Indian Constitution: संविधान दिनाच्या दिवशीच लोकशाहीसमोर प्रश्न; संविधानाची फसवणूक तर होत नाही ना?

Election Commission: निवडणूक आयुक्तांना आजीवन संरक्षण देण्यात आलं. त्याचा उद्देश काय? त्यावर माजी न्यायमूर्ती दीपक गुप्ताजींचं उत्तर असं असेल की, त्यावेळी याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही
Election Commission
Indian ConstitutionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

शंभू भाऊ बांदेकर

निवडणूक आयुक्तांना आजीवन संरक्षण देण्यात आलं. त्याचा उद्देश काय? त्यावर माजी न्यायमूर्ती दीपक गुप्ताजींचं उत्तर असं असेल की, त्यावेळी याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. पण आता त्याचा उद्देश स्पष्ट झाला आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेल्या संस्थेनेच बिगर लोकशाही पद्धतीनं काम केलं. तर तिची स्वत:ची कार्यपद्धतीच पूर्णपणे घटनाबाह्य ठरते.

स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि समन्याय या चतु:सूत्रीचा आत्मा असलेल्या आपल्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीने अमृतमहोत्सवी वाटचाल पूर्ण केलेली आहे. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. अशा या आपल्या भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे आपली राज्यघटना जगाच्या पाठीवरील सर्व राज्यघटनांच्या तुलनेत सर्वांत मोठी अशी लिखीत स्वरूपातील राज्यघटना आहे. मुख्य म्हणजे केवळ आकाराने मोठी हेच तिचे वैशिष्ट्य नाही, तर सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य, संसदीय शासनपद्धती आणि समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य तसेच सर्वांसाठी लोककल्याणकारी राज्य ही देखील त्याची वैशिष्ट्ये म्हणून जगाने अधोरिखित केली आहेत.

Election Commission
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

अशा या सर्व जातीधर्माच्या पंथांना आणि संप्रदायांना बरोबर घेऊन जाणाऱ्या राज्यघटनेचे पवित्र्य राखणे हे प्रत्येक सच्चा भारतीयांचे काम आहे आणि प्रत्येकाने हे पवित्र्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाण व जाणीव ठेवून ते तडीला नेणे आवश्‍यक आहे. जो या संविधानाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अतिरेक करतो किंवा अवमान करतो त्या व्यक्तीस योग्य ते शासन करण्याचीही तरतूद आपल्या घटनेत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सारे माहीत असूनही जेव्हा राजकारणी लोक या गोष्टीकडे कानाडोळा करतात, तेव्हा सच्चा भारतीयास आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याशिवाय चैन पडत नाही. यासाठी कायदेपंडित इंजिनियर्स, पत्रकार, डॉक्टर, प्राध्यापक अशी सुजाण माणसे पक्षभेद बाजूला ठेऊन पुढे सरसावलेली आपण पहात आहोत. यासाठी ताजे जवळील उदाहरण द्यायचे तर ‘एसआयआर’चे देता येईल.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ‘एसआयआर’ प्रक्रिया एककल्ली पद्धतीने राबवली म्हणून देशभरातील सर्व पक्षांचे विरोधक देशाची राजधानी नवी दिल्लीपासून छोट्या छोट्या राज्यांतील गल्लीपर्यंत आक्रोश करीत आहेत व आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या या घटनाबाह्य कृतीबद्दल त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे केंद्राला सूचविले आहे. इथं देशभरातील सुजाण नागरिकांनी मान्य केलं आहे की, निवडणूक आयोगाचे निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले जावेत. मात्र इथं अनेकवेळा बहुमताचा प्रश्‍नच उद्‌भवला नाही. कारण आयोगाचा अजेंडा उर्वरित दोन आयुक्तांना काही वेळा दाखवलाच गेला नाही.

विरोधकांच्या वाढत्या पाठिंब्याचा जोर कमी करण्यासाठी आता निवडणूक आयोगात ‘एसआयआर’नंतर ‘एसएसआर’ (मतदार याद्यांची विशेष उजळणी) हाती घेतली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १ जानेवारी २०२७ ही पात्रता तारीख मानून देशात मतदार याद्यांची विशेष उजळणी हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे सर्व पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी होईल आणि मग मतदारयादी अचूक व अद्ययावत होईल. एकूण काय, तर निवडणूक आयोगाला उशिरा सुचलेले हे शहाणपण म्हटले तर ते चुकीचे होईल काय? पण अशाने विरोधक गप्प बसतील, असे वाटत नाही. केंद्राने कितीही नकारघंटा वाजवली, तरी एकवटलेले विरोधक सहजासहजी गप्प बसणार नसून ते निवडणूक आयुक्तांच्या घटनाबाह्य कारवाईवर नाराज आहेत व राज्य घटनेचा आधार घेतच ज्ञानेश कुमारांना निराधार करणार आहेत, असे वाटते.

या प्रकरणातील अनेक सूक्ष्म पैलूंवर ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी अनेक नामवंत ज्यांचा निवडणूक प्रक्रियेशी संबंध आला त्याची व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केली व ती यूट्यूबवर पाहता येईल) वाचकांसाठी मुद्दाम याबाबत थोडक्यात सांगावेसे वाटते. सिब्बल यांनी गुप्ताजींना प्रश्‍न केला होता की, २०२३ मध्ये निवडणूक आयोगाशी संबंधित कायद्यात सुधारणा झाली त्यातील एक तरतूद अशी आहे की सर्व निवडणूक आयुक्तांना ‘आजीवन संरक्षण’ दिले जाईल. राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीशांनाही आजीवन संरक्षण नसते.

तरीही निवडणूक आयुक्तांना आजीवन संरक्षण देण्यात आलं. त्याचा उद्देश काय? त्यावर गुप्ताजींचं उत्तर असं असेल की, त्यावेळी याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. पण आता त्याचा उद्देश स्पष्ट झाला आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेल्या संस्थेनेच बिगर लोकशाही पद्धतीनं काम केलं. तर तिची स्वत:ची कार्यपद्धतीच पूर्णपणे घटनाबाह्य ठरते. तेव्हा तिच्याकडून काय अपेक्षा करता येईल? कोणालाही फौजदारी खटल्यामधून आजीवन संरक्षण कसं दिलं जाऊ शकतं? यावर पुनर्विचार गरजेचा आहे. त्यांना मिळणारं संरक्षणही मर्यादित असायला हवं. ते अवास्तव असू नये.

कपिल सिब्बल यांचा दुसरा प्रश्‍न होता तो म्हणजेच तुम्हाला वाटतं की, एसआयआर आणि तो कायदा या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आणि त्यामागील उद्देशही स्पष्ट आहेत. त्यावर गुप्ताजी म्हणतात, पश्‍चिम बंगालचं उदाहरण बोलकं आहे. तिथं चाळीस लाख अपील दाखल झालीत. त्यापैकी फक्त एक लाख प्रकरणांवर निर्णय झाला. ९३ टक्के निर्णय मतदारांच्या बाजूने लागले. याचा अर्थ ९३ हजार मतदारांना बेकायदेशीरपणे मताधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. सध्याच्या गतीने विचार केला तर उर्वरित ३९ लाख प्रकरणांची सुनावणी पूर्ण व्हायलाच तब्बल १४ वर्षे लागतील. ही प्रक्रिया देशभर राबवली तर १४० वर्षे लागतील. या खटल्यांचा निकाल लावण्यासाठी मनुष्यबळ कुठून आणणार? हा गुप्ताजींचाच प्रश्‍न होता.

Election Commission
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

२६ नाेव्हेंबर हा संविधान दिन साजरा करताना सध्याच्या राजकारणाने आणि राज्यकर्त्यांनी संविधनाची फसवणूक चालवलेली आहे. त्यावर सर्व समंजस भारतीयांनी गंभीरपणे विचार करणे ही संविधान वाचवण्यासाठी काळाजी गरज होऊन बसली आहे. आज थोडे फार शिकलेला पण आपल्या मातृभूमीशी एकनिष्ठ असणारा मतदारदेखील चिंतीत होऊन विचारतो आहे की, सध्या ज्या प्रकारचे राजकारण आपल्या देशात वळण घेत आहे, त्यातून आपल्या देशाच्या संविधानाची फसवणूक तर होत नाही ना? सुसंस्कृत समंजस आणि देशनिष्ठ राजकारण्यांकडून याचे उत्तर अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.