाऊन बघितले, तर वीजजोडणीच्या वाहिन्यांनी पेट घेतला होता. जवळील माडावर वीज पडल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती दौलत साखळकर यांनी दिली.
पाळी पंचायत क्षेत्रातील तळेमाथा येथील लक्ष्मण नाईक यांच्या राहत्या घरावर वीज कोसळून लाखोंचे नुकसान झाले. या घटनेत घरातील सर्व वीजेची उपकरणे निकामी झाली. सुदैवाने घरातील कोणालाही काहीच झाले नाही. यावेळी घरात 13 सदस्य उपस्थित होते.
साखळी व परिसरात पहाटेच जोरदार विजेचा लखलखाट व गडगडाट सुरू झाला. त्यावेळी विजेचा एक लोळ लक्ष्मण नाईक यांच्या घराशेजारी असलेल्या माडाच्या झाडावर पडला, तेथून त्याने थेट नाईक यांच्या घराचे छप्पर फोडून आत प्रवेश केला. त्यामुळे घरातील विद्युतवाहिन्या व उपकरणे जळून खाक झाली. घरात एकच गोंधळ उडाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.