

डिचोली: फॅड म्हणा किंवा अन्य कारण; चिकण मातीपासून बनविलेली दिवजे आता हळूहळू कालबाह्य होत आहेत. या दिवजांची जागा ‘पितळ’ या धातूपासून बनवलेल्या दिवजांनी घेतली आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारातही या दिवजांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
दिवजोत्सव म्हटला, की पेटते दिवज हातात किंवा डोक्यावर घेऊन सुवासिनी देवदेवतांसमोर दीप ओवाळणी करताना दिसून येतात. डिचोलीत गावोगावी साजऱ्या होणाऱ्या दिवजोत्सवाची परंपरा आणि उत्साह आजही कायम असला, तरी बहुतेक भागात या दिवजोत्सवात आधुनिकीकरणाचा शिरकाव झाल्याचे आढळून येत आहे.
डिचोलीच्या बाजारात आता क्वचितच मातीची दिवजे विक्रीस उपलब्ध असतात. महाराष्ट्रातील ‘आयी’ आदी काही भागातून मातीची ही दिवजे बाजारात उपलब्ध होत आहेत.
दुसऱ्या बाजूने चिकण मातीच्या दिवजांना मागणी कमी असल्याने डिचोलीत ही दिवजे बनविण्याचा व्यवसाय जवळपास बंद पडल्यातच जमा झाला आहे. मातीकाम करणाऱ्या स्थानिक कारागिरांनी मातीपासून दिवजे बनविण्याच्या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे, अशी खंत डिचोलीतील एक नामवंत माती कलाकार झिलू हरमलकर यांनी व्यक्त केली आहे.
पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी एक काळ असा होता, की दिवजोत्सवात ‘चिकण माती’चेच दिवज पेटविण्यात येत होते.
गावागावांत होणाऱ्या दिवजोत्सवावेळी सुवासिनींच्या हातात मातीपासून बनवलेले ‘दिवज’ दिसून येत असे. मात्र काळ बदलत गेला, तशी हळूहळू मातीच्या दिवजांची जागा पितळ धातूपासून बनवलेल्या दिवजांनी घेतली.
आता तर बहुतेक सुवासिनी पितळीच्या दिवजांचा वापर करताना दिसून येत आहेत. पितळीच्या दिवजांना मागणी असल्याने या दिवजांचे नवनवीन मॉडेलही बाजारात येऊ लागले आहेत. सध्या गावोगावी दिवजोत्सवाची लगबग सुरू असून, पितळीच्या दिवजांची खरेदीही वाढली आहे.
पितळीची आकर्षक दिवजे बाजारात आली असली, तरी डिचोलीतील काही ठरावीक भागात चिकणमातीच्याच दिवजांना धार्मिक महत्त्व आहे. मये, कुडचिरे आदी काही मोजक्याच ठिकाणी मातीचे दिवज पेटविण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे सुवासिनींना अद्यापतरी मातीची दिवजे टाळता येत नाहीत.
गेल्या काही वर्षांपासून सुवासिनी पितळ या धातूपासून बनवलेल्या दिवजांना पसंती देत आहेत. बाजारात दरवर्षी दिवजोत्सव काळात या दिवजांना मागणी असते. पितळीपासून बनविलेले दिवज किफायतशीर आणि टिकाऊ असते. यंदा नवीन मॉडेलची दिवजे बाजारात आली आहेत, अशी माहिती एक कारागीर, व्यावसायिक देविदास कारेकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.