'सत्तेसाठी आपसह इतरांचे सहकार्य घेऊ, काँग्रेस आणि भाजपची मदत नकोच'

भाऊसाहेबांच्या कारकिर्दीची आठवण करून देऊ; सुदिन ढवळीकर
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak 
Published on
Updated on

फोंडा : गोवा मुक्तीनंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा घटक बनलेल्या सर्वांत जुन्या आणि आजही लोकांच्या मनात असलेल्या भाऊसाहेब बांदोडकर यांच्या ‘मगो’ पक्षाला प्रत्येक निवडणुकीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्ता स्थापनेत असो वा विरोधात असो मगो पक्षाने प्रत्येकवेळी आपली अशी छाप पाडली आहे. मुळात गोव्याच्या राजकारणात दिल्लीहून आलेल्या प्रमुख राजकीय पक्षांना मगो पक्षाच्या मुशीत तयार झालेल्या आमदारांनी मोठे केले. मगो पक्षात अनेक स्थित्यंतरे आली, कार्यकारिणी स्तरावर अनेक उलथापालथी घडल्या, पण मगोच्या सिंहाची डरकाळी कायम विधानसभेत घुमली आहे, असे माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी सांगितले.

मगो पक्षाला यावेळेला किमान पाच ते सहा जागा मिळतील, असा होरा बांधण्यात येत आहे. तृणमूललाही प्रतिनिधीत्व मिळेल, पण सत्तास्थापनेपर्यंत ही मजल जाईल काय, असे विचारले असता, सत्तास्थापनेसाठी गरज भासल्यास भाजप (BJP) आणि काँग्रेस (congress) सोडून इतर आमदारांचे साहाय्य घेतले जाईल. हा निर्णय मगो - तृणमूल युती घेणार आहे. अर्थातच मगो कार्यकारिणीला विश्‍वासात घेऊनच आपण स्वतः आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष तथा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मतमोजणीनंतर आवश्‍यक निर्णय घेतील. अन्य कुणीही नाही.

Sudin Dhavalikar
‘उत्पल बाबत योग्य निर्णय घेऊ’

अपेक्षेप्रमाणे आमचे प्रतिनिधी निवडून येतीलच, पण सत्ता स्थापनेसाठी गरज भासल्यास आम आदमी पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांचे साहाय्य घेतले जाईल, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

मगो पक्षाने काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी साहाय्य केले आहे. यावेळेला काँग्रेस किंवा भाजपला समर्थन द्यायचे झाले तर... असे विचारल्यावर नाही, असे ठामपणे सुदिन ढवळीकर म्हणाले. गोमंतकीयांनी मगो, काँग्रेस आणि भाजपची राजवट पाहिली आहे. या तिन्ही राजकीय पक्षांत मगोची राजवट सरस राहिली आहे. काँग्रेस आणि भाजपने तोडफोडीचे राजकारण केले. त्यामुळेच तर यावेळेला मगो - तृणमूल (TMC) युतीने परिवर्तनाची हाक गोमंतकीयांना दिली आहे, म्हणूनच सत्तेसाठी भाजप किंवा काँग्रेसशी युती करणार नाही, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

गोव्याच्या विकासासाठी आणि गोमंतकीयांच्या हितासाठी योग्य निर्णय घेतले जातील, असेही ते म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी मगो-तृणमूल काँग्रेस पक्षच सत्तेचा प्रमुख दावेदार असेल असा विश्‍वासपूर्वक दावा केला. राज्याच्या विधानसभेत प्रथमच तृणमूल काँग्रेस प्रवेश करणार असून मगो (MGP) आणि तृणमूल युती राज्याला चांगले प्रशासन देण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सत्तेसाठी आप आणि इतरांचे सहकार्य घेऊ, पण काँग्रेस आणि भाजपचे कदापीही नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.

Sudin Dhavalikar
'मुरगाव पालिकेतील 10 वर्षांपूर्वीचे तीन कोटी गायब'

‘भाऊसाहेबांच्या कारकिर्दीची आठवण करून देऊ’

गोव्यात मगो, काँग्रेस आणि भाजपने आतापर्यंत सरकार स्थापन केले आहे. या तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांतील कोणत्या पक्षाचे सरकार उत्तम होते, असे विचारले तर निश्‍चितच गोमंतकीयांच्या ओठांवर मगोचेच नाव येईल. भाऊसाहेब बांदोडकर (Bhausaheb Bandodkar) आणि त्यानंतर शशिकलाताई काकोडकर यांच्या सरकारने जे धोरणात्मक निर्णय घेतले, त्यामुळेच राज्याची भरभराट झाली आणि गोवेकरांचे हित जपले गेले. आताही मगो युती भाऊसाहेबांच्या स्वप्नातील गोवा साकारण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहील, अशी ग्वाही सुदिन ढवळीकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com