

म्हापसा: देशी – विदेशी पर्यटकांच्या पसंतीच्या गोव्यात अमली पदार्थ तस्करीचा धोका कायमच राहिला आहे. राज्यातील खेडेगावातही आता अमली पदार्थ तस्करीचा शिरकाव होत आहे. पेडणे तालुक्यातील कोरगाव येथून बेलारुसच्या महिलेला एक कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे. पेठेचावाडा येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (११ डिसेंबर) ही कारवाई केली.
ईना वोलकोवा (रा. पेठेचावाडा, मूळ बेलारुस) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून १.३२१ किलो डिएमटी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
या अमली पदार्थाची बाजारातील किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. विदेशी नागरिक अमली पदार्थ तस्करीच्या कृत्यात सहभागी असल्याची माहिती पेडणे पोलिसांना मिळाली होती त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.
पर्यटकांची वर्दळ नसलेल्या ग्रामीण भागात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी भागातील विद्यार्थ्यांना लक्ष करुन तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता.
जून २०२५ मध्ये पार्से येथे शिवानंद गावडे याला अटक करण्यात आली होती. गावडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विक्री करणार होता. त्याच्याकडून ७३२ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
याशिवाय सप्टेंबर २०२५ मध्ये दीपक कुमार (३८) याच्याकडे ८० हजार रुपये किंमतीचा गांजा व चरस आढळून आला होता. याच महिन्यात नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे एक लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज आढळून आले होते.
फेब्रुवारी २०२४ मध्ये कोरगावमध्ये अडीच किलो गांजा बाळगल्याप्रकरणी गोपिनाथ हरमलकर (२५) या तरुणाला अटक करण्यात आली होती. खेडेगावात अमली पदार्थ तस्करीचा वाढता प्रकार धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचे मत स्थानिकांनी नोंदवले आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.